ऐन मार्च महिन्यात झालेल्या पाणीकपातीमुळे शहरवासीय नाराज

satana
satana

सटाणा : सटाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ठेंगोडा (ता.बागलाण) येथील गिरणा नदीपात्रातील पाणी योजनेच्या विहिरीने तळ गाठल्याने शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पालिका प्रशासनाने पाणी कपातीचे धोरण स्वीकारले असून येत्या बारा एप्रिलपर्यंत शहरवासीयांना दर चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. उन्हाळ्याच्या सुरवातीलाच ऐन मार्च महिन्यातच मोठी पाणीकपात लादल्याने शहरवासीयांमध्ये पालिका प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर आहे.

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ठेंगोडा नदीपात्रातून तसेच आरम नदीपात्रातून पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. यंदा मार्च महिन्याच्या मध्यावरच शहरात भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे.  गिरणा व आरम नदीपात्र पूर्णपणे कोरडे झाल्याने पाणीपुरवठा योजनांच्या विहिरींनी तळगाठला आहे. ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्र कोरडेठाक झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ठेंगोडा पाणीपुरवठा योजनेची उद्भव विहिरींने तळ गाठला आहे.

पाण्याअभावी पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने पालिका प्रशासनाने आता पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. चणकापूर व केळझर या मध्यम प्रकल्पांच्या पुढील आवर्तनापर्यंत ही पाणी कपात केली जाणार आहे. चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने  जाहीर केले आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींनी मार्च महिन्यातच तळ गाठल्याने पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन करण्यात आले आहे. तरीदेखील शहराच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक मालमत्ताधारकास पूर्ण क्षमतेने पाणी मिळावे यासाठी योग्य नियोजन केले आहे. मे महिन्यातील कडक उन्हाळ्यात या पाणीबचतीचा लाभ होणार असून शहरवासियांना मोठी टंचाई भेडसावणार नसल्याचे पाणीपुरवठा सभापती राहुल पाटील यांनी 'सकाळ' ला सांगितले.

प्रशासनाकडून सहा जलकुभांमध्ये सर्व पाणी योजनांचे पाणी एकत्रित साठवून शहरात चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.

राजमाता जिजाऊ जलकुभांतून अभिमन्यूनगर, शांतीनगर, महाबीज परिसर, शिवाजी नगर, भाक्षीरोडमधील नववसाहतीसाठी २० मार्च ते ९ एप्रिलपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. याच जलकुंभामधून श्रीकृष्णनगर, क्रांतीनगर, सन्मित्र हौसिंग, त्रिवेणी संगम, वृंदावन कॉलनी, समर्थनगर नववसाहतीत २२ मार्च ते ११ एप्रिलपर्यंत चार दिवसाआड पाणीपुरवठा होईल. (कै.) तुकाराम सोनवणे जलकुंभामधून मित्रनगर, गणेशनगर, पी.डी.पी. नगर, न्यू प्लॉट, श्यामजीनगर या वसाहतीत व उपासनी रोड, देवी गल्ली, संभाजी रोड, नामपूरकरचाळ, महात्मा गांधी रोड, फुले रोड वसाहतीमध्ये अनुक्रमे २० मार्च ते ९ एप्रिल व २२ मार्च ते ११ एप्रिलपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येईल. (स्व.) मीनाताई ठाकरे जलकुंभातून २० मार्च ते ९ एप्रिल पर्यंत परशुराम कॉलनी, टेलिफोन कॉलनी, शिवनेरी हौसिंग सोसायटी व सिमानगर तर २२ ,मार्च ते ११ एप्रिल या कालावधीत काळू नानाजी नगर. आर. के. नगर, विश्वास कॉलनी, भिवसन नगर, विष्णू नगर या नववसाहतीत पाणीपुरवठा होईल.

(कै.) पं.ध.पाटील जलकुंभातून २१ मार्च ते १० एप्रिल पर्यंत मालेगाव रोड, पिंपळेश्वर रोड, मंगलनगर तर २३ मार्च ते १२ एप्रिलपर्यंत ताहाराबाद रोड, टिळक रोड, यशवंत लेन, डॉ.आंबेडकर नगर, डॉ. भुतेकर रोड या भागात पाणीपुरवठा होईल. (कै.) नारायण सोनवणे जलकुंभातून २३ मार्च ते १२ एप्रिल या कालावधीत सोनार गल्ली, संभाजी रोड, डॉ.भुतेकर रोड, शिवदे गल्ली तसेच (कै.) दगाजी सोनवणे जलकुंभातून २१ मार्च ते १० एप्रिल पर्यंत पिंपळेश्वर रोड, आराई पांधी, जिभाऊ नगर, मंगल नगर, नवनाथ नगर या परिसरात पाणीपुरवठा केला जाणार आहे.

चणकापूर, पुनंद केळझर धरणातून पाण्याचे आवर्तन येईपर्यंत चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. १२ एप्रिल पासून पाणीपुरवठा सुरळीत होईल तो पर्यंत नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com