विषाचा पाझरची प्रदूषण मंडळाकडून गंभीर दखल

live photo
live photo


सातपूर : पाथर्डी व परिसरातील लाखभर लोकसंख्येचे आरोग्य संकटात आणणाऱ्या कचरा डेपोतून पाझरणाऱ्या रसायनयुक्त पाण्याच्या गंभीर प्रश्‍नाला "सकाळ'ने वाचा फोडताच यंत्रणा खडबडून जागी झाली. "सकाळ'च्या वृत्ताची तातडीने दखल घेत, मंगळवारी (ता. 3) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने तातडीने या परिसरात पाहणी केली. या ठिकाणी प्रदूषित पाणी जमिनीत मुरत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यांनी परीक्षणासाठी काही ठिकाणांहून पाण्याचे नमुने ताब्यात घेतले आहेत. 

कचऱ्याच्या ढिगावर मेअखेरपर्यंत "कॅपिंग' 
    महापालिकेच्या पाथर्डी येथील डेपोत कचऱ्यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रक्रिया करून कचऱ्याच्या ढिगावर कॅपिंग केले जाईल. हे काम मेअखेर पूर्ण करण्याचे निश्‍चित केले आहे, अशी माहिती महापालिकेच्या यांत्रिकी विभागाकडून देण्यात आली, तर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रदूषण रोखण्यासाठी जमीन भरणा (लॅन्ड फिलिंग) करणार असल्याचे "सकाळ'शी बोलताना सांगितले. 
पाथर्डी येथील कचरा डेपोत अनेक वर्षांपासून कचऱ्यावर प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे जमिनीत रसायनयुक्त पाण्याचा निचरा होऊन ते पाणी चार किलोमीटर परिघातील विहिरी, विंधन विहिरींमध्ये उतरले आहे.

रसायनयुक्त पाण्यामुळे आरोग्यासह शेतीच्याही समस्या निर्माण झाल्या आहेत. विहिरींचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने शेतातील भाजीपाला व फळे पिकविण्याच्या तसेच खाण्याच्या दृष्टीने घातक बनली. रसायनयुक्त पाण्यातून निर्माण होणाऱ्या विषाणूंमुळे गंभीर स्वरूपाच्या आजारांनाही सामोरे जावे लागत असल्याचा निष्कर्ष केटीएचएम महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी नोंदविला. याबाबतचा सविस्तर वृत्तान्त "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेच्या यांत्रिकी विभागातर्फे कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

अशी होईल कारवाई 
महापालिकेतर्फे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम मे. मेलहॅम आयकॉस कंपनीला देण्यात आले आहे. अनेक वर्षांपासूनचा कचरा साचलेला असल्याने त्या कचऱ्यावर कॅपिंग करण्याचे काम सुरू करण्यात आले असून, मेअखेरपर्यंत ते पूर्ण होईल. पावसाचे पाणी कचऱ्याच्या ढिगातून जमिनीत मुरू नये, यासाठी विशिष्ट प्रकारचे नेट लावून कॅपिंग केली जात असल्याची माहिती यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता बाजीराव माळी यांनी दिली. 
 
पर्यावरण व दूषित पाण्याची समस्या सोडविण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने जमीन भरण्याची प्रक्रिया विकसित केली जाणार आहे. 
-तुकाराम मुंढे, आयुक्त, महापालिका 

रसायनयुक्त पाण्याचा वालदेवी नदीतही थेट शिरकाव 
--------- 
    विल्होळीच्या खतप्रकल्पातील (कचरा डेपो) कचऱ्याची पूर्णक्षमतेने विल्हेवाट होत नसल्याने निर्माण झालेल्या रसायनयुक्त पाण्याच्या प्रश्‍नाने परिसरातील नागरिक, शेतकऱ्यांना ग्रासले आहे. हे पाणी पिण्यास अयोग्य, शेती, फळे पिकविण्याच्या, तसेच खाण्याच्या दृष्टीने घातक असल्याचे वास्तव "सकाळ'ने मांडले. त्यानंतर

विहिरींपाठोपाठ आता नैसर्गिक नाल्यांद्वारे नाशिक रोड भागातून वाहणाऱ्या वालदेवी नदीत उतरत असल्याचा प्रकार ग्रामस्थांनी कथन केला. वालदेवी नदीत मिसळणारे रसायनयुक्त पाणी पुढे वाहत जाऊन चेहेडी बंधाऱ्यात मिसळते. महापालिकेकडून ते पाणी वापरासाठी उचलले जाते. येथेही नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न भविष्यात निर्माण होऊ शकतो. 
पाथर्डीच्या खतप्रकल्पाजवळील डेपोत अनेक वर्षांपासून एकावर एक कचऱ्याचे डोंगर साचले. याच ढिगांवर रासायनिक प्रक्रिया होऊन रसायनयुक्त पाणी जमिनीत मुरल्याने थेट आजूबाजूच्या गावांतील विहिरींत पोचले आहे. केटीएचएम महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी या परिसरातील गावांच्या पाण्याचा, तसेच दूरवर असलेल्या मखमलाबाद येथील पाण्याचे नमुने घेत निरीक्षण नोंदवले.

याबाबतचे सविस्तर वृत्त "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामस्थांनी पाणी व आरोग्याबरोबरच अनेक समस्या कथन केल्या. या भागातील 20 ते 22 विहिरींत रसायनयुक्त पाणी झिरपते. त्याशिवाय गौळाणे गावातून गेलेल्या नैसर्गिक नाल्यामधून थेट वालदेवी नदीत हे रसायनयुक्त पाणी झिरपत असल्याची बाब ग्रामस्थांनी सांगितली. 
 

घंटागाडी कर्मचाऱ्यांना आजार 

केटीएचएम महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी शहरातून कचरासंकलन करणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली. या कर्मचाऱ्यांच्या हातापायांवर "मेथिसिलिन रेझीस्टन्ट स्टॅफिलो कोकस ऑटिअस' नावाचे जिवाणू आढळले. प्रतिजैविकांना दाद न देणारे जिवाणूमुळे श्‍वसनाचे व त्वचेचे आजार बळावत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com