इंधन दरवाढीनंतरही केळी ट्रकभाडे "जैसे थे

live photo
live photo

रावेर : मागील वर्षीच्या तुलनेत डिझेलच्या भावात तब्बल 20 टक्के वाढ होऊनही केळीची उत्तर भारतात वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या भाड्यात कोणतीही वाढ झाली नाही. ट्रक व्यवसायातील आपापसांतील स्पर्धेमुळे ही भाडेवाढ झाली नसल्याचे ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. रावेर, सावदा, फैजपूर येथे सुमारे 50 ट्रान्स्पोर्ट आहेत आणि या परिसरात सुमारे 500 ट्रक आहेत. 
सध्या दररोज होणारी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ देशभर चर्चेचा विषय झाला आहे. मागील वर्षी याच काळात डिझेलचे भाव 58 ते 60 रुपये लिटर होते. आज हेच भाव 76 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. म्हणजेच डिझेलच्या भावात 20 टक्के वाढ झाली आहे. 

ट्रकच्या भाड्यात वाढ नाही 
डिझेलच्या भावात एका वर्षात इतकी मोठी वाढ झाल्यामुळे केळी वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या भाड्यात किती वाढ झाली, याबाबत माहिती घेतली असता अजिबात वाढ झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. 

तीव्र स्पर्धा 
ट्रकचालकांमध्ये आपल्यालाच भाडे मिळावे यासाठी तीव्र स्पर्धा असते. केळी किंवा अन्य वस्तू वाहून नेण्यासाठी जितक्‍या प्रमाणावर ट्रक असायला पाहिजेत, त्यापेक्षा जास्त ट्रक या परिसरात उपलब्ध आहेत. अनेक नामवंत कंपन्या नवे ट्रक विविध युक्‍त्या योजून विकतात. खासगी कंपन्या ट्रक विकत घेणाऱ्या इच्छुकांना कर्ज देतात. इतकेच नाही तर त्या ट्रकची पासिंग, त्याची बॉडी तयार करण्यासाठी आणखी तीन लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देतात. एकदा ट्रक घेतला, की मग ट्रकमालकाची जीवघेणी स्पर्धा सुरू होते. मुद्दल, व्याज आणि दैनंदिन खर्च भागविण्यासाठी ट्रक उभा राहून चालत नाही. त्यामुळे मिळेल त्या भाड्यात ट्रक उपलब्ध करून दिला जातो. स्पर्धेमुळे किमान भाड्यात ट्रक मिळतो. 

हा खर्चही ट्रकमालकांकडेच 
ठरलेल्या भाड्यात ट्रकमालकाला ट्रक भरण्याची मजुरी, डिझेल, ऑइल, रस्त्यांवरील टोल टॅक्‍स, आरटीओ, पोलिस, विमा, ओव्हरलोड आदींचा खर्च करावा लागतो. ट्रक ओव्हरलोड भरल्याशिवाय मालकाला भाडे परवडत नाही आणि ओव्हरलोड भरला, की अनेक ठिकाणी "चिरीमिरी' देणे आलेच. काही अडचणीमुळे ट्रकमधील माल वेळेत पोचला नाही, तर भाडे कापून घेतल्याच्या घटना घडतात. असे असूनही ट्रक घेतला आहे, तो चालविण्यासाठी इलाज नसल्याचे ट्रकचालकांनी आणि ट्रान्स्पोर्टचालकांनी सांगितले. 

परतीच्या भाड्याची अपेक्षा 
इतक्‍या लांब किमान भाड्यात ट्रक पाठविल्यावर तेथून परतीचे जे मिळेल ते भाडे मालकाचे उत्पन्न असते. पूर्वी उत्तर भारतातून गहू मोठ्या प्रमाणावर इकडे आणला जात असे. त्यामुळे गव्हाचे भाडे हमखास मिळत असे. आता असे परतीचे भाडे मिळणेही दुर्मिळ झाले आहे. या समस्यांमुळे अनेक ट्रकमालकांनी मागील 4-6 वर्षांत हा व्यवसाय बंद केला आहे. 
 
उत्तर भारतातील विविध शहरांचे सध्याचे ट्रकभाडे 
शहर------ट्रकभाडे (रुपये) 
आग्रा------36 हजार 
दिल्ली------40 हजार 
कानपूर------40 हजार 
लखनौ------42 हजार 
जम्मू------58 हजार 
श्रीनगर------78 हजार 
 

डिझेलच्या भावात वाढ झाली असली, तरीही उत्तर भारतात दूरच्या प्रवासात त्याचा मोठा परिणाम होत नाही. जम्मू, श्रीनगर आदी ठिकाणच्या भाड्यात वाढ झालेली नाही. काही ट्रकमालक अगदीच अपवादाने हजार- दोन हजार रुपये जादा मागत आहेत. मात्र, ट्रक वेळेत पोचावा म्हणून इतकी रक्कम तर बक्षीस म्हणूनही चालकांना दिली जाते. 
- प्रेमानंद महाजन, केळी निर्यातदार शेतकरी, तांदलवाडी (ता. रावेर) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com