नाशिक : इगतपुरी तालुक्‍यात गावठी दारुचा अड्डा नष्ट

गोपाळ शिंदे
गुरुवार, 15 जून 2017

इगतपुरी (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्‍यातील घोटी गावापासून आठ किलोमीटर अंतरावर दुर्गम भागातील निरपण येथील गावठी दारूचा अड्डा घोटी पोलिसांनी नष्ट केला आहे. पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

इगतपुरी (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्‍यातील घोटी गावापासून आठ किलोमीटर अंतरावर दुर्गम भागातील निरपण येथील गावठी दारूचा अड्डा घोटी पोलिसांनी नष्ट केला आहे. पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

बहुचर्चित दुर्गम भागातील काही आदिवासींच्या संगनमतीने रासायनिक गावठी दारू बनवण्यात येत असल्याची गोपनीय माहिती गोपनीय अधिकारी शैलेश शेलार यांच्याकडून प्राप्त झाली होती. ही माहिती प्राप्त होताच घटनास्थळी पोलिसांकडून चाचपणी सुरु करण्यात आली. त्यावेळी एक अज्ञात व्यक्ती दुर्गम जंगली परिसरात पळून जाण्यात यशस्वी झाला. दरम्यान पोलिसांनी दारूसाठी वापरण्यात येणारे तब्बल एक लाख 72 हजार रुपयांचे गुळमिश्रीत रसायन नष्ट केले आहे.

घोटी परिसरात गावठी दारूचा सुळसुळाट होत असल्याचे निवेदन काही सामाजिक कार्यकर्त्याकडून पोलिस ठाण्यात देण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी दारुचे अड्डे नष्ट करण्याची मोहिम हाती घेतली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी माहिती दिली. परिसरात कुठल्याही ठिकाणी अवैधरीत्या चालणारे गावठी दारूचे अड्डे सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांच्या निदर्शानास आल्यास घोटी पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेत पोलीस हवालदार सुहास गोसावी, श्रीकांत देशमुख, धर्मराज पारधी उपस्थित होते.

इगतपुरी आदिवासी दुर्गम डोंगरदऱ्यात वसलेला असल्याने यात गरीब आदिवासीना हाताशी धरून अवैधरित्या गावठी दारूचे धंदे चालवण्यात येतात. स्थानिक आदिवासींनाही गावपातळीवर रोजगार मिळत असल्याने याची फारशी कोठेही वाच्यता केली जात नाही. पोलिस कारवाई करत असल्याचा सुगावा लागताच घनदाट जंगलाचा फायदा घेत आरोपी पळून जाण्यात यशस्वी होत असल्याने प्रशासनावर ताण येत आहे. रसायनयुक्त दारूने अनेक कुटुंब देशोधडीला लागत असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येत सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे.