जलयुक्त शिवाराची मंजूर कामे येत्या आठ दिवसात सुरु न झाल्यास उपोषण

रोशन खैरनार
गुरुवार, 8 मार्च 2018

सटाणा : वाठोडा (ता.बागलाण) या केळझर (गोपाळसागर) धरण परिसरातील गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून शासनाने येत्या आठ दिवसात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मंजूर कामे सुरु करावीतत, अन्यथा बागलाण उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा संतप्त इशारा वाठोड्याचे सरपंच लक्ष्मण महाले व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 

सटाणा : वाठोडा (ता.बागलाण) या केळझर (गोपाळसागर) धरण परिसरातील गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून शासनाने येत्या आठ दिवसात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मंजूर कामे सुरु करावीतत, अन्यथा बागलाण उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा संतप्त इशारा वाठोड्याचे सरपंच लक्ष्मण महाले व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 

यासंदर्भात बागलाणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण महाजन यांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा, वाठोडा (ता.बागलाण) हे गाव गेल्या दहा ते बारा वर्षांपासून भीषण पाणीटंचाईला सामोरे जात आहे. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागत आहे. शासनाकडे वारंवार मागणी केल्याने सन २०१७ - १८ मध्ये जलयुक्त शिवार अंतर्गत गावाची निवड केली होती. शासनाच्या आदेशाने ग्रामसभेला व तालुक्यातील सर्व सरकारी यंत्रणांना शिवारफेरी करण्याचे आदेश दिले होते. व त्यानुसार संयुक्त शिवारफेरी करून संयुक्त कामांचा आराखडा तयार करून शासनाला सादर केला आहे. मात्र त्याच्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. येत्या एप्रिल, मी व जून महिन्यात उष्णतेमुळे पाणीटंचाईत अधिक वाढ होणार असल्याने परिसरातील ग्रामस्थांसह मुक्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच बिकट होणार आहे.

भविष्यात पाण्याअभावी मनुष्यहानी व वित्तहानी झाल्यास शासकीय यंत्रणा व जलयुक्त शिवार योजनेच्या कामांना टाळाटाळ करणारे संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी त्यास जबाबदार राहतील, असा ठरावही ग्रामसभेने केला आहे. येत्या आठ दिवसात योग्य ती कार्यवाही न झाल्यास सर्व ग्रामस्थ आपल्या प्राणीमात्रांसह बागलाण उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडणार असल्याचा इशाराही निवेदनात नमूद करण्यात आला आहे. 

निवेदनावर सरपंच लक्ष्मण महाले, माजी पंचायत समिती सदस्य सोमनाथ सूर्यवंशी, भावराव ठाकरे, चिंतामण ठाकरे, आनंद ठाकरे, उलुशा ठाकरे, सीताबाई कामडी, किसन भोये, बाबुराव ठाकरे, रमा ठाकरे, वाळू ठाकरे, मोहन ठाकरे, दत्ता ठाकरे, चिंतामण ठाकरे आदींसह शेकडो ग्रामस्थांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती बागलाणचे तहसीलदार, गटविकास अधिकारी,  तालुका कृषी अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी आदी विभागांना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Marathi news north maharashtra news jalyukta shivar