बागलाण तालुक्यातील पर्यटन क्षेत्रांच्या विकासासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर

Deepika Chavan
Deepika Chavan

सटाणा : बागलाण तालुक्यातील पर्यटन क्षेत्रांच्या विकासासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागाकडून दीड कोटी रुपयांचा निधी मिळाला असून या निधीतून प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत तालुक्यातील श्री क्षेत्र अंतापूर, श्री क्षेत्र दोधेश्वर, श्री क्षेत्र देवळाणे, श्री क्षेत्र पहाडेश्वर या पर्यटनस्थळांना पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार दीपिका चव्हाण यांनी आज शनिवार (ता.२४) रोजी येथे दिली.

याबाबत बोलताना आमदार सौ.चव्हाण म्हणाल्या, श्री क्षेत्र अंतापूर हे श्री शंकर महाराजांचे जन्मस्थान आहे. तसेच या ठिकाणी असलेल्या श्री दावल मलिक बाबा यांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक गर्दी करतात. श्री शंकर महाराज व दावल मलिक बाबा यांच्या भक्तांमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. त्यामुळे श्री शंकर महाराज मंदिर परिसरात बहुउद्देशीय सभागृहाच्या बांधकामासाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

देवळाणे येथील प्राचीन हेमांडपंती महादेवाचे मंदिर असून जगप्रसिद्ध वेरूळ व अजिंठा येथील लेण्यांप्रमाणेच या महादेव मंदिरात शेकडो वर्षांपूर्वी आकर्षक कोरीव काम करण्यात आले आहे. दरवर्षी महाशिवरात्री व सोमवारी या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. या प्राचीन महादेव मंदिराला देश विदेशातील पर्यटक भेटी देत असतात. या मंदिर परिसरात बहुउद्देशीय सभागृहाच्या बांधकामासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. श्री क्षेत्र दोधेश्वर व श्री क्षेत्र पहाडेश्वर येथेही महाशिवरात्री व श्रावणी सोमवारी भाविकांची मांदियाळी असते.

दोधेश्वर येथील शिवमंदिर परिसरात निवारा शेड, महिला व पुरुषांच्या शौचालयासाठी व पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी ७६ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. तर पहाडेश्वर मंदिर परिसरात निवारा शेड, महिला व पुरुषांच्या शौचालयासाठी व पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी २४ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. लवकरच या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

जगभरातील जैन भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तालुक्यातील श्री क्षेत्र मांगीतुंगी येथे दरवर्षी लाखो भाविकांची गर्दी उसळते. सुरत लुटीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तव्य केलेल्या व मुघालांविरोधात इतिहासातील एकमेव समोरासमोर लढाई झालेला ऐतिहासिक साल्हेर किल्ल्यासह तालुक्यातील मुल्हेर व इतर किल्ले हे पर्यटकांना आकर्षित करणारी ठिकाणे आहेत. दरवर्षी अनेक पर्यटक या ठिकाणांना भेटी देत असतात. ही पर्यटनस्थळे विकसित करण्यासाठी राज्याच्या सांस्कृतिक व पुरातत्व विभागाकडून निधी मंजूर झाला असून लवकरच या कामांनाही सुरुवात होणार आहे. 

तालुक्यात अनेक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळे विकासापासून वंचित आहे. त्याठिकाणी पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करून पर्यटनाच्या दृष्टीने तालुक्याचा विकास करण्यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य शासनाकडून निधी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार सौ.चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com