‘एसटी’तर्फे शहीद जवानांच्या वीरपत्नीस मोफत पास!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

जळगाव - कर्तव्यावर असताना वीरमरण आलेल्या भारतीय सैन्यातील तसेच सुरक्षा दलातील जवानांच्या वीरपत्नीला राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वच बसमधून आजीवन मोफत प्रवास सवलत मिळणार आहे. येथे १ मेस महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते मोफत पासचे वितरण केले जाणार आहे.

जळगाव - कर्तव्यावर असताना वीरमरण आलेल्या भारतीय सैन्यातील तसेच सुरक्षा दलातील जवानांच्या वीरपत्नीला राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वच बसमधून आजीवन मोफत प्रवास सवलत मिळणार आहे. येथे १ मेस महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते मोफत पासचे वितरण केले जाणार आहे.

देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या वीरपत्नीला आधार देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत सैन्यातील तसेच सुरक्षा दलातील शहीद जवानांच्या वीरपत्नीला महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास योजना लागू केली आहे. महाराष्ट्र दिनापासून राज्यभर या योजनेची अंमलबजावणी होईल. याबाबतचे परिपत्रक महामंडळातर्फे काढण्यात आले असून, जळगाव विभागासही ते प्राप्त झाले आहे.

अधिकारी, पर्यवेक्षकांवर जबाबदारी 
विभागांतर्गत येणाऱ्या जिल्हा सैनिक अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून शहीद जवान व त्यांच्या वीरपत्नीचे छायाचित्र प्राप्त करून घ्यायचे आहे. त्यासाठी त्यांच्या पत्त्यावर भेट देऊन ही कार्यवाही राज्य परिवहन विभागातील अधिकारी, पर्यवेक्षकांना करावी लागणार आहे. त्यानुसार जळगाव विभागीय कार्यालयाकडून जिल्हा सैनिक अधिकारी यांच्याकडून यादी मागविली होती. आठ जणांच्या नावाची यादी प्राप्त झाल्यानंतर महामंडळाच्या वरिष्ठ पातळीवर पाठवून त्यांच्या पासचे ‘स्मार्ट कार्ड’ तयार करण्यात आले आहे.

महाराष्ट्र दिनी पाच जणींना ‘स्मार्ट कार्ड’
जिल्हा सैनिक अधिकाऱ्यांकडून प्राप्त यादीनुसार आठ वीरपत्नींना स्मार्ट कार्ड देण्यात येईल. यातील पाच जणींना महाराष्ट्र दिनी पोलिस कवायत मैदानावर ध्वजवंदन सोहळ्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वाटप केले जाणार आहे. उर्वरित तीन जणांचे स्मार्ट कार्ड हे घरपोच दिले जाईल.

Web Title: Martyr jawan wife free ST pass