बंगल्यांची घरफोडी करणारा अट्टल चोरटा जेरबंद 

thieft accused
thieft accused

नाशिक : बंद असलेल्या बंगल्यांची घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज हातोहात लंपास करणाऱ्या अट्टल घरफोड्याला नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने सापळा रचून अटक केली. 2016 मध्ये घरफोडी करून अट्टल घरफोड्या संशयित गणेश भंडारे नेपाळमध्ये पळून गेल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हता. नेपाळमध्येच आणखी मालमत्ता खरेदीसाठी पैशांची चणचण भासू लागल्याने पुन्हा तो नाशिकमध्ये दाखल झाला . त्यास पोलिसांनी अटक केली. तीन गुन्ह्यांची कबुली त्याने  दिली असून एका सोनारालाही मुंबईत अटक केली आणि 13 लाख 67 हजार रुपयांचे दागिनेही हस्तगत केले आहेत. 

पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाच्या कामगिरीचे कौतूक करून माहिती दिली. टागोरनगरमधील भरत दीपचंद गांग यांच्या बंगल्याच्या खिडकीचे गज कापून लाखो रुपयांचे सोन्याचे दागदागिने चोरून घरफोडीची घटना ऑक्‍टोबर 2016 मध्ये घडली होती. याप्रकरणी संशयित गणेश भंडारे यानेच घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले होते. परंतु तो नेपाळमध्ये पळून गेला होता. त्याच्या मागावर पथकही नेपाळमध्ये गेले परंतु तो हाती लागला नाही. 
 गुन्हे शाखा युनिट एकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांना संशयित भंडारे नाशिकमध्ये आल्याची खबर मिळाली असता, त्यास युनिट एकच्या पथकाने सीबीएस परिसरात सापळा रचून अटक केली. पोलीस चौकशीतून त्याने उपनगर हद्दीमध्ये दोन तर गंगापूर हद्दीत एक असे तीन घरफोडींची कबुली दिली आहे. चोरीचे सोने पॉलिश करून देणाऱ्या मुंबईतील दीपक देवरुखकर यासही पोलीसांनी मुंबईतून अटक केली. त्यांच्याकडून या तीनही घटनातील सुमारे 13 लाख 67 हजार 500 रुपयांचे चोरीचे 547 ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहे. नाशिकसह सांगलीत घरफोड्या करून नेपाळला पळून गेला होता. त्याच्याकडून आणखीही गुन्हयांची उकल होण्याची शक्‍यता आहे. ही कामगिरी आयुक्त डॉ. सिंगल, उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहाय्यक निरीक्षक नागेश मोहिते, महेश कुलकर्णी, दिलीप मोंढे, विशाल देवरे, स्वप्निल जुंद्रे, प्रवीण चव्हाण यांच्या पथकाने बजावली. 

रिसॉर्ट खरेदीसाठी होती पैशांची गरज 
संशयित भंडारे याने नेपाळी युवतीशी विवाह करून तिकडेच त्याने चोरीच्या पैशातून पोखरा (नेपाळ) येथे दोन हॉटेल्स खरेदी केले आहे. तसेच आणखी एक रिसॉर्ट खरेदी करण्यासाठी त्याला पैशांची गरज होती. त्यासाठी पुन्हा नाशिकला आला होता. घरफोडी करून त्यातून मिळालेल्या पैशातून ते रिसॉर्ट खरेदी करायचे होते. तर, नाशिक पोलीसांनी त्याचा शोध घेण्यासाठी इंटरपोलकडेही प्रस्ताव दिला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com