निगरगट्ट प्रशासनामुळे सातवा बळी

शिवनंदन बाविस्कर
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

बिबट्याच्या हल्ल्यांचे सत्र काही करून थांबत नसून दिवसेंदिवस हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे. बुधवारी(ता.6) दुपारी उपखेड येथे गायत्री पाटील या बिबट्याच्या हल्ल्यातून बचावल्याची घटना ताजी आहे. तोच रात्री साडे नऊच्या सुमारास सात वर्षीय कुणाल अहिरे या बालकाला बिबट्याने त्याच्या राहत्या झोपडीतून उचलून नेत ठार केले.

पिलखोड (ता. चाळीसगाव) - नरभक्षक बिबट्याने बुधवारी (ता.6) रात्री साडेनऊच्या सुमारास बालकाला ठार करत आतापर्यंतचा सातवा बळी घेतला आहे. तर दुपारी उपखेड येथील एक महिला मृत्यूच्या दाढेतून बचावली. आता मात्र बिबट्या प्रकरण हाताबाहेर गेले असून ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

बिबट्याच्या हल्ल्यांचे सत्र काही करून थांबत नसून दिवसेंदिवस हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे. बुधवारी (ता.6) दुपारी उपखेड येथे गायत्री पाटील या बिबट्याच्या हल्ल्यातून बचावल्याची घटना ताजी आहे. तोच रात्री साडेनऊच्या सुमारास सात वर्षीय कुणाल अहिरे या बालकाला बिबट्याने त्याच्या राहत्या झोपडीतून उचलून नेत ठार केले.

बिबट्याच्या तोंडाला मानवी रक्त लागल्याने त्याचे हल्ले वाढत चालले आहेत. गिरणपट्ट्यात बिबट्याने सहा बळी घेतले. त्यानंतर आजचा सातवा बळी हा मालेगाव तालुक्याच्या हद्दीलगतच झाला आहे. यामुळे परिसरातील ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे.

बिबट्याला मारले का नाही -
काही दिवसांपूर्वी बिबट्या कॅमेऱ्यात ट्रॅप झाला होता. त्यावेळी वन विभागाने त्या भागात शार्प शुटरची गस्त घातली असती. तर आज या बालकाचा बळी आणि महिला जखमी झालीच नसती. मात्र, वन विभागाला बिबट्याला ठार करायचे नसून कार्यवाही दाखविण्यासाठी नवनवीन लोकांना पाचारण करण्याचा देखावाच करायचा आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.

यंत्रणा ठरतेय कुचकामी - 
वनविभाग रोजच कोणत्या ना कोणत्या अधिकाऱ्यांना पाचारण करत आहे. बाहेरच्या राज्यातल्या शार्प शूटर्सना बोलवत आहेत. मात्र, कार्यवाही शून्य आहे. त्यामुळे वनविभाग नुसताच देखावा करत असून सर्व यंत्रणा कुचकामी ठरत आहे.
 

Web Title: Marathi news_The seventh victim, due to negligent administration