मोरया कन्स्ट्रवेलच्या तीन संचालकांना 24 लाखांच्या फसवणूकप्रकरणी अटक

Crime
Crime

नाशिक - शिर्डी विमानतळानजीक असलेल्या काकडी शिवारात स्वस्तात प्लॉटचे आमिष दाखवून कॅनडा कॉर्नर परिसरातील मोरया कन्स्ट्रवेलच्या पाच संचालकांनी गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले. काकडी शिवारातील (ता. कोपरगाव, जि. नगर) जमिनीचा खोटा सातबारा उतारा दाखवून संशयित संचालकांनी पैसे घेत पक्के खरेदीखत न करता सात गुंतवणूकदारांना सुमारे 24 लाखांना गंडा घातला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, यात नाशिकसह जळगाव, धुळे, नगर जिल्ह्यांतील गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची शक्‍यता आहे. याप्रकरणी सुनील ढोली, किरीट सदगीर व योगेश विश्‍वंभर या तिघांना अटक झाली असून, शनिवार (ता. 3)पर्यंत कोठडी सुनावली आहे.

स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी सुरेश खंडेराव पाटील (रा. यशवंत कॉलनी, रिंगरोड, जळगाव) यांच्या फिर्यादीनुसार कॅनडा कॉर्नर येथील पाटील प्लाझातील मोरया कन्स्ट्रवेल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संशयित संचालक सुनील मारोती ढोली (रा. बिनदिया पार्क, चेतनानगर, राणेनगर, नाशिक), जितेंद्र अशोक जगताप (रा. मखमलाबाद नाका, नाशिक), किरीट दगडू सदगीर (रा. जय श्रीराम रो हाउस, कालिका पार्क, उंटवाडी), दगडू पाटील (रा. नाशिक), योगेश सुभाष विश्‍वंभर (रा. उमा पार्क, कामटवाडे, नाशिक) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

पाटील यांच्या फिर्यादीनुसार, 2013 मध्ये मोरया कन्स्ट्रवेलचे संशयित सुनील ढोलीसह साथीदारांनी जळगावला खानदेश सेंट्रल मॉलमध्ये पॉपर्टी मेळावा घेतला होता. यामध्ये संशयितांनी शिर्डीपासून दहा किलोमीटरवरील काकडी शिवारात नियोजित शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच 800 एनए प्लॉट अवघ्या 200 रुपये चौरस फुटाने विकत असून, भविष्यात त्यांचे दर वाढणार आहेत. ही जागा व ले-आउट पाहण्यासाठी येण्याचेही त्यांनी मेळाव्यात सांगितले. त्याप्रमाणे सुरेश पाटील यांच्यासह सखाराम वानखेडे, गोपाळ बुंदे यांनी सप्टेंबर 2013 मध्ये ढोली याची भेट घेतली. संशयितांनी एका खासगी वाहनातून तिघांना शिर्डीनजीकच्या काकडी शिवारातील शेती दाखविली. या जागेजवळच शिर्डी विमानतळाचे काम सुरू होते. संशयित ढोली याने या वेळी जमिनीची कागदपत्रे दाखवून सातबारा उताऱ्यावर संशयितांची नावे लागल्याची बनावट कागदपत्रे दाखवून त्यांचा विश्‍वास संपादन केला. शेतीची बिनशेती होताच खरेदीखत करून दिले जाईल, असे सांगितल्याने पाटीलसह तिघांचा विश्‍वास बसला. सुरेश पाटील यांनी बुकिंगपोटी 51 हजार, वानखेडे यांनी 51 हजार रुपये धनादेशाद्वारे, तर बुंदे यांनी 2100 रुपये कार्यालयात जमा केले. 23 ऑक्‍टोबर 2013 ला पाटील यांनी नाशिकला येऊन एक लाख 45 हजार 400 रुपये संशयित ढोली यास दिले, त्याची पावतीही घेतली. करारनाम्याचे 40 हजार 228 रुपये खरेदीवेळी देण्याचेही संशयित ढोलीने सांगितले. याचप्रमाणे वानखेडे यांनी अडीच लाख, तर बुंदे यांनी चार लाखांची रक्कम संशयित ढोलीकडे कार्यालयात जमा केली.

सुरेश पाटील यांनी खरेदीखतासंदर्भात वारंवार संपर्क साधूनही संशयितांकडून जागेची बिनशेती झाली नसल्याचे सांगत, काही दिवस थांबा, असे सांगितले जाऊ लागले. मात्र, वारंवार संपर्क करूनही, कार्यालयात समक्ष भेटूनही तेच उत्तर मिळत असल्याने अखेरीस पाटील यांनी 28 जून 2017 ला कोपरगाव तहसील कार्यालयाकडे अर्ज करून जागेचा उतारा घेतला. संबंधित जागा संशयित ढोली याची नसून ती विमानतळाच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कॅनडा कॉर्नरवरील मोरया कन्स्ट्रवेलचे कार्यालय गाठले असता ते बंद होते. संशयितांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. त्या वेळी केलेल्या चौकशीतून संशयितांनी अनेकांना लुबाडल्याचे समोर आले. सुरेश पाटील, गोपाळ बुंदे, स्वप्नील वानखेडे, अशोक जोशी, बाळू लहामगे, सदाशिव खैरनार, अशोक जोशी, दीपक दिवटे, सुभाष त्र्यंबके यांची 23 लाख 95 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलिसांत दाखल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com