हा रुसवा सोड सखे, पुरे हा बहाणा सोड ना अबोला..! 

residenational photo
residenational photo

नाशिक : पती- पत्नीतील वाद, रुसवेफुगवे कुटुंबात नवीन नाहीत. किंबहुना काही कुटुंबात रोजच, तर काही ठिकाणी एखाद्‌ दुसऱ्यावेळी हा वाद दिसतात. त्यासाठी अगदी किरकोळ कारणही पुरेसे ठरते. पण अशाच काही कारणांमुळे प्रकरण थेट पोलिस ठाण्यापर्यंत जाते आणि मग कडाक्‍यांचे भांडण होऊन प्रकरण पोलिस ठाणे, न्यायालयात जाते. संसार मोडतो. दोघेही विभक्त होतात. मुलाबाळांचीही ताटातूट आणि सारेच कुटुंब विचलित होते... न्यायालयीन लढाईने अशाच त्रस्त झालेल्या 136 कुटुंबीयांचे सूर पुन्हा जुळण्यात यश आले आहे. त्यासाठी पोलिस आयुक्तालयाने राबविलेल्या "पुन्हा घरी' या उपक्रमाची महत्त्वपूर्ण मदत झाली आहे. 

पती-पत्नीतील दुरावा वाढल्याने अखेर न्यायालयात प्रकरण जाते आणि मग वर्षानुवर्षे खेट्या मारण्यात अर्धे आयुष्य खर्ची पडते. मग झालेल्या चुकांबद्दल शहाणपण सुचते. नाशिकमधील असेच विभक्त जोडपे, कुटुंबीयांना नाशिक पोलिस आयुक्तालयाने पोलिस ठाण्यांत बोलवत वर्षभरापूर्वी "संवाद सुखी सहजीवनाचा' हा साहित्यिक अनिल अवचट यांच्या समुपदेशनाचा कार्यक्रम ठेवला. या कार्यक्रमाने विभक्त कुटुंबीयांच्या डोळ्यात तरळणाऱ्या अश्रूंनी "पुन्हा घरी'ची वाट निर्माण झाली. 
पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून "पुन्हा घरी' उपक्रम आकाराला आला. बघता-बघता गेल्या वर्षभरात 136 कुटुंबीयांची रुळावरून उतरलेली संसाराची चाकं, पुन्हा रुळावर आणण्यात यश आले. आज ही कुटुंबे गुण्यागोविंदाने एकत्रित "सहजीवना'चा आनंद उपभोगत आहेत.

 
...आणि वाद पोलिस ठाण्यात पोचतो 
कधी अहंकार, तर कधी अविश्‍वास, कधी घरगुती वाद तर कधी विसंवादामुळे वाद विकोपाला जाऊन घरगुती हिंसाचारामुळे प्रकरण पोलिसांत येते. ही तुटलेली नाती जोडण्यासाठी "संवाद सुखी सहजीवनाचा'च्या उपक्रमाचा फार मोठा उपयोग झाला. काही दांपत्यांना आपली चूक लगेच कळते आणि पोलिस ठाण्याची पायरी नको, असे सांगून ते आपापसांतच समझोता करतात व घरातला वाद घरातच मिटवतात. 

"पुन्हा घरी'ची संकल्पना 
महिला सुरक्षा विभाग, अभियोग कक्ष आणि पोलिस ठाणे यांच्या मदतीने अशा विभक्त होऊ पाहणाऱ्या कुटुंबीयांचे मतपरिवर्तन करण्यासाठी समिती नेमली आहे. हे सदस्य दांपत्याला मार्गदर्शन करतात. त्यात दीपाली मानकर, अनिता पगारे, वैशाली बालाजीवाले, ऍड. दीपाली खेडकर, सीमा शिंपी, ऍड. शिरीष पाटील, डॉ. जयंत ढाके, डॉ. अनंत पाटील, डॉ. आरती हिरे, डॉ. मनीष आहेर, प्रा. सुनीता जगताप, गीता जोशी असे समाजसेवक, समुपदेशक, प्राध्यापक व मानसोपचारतज्ज्ञ मदतीला होते. यांनी वारंवार अशा दांपत्यांशी चर्चा करत नेमकेपणे त्यांच्या चुका दाखवून देत सकारात्मकपणे त्यांना सुखी संसाराची जाणीव करून दिली. 

136 कुटुंबीय पुन्हा एकत्रित आनंदाने नांदताहेत, हे पाहताना पोलिसांनाही आनंदच होतो. कुटुंब उद्‌ध्वस्त होणे दुर्दैवीच असते. पण आम्ही करून दाखवले. त्यासाठी आमच्या महिला पोलिस सुरक्षा कक्ष आणि अभियोग कक्षाने अथक प्रयत्न केले. 
"पुन्हा घरी'चा उपक्रम अथकपणे सुरू राहील. 
- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com