पाल घाटातील अपघातात फैजपूरच्या कापड विक्रेत्यासह दोन ठार; सात जखमी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

रावेर : पाल (ता. रावेर) येथे आठवडे बाजारात विक्रीसाठी माल नेणाऱ्या मॅटडोअरला आज सकाळी भीषण अपघात होवून त्यात फैजपूरच्या कापडविक्रेत्यासह दोन जागीच ठार व सात जण गंभीर जखमी झाले. अपघातातील मृत व सर्व जखमी फैजपूर शहरातील रहिवासी असल्याने हळहळ व्यक्त होत आहेत. 

रावेर : पाल (ता. रावेर) येथे आठवडे बाजारात विक्रीसाठी माल नेणाऱ्या मॅटडोअरला आज सकाळी भीषण अपघात होवून त्यात फैजपूरच्या कापडविक्रेत्यासह दोन जागीच ठार व सात जण गंभीर जखमी झाले. अपघातातील मृत व सर्व जखमी फैजपूर शहरातील रहिवासी असल्याने हळहळ व्यक्त होत आहेत. 
अधिक माहितीनुसार, आज (मंगळवार) पालचा आठवडे बाजार असतो. तेथे नेहमीप्रमाणे आज सकाळी साडे दहाला भाजीपाला,आंबे आदी माल विक्रीसाठी फैजपूरचे व्यावसायिक मॅटडोअरने क्रमांक (एम.एच.15-जी.7370) खिरोदा मार्गे पाल जात होते. पालजवळील बोरघाटात अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने तो रस्त्याच्या कठडयावर आदळला व तीन चार वेळा उलटला. यात फैजपूरच्या न्हावी दरवाजा भागातील कापड विक्रेते मोतिलाल पंडीत गुरव (वय 52, रा. फैजपूर) व शेख अरबाज शेख सादीक (वय 18 रा. हजीरा मोहल्ला, फैजपूर) हे दोघे जागीच ठार झाले. मृत व्यक्ती हे घरातील कमावते असल्याने हळहळ व्यक्‍त होत आहे. 
अपघातात कैलास सोनार, दानिश खान असलम खान, एजाजखान अश्रफखान, आसीफखान असलमखान, फिरोज इस्माईल तडवी, शकील इस्माईल तडवी, मोहंमद साद असलमखान (सर्व रा.फैजपूर) हे जखमी झाले. जखमींना खिरोदा व फैजपूर येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघात घडल्यावर पाल घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली. सावदा पोलिस व नागरीकांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी सहकार्य केले. याबाबत सावदा पोलिसात नोंद झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहे. 
 
मोठा अनर्थ टळला 
पाल घाटात उतारावर चालकाचा ताबा सुटल्याने मॅटडोअर उलटला आणि रस्त्याच्या कडेला पत्राच्या संरक्षण कठड्यावर जाऊन अडकला. बाजुला खोल दरी असल्यामुळे कठडा तोडून मॅटडोअर खाली कोसळला असता तर मोठा अनर्थ घडला असता अशी अपघातस्थळी चर्चा होती.

Web Title: marathi news raver pal aacident deaith