तेलंग वाडीत स्लॅब कोसळून तिघे जखमी,मुसळधार पावसाने नाले सफाईची परिक्षा 

live photo
live photo

नाशिक : नेमेचि येतो पावसाळा या म्हणी प्रमाणे यंदाच्या पहिल्याचं पावसात परंपरेप्रमाणे दैना उडवून गेला. गेल्या वर्षाप्रमाणेचं यंदाही पहिल्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने महापालिकेने नाले सफाईचा केलेला दावा पुन्हा एकदा फोल ठरला. वादळी पावसामुळे पंचवटीतील तेलंगवाडी परिसरात एका अर्धवट स्लॅब कोसळून तिघे जखमी झाले तर काझी गढीची माती कोसळल्याचा प्रकार घडला

. शहरात तब्बल सोळा ठिकाणी झाडे रस्त्यावर पडली तर विजांच्या कडकडाटामुळे एक टपरी व एका झाडाला आग लागल्याची घटना घडली. गुरुवारी रात्री दिड वाजेच्या सुमारास शहरात विजांच्या कडकडाटासह वादळ सुरु झाले. एक वाजून 53 मिनिटांनी तेलंग वाडीतील एका घराच्या वरच्या मजल्यावर स्लॅब टाकण्यात आला होता. वादळामुळे तो स्लॅब कोसळला त्यात तिघे जण जखमी झाले. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून तातडीने बंब रवाना करण्यात आले. स्लॅब खाली दबलेल्या श्‍याम पांडुरंग सोनवणे, सोमनाथ विठ्ठल भवर व सुरेश नारायण जाधव यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. जाधव यांनी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर सोनवणे व भवर यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

काझी गढीची माती ढासळली 
यंदाही काझी गढीवरील माती काही प्रमाणात ढासळल्याने येथील नागरिक भयभीत झाले आहेत. अग्निशमन विभागाने तातडीने बंब पाठवून परिस्थितीची पाहणी केली. पहाटेच्या सुमारास नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. एकुण 143 घरे गढीच्या किनाऱ्यावर आहेत त्यातील चाळीस घरे अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आल्या. पश्‍चिम विभागाच्या वतीने जागेचा पंचनामा करण्यात आला. 

सोळा ठिकाणी पडली झाडे 
या वादळामुळे शहरात सोळा ठिकाणी झाडे पडली. इंदिरा नगर बोगदा येथे झाड पडल्याने महामार्गावरची वाहतुक काही प्रमाणात ठप्प झाली होती. काठे गल्लीतील रविंद्र विद्यालय, गंगापूर रोडवरील दिवट्या बुधल्या हॉटेल जवळ, चोपडा लॉन्स, धनदाई लॉन्स, मुंबई-आग्रा महामार्गावरील हनुमान नगर, ग्रामिण पोलिस हेड क्‍वार्टर, नाशिकरोडच्या जयभवानी रोड वरील आडके नगर, कामटवाडा येथील गौरी शंकर मंगल कार्यालय, हिरावाडी, सिबिएस येथील ठक्कर बझार, टाकळी रोड वरील जयशंकर लॉन्स, मामा मुंगी मंगल कार्यालय, पुणे महामार्गावरील बजरंग वाडी, मखमलाबाद नाका येथील नवनिर्माण चौक, जेलरोड येथील पिंटो कॉलनी येथे झाड रस्त्यावर पडल्याच्या घटना घडल्या तर इंदिरा नगरच्या चार्वाक चौकात विजेच्या तारेवर झाडाची फांदी पडल्याने विज पुरठा बंद पडला होता. आडगाव नाका येथील जत्रा हॉटेल जवळ एका टपरीला विज पडल्याने आग लागली. 

नाले सफाईचा बोजवारा 
महापालिकेने शहरात 1411 किलोमीटर लांबीचे नाले साफ केल्याचा दावा केला असला तरी पहिल्याचं पावसात दावा फोल ठरल्याचे दिसून आले. पाऊस संपून बारा तास उलटले तरी दुपार पर्यंत सखल भागातील पाणी झिरपतं नव्हते. विजय-ममता चौक, द्वारका, मायको सर्कल, मेनरोड, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा येथील काही भागात पाणी साचले होते. पावसाळी गटारीच्या नाल्यांचे छिद्र डांबराने बुजल्याने पाणी झिरपतं नव्हते. 

शनिवार, रविवार वादळी पाऊस 
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने हवामान खात्याचा हवाला देवून येत्या शनिवारी व रविवारी असे दोन दिवस शहरात वादळी पाऊस पडण्याची दाट शक्‍यता वर्तविली आहे. गुरुवारी रात्री शहरात पाऊण तास पाऊस झाला. गेल्या वर्षी याच दरम्यान एका तासात 92 मिमी. पावसाची नोंद होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत पाऊस कमी असल्याचा दावा करण्यात आला. 

 वरुन पावसाचे. जमीनीतून गटारीचे पाणी 

काल मध्यरात्री वीजेच्या कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह शहर जिल्ह्यात मुसळधार पाउस झाला. शहरात तासभर पाउस शहरात झाला. त्यामुळे महापालिकेच्या चेंबर आज दिवसभर ओसांडून वाहत होते. रामकुंड, कॅनाल रोड, सायखेडा रोड सह अनेक भागात वरुन पावसाचे आणि जमीनीतून गटाराचे पाणी रस्त्यावर आल्याने जागोजागी पाण्याचे तळे साचले. 

गटारी तुंबल्या 
तासाभराच्या मूसळधार पावसामुळे नेहमीप्रमाणे नदीच्या दिशेने वाहणारे शहरातील सगळे गटार चोक अप झाले. गटारातून पाणी वाहत असल्याने वरुन पावसाचे, जमीनीतून गटाराचे पाणी साचल्याने काही वेळातच सिमेंट कॉक्रीटच्या रामकुंडावर नदीपात्रात पूर आला. सगळ्या रामकुंड परिसरात पावसाच्या व गटारीच्या पाण्यामुळे मध्यरात्री पूरस्थिती निर्माण झाली. अनेकांच्या बेसमेट व घरामध्ये पाणी गेल्याने मध्यरात्रीपासून तर पहाटेपर्यत पावसाचे साचलेले पाणी काढण्याची वेळ नागरिकांवर आली होती. आज दिवसभर तुंबलेल्या गटारी साफ करण्याची कामे सुरु होती.

मध्यरात्री सुमारे पाउन तास शहरातील वीज पुरवठा गायब होता. पंचवटीत रामकुंड, नाशिक रोडला कॅनॉल रोड, सायखेडा रोड मार्गावर महापालिकेच्या रस्त्यातील गटारी ओसांडून वाहिल्या पण बरेच ठिकाणी वाहून आलेल्या घाणीमुळे महापालिकेच्या गटारी चोक अप झाल्या

पूर्व पट्याला दिलासा 
बरोबर 7 जूनला सुरु झालेल्या पावसाचा जोर नाशिक, इगतपुरी, कळवण तालुक्‍यासह पूवर्‌ पट्यातील येवला,चांदवड, देवळा, मालेगाव या तालुक्‍यात राहिला. त्यात, नाशिक (30.3) इगतपुरी (12), दिंडोरी (29) सिन्नर (5.6) चांदवड (12), देवळा (16.4), येवला ( 5),नांदगाव (11), मालेगाव (3), बागलाण (5.5),कळवण (8), याप्रमाणे साधारण जिल्ह्यात 9.8 मि.मी पाउस झाला. या सगळ्या मूसळधारेत त्र्यंबकेश्‍वर मात्र कोरडेच राहिले. 

आतापर्यत सहा जखमी 
शनिवारी (ता 2) वादळी पावसाने आंबेवाडी (ता.इगतपुरी) येथे वीज अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू झाला. 6 जण जखमी आहेत. याशिवाय विविध भागातील 21 जनावरे दगावली असून घरे,गोठे,कांदाचाळ,शेडनेट यांचे नुकसान झाले आहे. आंबेवाडी (ता.इगतपुरी) अंगावर विज पडल्याने एकाचा मृत्यु झाला. कोळगाव येथील वाऱ्यामुळे किरण दिनकर गवळी यांच्या घराच्या पत्र्यांवर दगड ठेवलेला दगड गवळी यांच्या डोक्‍यात पडल्याने ते जखमी झाले.कुंदेवाडी (ता.निफाड) येथे अश्विन चंद्रकांत वाकडे यांच्या अंगावर विज पडल्याने त्या जखमी असून त्या 40 टक्के भाजल्या आहेत. निफाडला खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. सिन्नरला धुळवड येथे निवृत्ती रामनाथ आव्हाड यांच्या 7 ते 8 घरांचे नुकसान झाले त्यात, चौघे जखमी झाले. 

पशुधनाचे नुकसान 
जनावरांचे नुकसान इगतपुरीत 3 गायी, 2 बैल ठार झाले. तानाजी किसन झनकर भरवीर बुद्रूक (ता.इगतपुरी), तारुखेडले येथे सदाशिव वामन शिंदे व अनंत माधव जगताप यांच्या घरांचे नुकसान झाले. कर्ऱ्हे (ता.बागलाण) येथे वासरु,शहा (ता.सिन्नर) येथे 32 घरांची अंशत: पडझड झाली. ग्रामपंचायत सभागृह व कांदाचाळीचे नुकसान झाले. देवपूरला 21 घरे,4 पोल्ट्री शेड,1 बैल,1 वासरु, वावी येथे 26 घरे, नांदुर शिंगोटे 22 घरे, पांढुर्ली 15 घरे,14 गोठे व सात शेड नेटची पडझड झाली. सोनगाव (ता.निफाड) ला शिवनाथ त्र्यंबक गावले यांची 1 गाय, येवलातालुक्‍यातील रेगाव,गारखेडे,देवळाणे,कानडी, दुगलगाव,खैरगव्हाण,अंदरसुल,नगरसुल,विखरणी,भिंगारे गावांत घरांचे, डोंगरगावला रामेश्वर विठ्ठल सोमसे यांच्या बैल तर मौजे-पहाणे (ता.मालेगाव) येथे राघो देवाजी सोनवणे यांच्या बैलाचा वीज पडल्याने मृत्यू झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com