सटाण्यात राष्ट्रवादीचा भाजप सरकारच्या निषेधार्थ 'गाजर डे'

रोशन खैरनार
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

सटाणा : सत्तेत आल्यापासून केंद्र व राज्यातील भाजप सरकारने देशवासियांना खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करीत भूलथापा देणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ बागलाण तालुका व शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आज शनिवार (ता.१७) रोजी आठवडे बाजारात 'गाजर डे' साजरा करण्यात आला. 

सटाणा : सत्तेत आल्यापासून केंद्र व राज्यातील भाजप सरकारने देशवासियांना खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करीत भूलथापा देणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ बागलाण तालुका व शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आज शनिवार (ता.१७) रोजी आठवडे बाजारात 'गाजर डे' साजरा करण्यात आला. 

सध्या फेब्रुवारी महिन्यात सर्व महाविद्यालयात तरुणाई ट्रॅडिशनल डे, साडी डे, रोझ डे, चॉकलेट डे, टाय डे, व्हॅलेंटाईन डे असे विविध 'डे' साजरे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज 'गाजर डे' साजरा करून अनोख्या पद्धतीने शासनाचा निषेध व्यक्त केला. आज दुपारी दोन वाजता येथील टिळक रोडवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी व शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत शासनाचा निषेध केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आठवडे बाजारात आलेल्या नागरिकांना गाजर देत सरकारच्या वेगवेगळ्या घोषणांची आठवण करून दिली. बाजाराच्या निमित्ताने शहरात आलेल्या शेतकऱ्यांनी देखील या आंदोलनात सहभागी होऊन शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. 

यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष श्री.सूर्यवंशी म्हणाले, निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने देशवासियांना विविध प्रकारची खोटी आश्वासने व भूलथापा देऊन केंद्र व राज्यात सत्ता मिळविली. मात्र तीन वर्षांच्या कार्यकाळात महागाई, बेरोजगारी वाढली, शेतीमालाला भाव नाही, शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सामान्य जनतेला फक्त खोटी आश्वासनेच मिळाली असून त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. अच्छे दिन चे स्वप्न दाखवून फसवी कर्जमाफी करणारे भाजप सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरले आहे.

राष्ट्रपुरुषांचे स्मारक बनविण्याचे आश्वासन, जीवनावश्यक वस्तूंमध्ये दररोज होत असलेली दरवाढ, पेट्रोल डीझेलच्या वाढत्या किंमती, शेतकरी कर्जमाफी, काळा पैसा परत आणणे, शिक्षण व रोजगार या समस्यांवर तोडगा काढण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरली आहे. याचाच निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज 'गाजर डे' साजरा करून शासनाचा निषेध केला असून यापुढील काळात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही श्री.सूर्यवंशी यांनी दिला. 
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज व शिवजयंतीबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भाजपचे उपमहापौर श्रीपाद छदम यांचा बागलाण तालुका व शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे तीव्र निषेध करण्यात आला. छत्रपतींच्या नावाने सत्ता मिळविणाऱ्यांना जनता निवडणुकीत त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नसल्याचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी स्पष्ट केले. 

आंदोलनात माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, फइम शेख, शफिक मुल्ला, आरिफ मन्सुरी, आनंद सोनवणे, प्रसिद्धी प्रमुख सचिन जाधव, तालुका कार्याध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष पंडितराव अहिरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल बच्छाव, भाऊ पवार, शंतनू सोनवणे, मोहीत सोनवणे, बबलू खैरनार आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
 

Web Title: Marathi news north maharashtra news carrot day bjp