साधूंनी व्हावे हिंदू धर्माचा सच्चा सैनिक - महंत पंडित गुरुजी 

hindu-dharmasanskruti
hindu-dharmasanskruti

सटाणा - भारतमातेचा सेवक बनताना इतर धर्मांचं कोडकौतुक करण्यापेक्षा छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजाला दिशा देणाऱ्या साधूचे कार्य महान समजले जाते. साधूंनी महंत किंवा महामंडलेश्वर बनण्याऐवजी धर्माचा सच्चा सैनिक बनलं तर त्या साधुचं आयुष्य खऱ्या अर्थाने धर्म संस्कृतीच्या सार्थकी लागेल. असे प्रतिपादन हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व वारकरी संप्रदायाचे महंत पंडित गुरुजी यांनी येथे केले.

येथील आरम नदीपात्रातील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यात्रोत्सव पटांगणावर हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघातर्फे आयोजित संघाच्या चौथ्या राष्ट्रीय अधिवेशनात महंत पंडित गुरुजी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी आयुर्वेदाचार्य महंत श्री श्री १००८ माधवानंद सरस्वती महाराज होते. तर व्यासपीठावर स्वामी सागरानंद सरस्वती, देवमामलेदार देवस्थानचे अध्यक्ष व अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष भालचंद्र बागड सतीशदास मोघे महाराज, आचार्य जगद्गुरू, यतीवर्य स्वामी, जगद्गुरू द्वाराचार्य माधवानंद तीर्थस्वामी, श्री श्री १००८ आयुर्वेदाचार्य स्वामी महाराज, महंत भवरगिरी महाराज, डॉ. रघुनाथदास महाराज, गीरीजानंद सरस्वती, काशिनाथदास पाटील, ईश्वरदास चऱ्हाटे, आनंददास कजवाडेकर, नंदाराम करंजाळीकर, साईदास महाराज, भागवताचार्य शास्त्री, योगानंद पवार आदी उपस्थित होते.

श्री.पंडित गुरुजी म्हणाले, देशात आज अल्पसंख्यांक समाजाच्या धर्माच्या नावाखाली हिंदूंचा छळ होत आहे. गोरक्षकांना सापत्नपणाची वागणूक मिळत आहे. हिंदू म्हणून हिंदुस्थानात जगण्याचा अधिकारच हिरावून घेतला जात असले तर धर्माच्या आड येणारा कायदा आम्हाला मंजूर नाही. अल्पसंख्यांकांना जर एट्रोसिटीचे कवच दिले जात असेल तर हिंदू म्हणून आम्हाला हिणवणे हा देखील आमचा अपमान आहे. त्यामुळे हिंदूंना सुद्धा एट्रोसिटीचे कवच बहाल करावे असेही महंत गुरुजी यांनी स्पष्ट केले.

अधिवेशनात महंत पंडित गुरुजींनी पाच ठराव मांडले. या पाचही ठरावांना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात बहुमताने मंजुरी दिली. दरम्यान, शिरपुरच्या श्रीराम मंदिराचे मठाधिपती महंत सतीशदास महाराज भोंगे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले तर धर्मवीर गोरक्षक मच्छिंद्र शिर्के (मालेगाव) यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अधिवेशनापूर्वी ब्रह्मवृंदांचा मंत्र जागर व वैदिकांची बैठक संपन्न झाली. त्यानंतर देवमामलेदारांच्या नियोजित स्मारक परिसरात स्वागताध्यक्ष भालचंद्र बागड व अरुणा बागड यांच्या हस्ते आचार्य जगतगुरू व यतीवर्यांचे पाद्यपूजन करण्यात आले. यावेळी सर्व साधुसंतांनी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर अधिवेशन स्थळापर्यंत सर्वांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत भाविक सर्व साधूसंतांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करत होते.

अधिवेशनात दिलेल्या 'हिंदू धर्माचा विजय असो', 'भारत माता की जय', 'वंदे मातरम', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'संभाजी महाराज की जय' अशा घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते. यावेळी नगराध्यक्ष सुनील मोरे, देवस्थानचे उपाध्यक्ष दादाजी सोनवणे, सचिव धर्मा सोनवणे, रमेश देवरे, कौतिक सोनवणे, रमेश सोनवणे, राजेंद्र भांगडिया, हेमंत सोनवणे, बाबुराव सोनवणे, प्रवीण पाठक, वारकरी संप्रदायाचे संभाजी महाराज बिरारी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, बा. जि. पगार, स्वप्नील बागड, मनोज अमृतकर, योगेश अमृतकार, अविनाश महाजन, ललित सोनवणे, बापू पाठक, मनोहर बिरारी, सुदाम बिरारी, बी. टी. शेळके, गिरीधर पाटील, रामदास पिंगळे, खंडेराव पाटील, याग्निक शिंदे आदींसह नाशिक , नगर, धुळे, पुणे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील हिंदू बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. बी. टी. शेळके यांनी प्रास्ताविक केले. 

देवमामलेदार देवस्थान ट्रस्टने धर्मरक्षणात केलेल्या कौतुकास्पद कार्याबद्दल अधिवेशनात संघातर्फे 'वारकरी रत्न महाराष्ट्र भूषण' पुरस्कार देऊन देवस्थानचा गौरव करण्यात आला. तसेच जगद्गुरू द्वाराचार्य डॉ.अमृताश्रम महाराज यांना 'आचार्य' पदवी प्रदान करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com