सुलभता,अचूकतेसाठी स्मार्ट नाशिक ऍप्लिकेशनमध्ये बदल 

residenational photo
residenational photo

नाशिक : महापालिकेतर्फे विकसित करण्यात आलेल्या "स्मार्ट नाशिक' ऍप्लिकेशन मधील तक्रार निवारण कार्यप्रणालीमध्ये सुलभता व अचुकता आणण्याबरोबरचं तक्रारींचे परिणामकारक निवारण करण्यासाठी आमुलाग्र बदल करण्यात आले आहे. ऍप्लिकेशनचे एनएमसी ई-कनेक्‍ट असे नामकरण करताना सात दिवसात तक्रारींचे निवारण करण्याची हमी देण्यात आली असून चोविस तासात तक्रार संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल न घेतल्यास कारवाई देखील होणार आहे. नागरिकांना घरबसल्या तक्रारी दाखल करण्यापासून ते निवारण होण्यापर्यंतचे सर्व हालचाली ऍप्लिकेशन मध्ये ट्रॅकींग होणार असल्याचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. 

सन 2015 पासून महापालिकेने स्मार्ट नाशिक नावाने ऍप्लिकेशन विकसित केले होत्या. परंतू स्मार्ट नाशिक ऍप्लिकेशन हाताळताना सुलभता आणण्यासाठी बदल करण्यात आला. 24 तासात तक्रारींची दखल घेण्याचे बंधन अधिकाऱ्यांना घालण्यात आले असून त्यावर पदोन्नती, पगारवाढ व कारवाई अवलंबून राहणार आहे. विभागिय अधिकारी व विभाग प्रमुख या दोघामार्फतंच तक्रारींचे निवारण होईल. पालिकेच्या कामकाजाची नागरिकांना आधिक सुलभतेने माहिती होण्यासाठी संकेतस्थळावर विविध विभागांचे कर्तव्य, जबाबदाऱ्या व विविध प्रकारच्या ऑनलाईन सेवांची माहिती उपलब्ध करून दिली जाणार असून वेबपेज मध्ये बदल करण्याचे काम सुरु असल्याचे आयुक्त मुंढे यांनी माहिती दिली. 

एनएमसी ई-कनेक्‍ट मध्ये महत्वाचे 
- तक्रारींचे टप्पे कमी करून तीन वर आणले. 
- एकाच ऍप्लिकेशनवर सर्व प्रकारच्या सेवा मिळणार. 
- सेवांची संख्या 45 ते 60 राहणार. 
- तक्रारदारांना विभाग शोधण्याची आवशक्‍यता नाही. 
- तक्रार दिल्यास आपोआप संबंधित विभागाकडे वर्ग होणार. 
- सात दिवसात तक्रारींचे निवारण. 
- तक्रारीचे निवारण न झाल्यास पुन्हा ट्रॅकवर. 
- तक्रारींचे निवारण वेबसाईटवर उपलब्ध होणार. 
- नागरिकांना फिडबॅक, रिओपन व रेटींग देण्याची सुविधा. 
- प्रभागनिहाय तक्रारी मोबाईलवर दिसणार. 

अशी होणार नोंदणी
नवीन कार्यप्रणालीमध्ये तक्रारदारास प्रथम रजिस्ट्रेशन करावे लागणार असून हि प्रक्रिया एकदाच करावी लागणार आहे. एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर तक्रारदाराला मोबाईल एसएमएस द्वारे आयडी व पासवर्ड मिळेल. त्यात तक्रार दाराच्या सर्व तक्रारींचा लेखाजोखा मिळू शकेल. तक्रार रजिस्टर्ड झाल्यानंतर अधिका-यांना 24 तासांत तक्रार बघून सात दिवसात निवारण करायचे आहे. न झाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार वर्ग होईल. तक्रारीची दखल न घेतल्यास प्रणालीद्वारे संबंधित अधिकाऱ्याला ई-मेल द्वारे आपोआप कारणे दाखवा नोटीस मिळेल. 

तक्रारीचे निराकरण करुन ती बंद केल्यावर नागरिक जेव्हा दुसरी तक्रार नोंदवतील त्यावेळी यापुर्वी बंद केलेल्या तक्रारींबाबत फिडबॅक देण्याची सुविधा देण्यात आली ाहे. तक्रारीचे रेटींग संबंधित अधिकायाच्या कामकाजाचे भवितव्य ठरविणार आहे. फिडबॅक मध्ये नागरिकांना कामाचे रॅन्कींग देणे बंधनकारक आहे. रॅन्कींग न दिल्यास दुसऱ्या तक्रारीला पहिल्या तक्रारीचे रॅन्किंग विचारले जाईल. 

घंटागाडीचा मिळणार अलार्म 
घंटागाड्यांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली असताना देखील वेळेत येत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने नवीन ऍप्लिकेशन मध्ये घंटागाडीसह पेस्ट कन्ट्रोलचे जीपीएस ट्रॅकींगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी नागरिकांना प्रथम एकदाच लोकेशन रजिष्टर करावे लागणार आहे. त्यामुळे घंटागाडी नागरिकांच्या घराजवळ आल्यास साधारणत: दहा मिनिटे अगोदर मोबाईल मध्ये अलार्म वाजून वेळेची बचत होण्यास मदत होईल. 

नगरसेवकांबरोबरचं नागरिक देखील ऍप्लिकेशनच्या माध्यमातून कामाची मागणी करू शकतात. ती कामे मार्गी लावताना गरज, व्यवहार्यता व निधीची उपलब्धता हे तीन निकष तपासले जातील.- तुकाराम मुंढे, आयुक्त. 
 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com