विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेत बंडखोरी 

residenational photo
residenational photo

नाशिक : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेला आज मोठा राजकीय झटका बसला. परिषदेच्या निवडणुकीची चर्चा करण्यासाठी आज उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत यांनी बोलाविलेल्या बैठकीला अवघ्या सात नगरसेवकांनी हजेरी लावल्याने शिवसेनेत नाराजांच्या गटाने बंडखोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. राऊत यांचा मनमानी कारभार, ऍड. शिवाजी सहाणे यांची शिवसेनेतून झालेली हकालपट्टी व अजय चौधरी यांना ज्या पध्दतीने नाशिकचा पदभार सोडावा लागला त्यामुळे असंतोष वाढला असून राऊत व विधान परिषदेसाठी घोषणा करण्यात आलेल्या नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारी विरोधात महापालिकेच्या नगरसेवकांनी दंड थोपटले आहे. 
 
शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अजय बोरस्ते यांना महानगर प्रमुख पदावरून हटवून त्यांच्या जागी सचिन मराठे व महेश बडवे या दोघांची नियुक्ती करण्यात आली त्यापाठोपाठ विधान परिषद उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असलेले ऍड. शिवाजी सहाणे यांची हकालपट्टी व संपर्क नेते अजय चौधरी यांनी उध्दव ठाकरे यांच्याकडे नाशिक संदर्भातील तक्रार करून पदभार काढून घेण्याची केलेली विनंती हि शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची प्रमुख कारणे ठरली आहेत.
 यापुर्वी नव्याने नियुक्ती झालेल्या दोन्ही महानगर प्रमुखांच्या पहिल्याचं बैठकीला अवघ्या सात नगरसेवकांनी हजेरी लावल्याने शिवसेनेतील वाद टोकाला गेल्याचे स्पष्ट झाले होते. विधान परिषदेची उमेदवारी येवल्याचे नरेंद्र दराडे यांना घोषित झाल्यानंतर अंतर्गत वाद अधिकचं विकोपाला गेला. महानगरप्रमुख पदाबरोरचं जिल्हा प्रमुख बदलाच्या हालचालींना देखील वेग आला होता. पण ग्रामिण भागातून तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर माघार घ्यावी लागली. अंतर्गत संघर्ष वाढतं असतानाचं जिल्हा संपर्क प्रमुख पदाची सुत्रे भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे देण्यात आल्याने नाराजी अधिक वाढली. त्या पार्श्‍वभूमीवर आज शिवसेना कार्यालयात बैठक बोलाविली. गर्दी होत नसल्याने सकाळी दहा वाजता होणारी बैठक तब्बल अडिच तास उशिराने सुरु झाली. बैठकीला अवघे 37 पैकी सात नगरसेवक उपस्थित राहिल्याने निरोप देवूनही अनुपस्थित राहिलेल्या नगरसेवकांनी शिवसेनेत बंडाचे हत्यार उपसले आहे. 

राऊतांची सारवासारव 
आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर सहा मे रोजी पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची नाशिक मध्ये बैठक होत आहे. त्यात उत्तर महाराष्ट्रातील पक्षाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींशी ते चर्चा करणार असल्याने पुर्वतयारी साठी बैठक आयोजित केली होती. बैठकीला नगरसेवकांना बैठकीला बोलाविले नसल्याची सारवासारव खासदार राऊत यांनी केली खरी परंतू नगरसेवकांना त्यांच्या खासगी मोबाईलवर मेसेज करून बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती महानगरप्रमुखांकडून करण्यात आली होती. गर्दी होत नसल्याने महिला पदाधिकाऱ्यांच्या सत्कार आयोजित करण्याची वेळे शिवसेना नेत्यांवर आली. 

बंडखोरीच्या पायघड्या 
नव्याने नियुक्त झालेल्या संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी आज पदभार स्विकारताना त्यांचे स्वागत बंडखोरीने झाले. नगरसेवक तर अनुपस्थित राहिलेचं शिवाय विरोधी पक्षनेते, गटनेत्यांनी सुध्दा बैठकीकडे पाठ फिरविली. विशेष म्हणजे जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उपमहानगरप्रमुखांच्या गैरहजेरीने देखील शिवसेनेतील नाराजी चव्हाट्यावर आणली. हजर नगरसेवकांमध्ये सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, कल्पना पांडे, रंजना बोराडे, प्रविण तिदमे व स्विकृत नगरसेवक सुनिल गोडसे, ऍड. श्‍यामला दिक्षीत यांचा समावेश होता. महापालिकेत स्विकृत सह शिवसेनेचे 37 नगरसेवक आहेत. त्यातील सात नगरसेवक हजर राहिल्याने खासदार राऊतांसह संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या स्वागताला नाराज नगरसेवकांनी बंडखोरीच्या पायघड्या घातल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com