वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरणार - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

नंदुरबार - ग्रामीण पोषण पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून सातपुड्यातील कुपोषणावर मात करता येऊ शकेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील, असे त्यांनी जाहीर केले.

नंदुरबार - ग्रामीण पोषण पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून सातपुड्यातील कुपोषणावर मात करता येऊ शकेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील, असे त्यांनी जाहीर केले.

नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी येथे बुधवारी आयोजित जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रजनी नाईक, आमदार डॉ. विजयकुमार गावित, के. सी. पाडवी, उदेसिंग पाडवी, चंद्रकांत रघुवंशी, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, 'एनआरसीद्वारे 15 दिवस उपचार केल्यानंतर बाळाच्या औषधोपचारांवर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी "ट्रॅकिंग सिस्टीम' विकसित करावी. अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्‍यातील आश्रमशाळेत पोषण आहार वेळेत पोचण्यासाठी आवश्‍यक व्यवस्था करण्यात यावी.''

'जिल्ह्याने जलयुक्त शिवार अभियानात चांगले काम केले आहे. तसेच "मागेल त्याला शेततळे' योजनेअंतर्गत उद्दिष्टापेक्षा जास्त काम केले आहे. मागणीनुसार जागा उपलब्ध असेल, तर शेततळ्याचे उद्दिष्ट वाढवून त्यासाठी निधी देण्यात येईल. सोलर कृषिपंपाचे उद्दिष्ट 200 पर्यंत वाढवून त्यासाठीही निधी देण्यात येईल. मुख्यमंत्री म्हणाले, की मार्च 2018 पर्यंत सर्व महसुली गावे विजेने जोडली जातील. या कामात वन विभागाची काही अडचण असल्यास ती तातडीने दूर करावी. विजेचा तुटवडा भासल्यास मध्य प्रदेश सरकारशी बोलून वीज उपलब्ध करून घेऊ.''

आदिवासींच्या कुटुंबाशी संवाद
मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियान आणि इंदिरा आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांना भेट दिली. इंदिरा आवास योजनेत घर बांधलेल्या पोहऱ्या वळवी यांच्याकडून त्यांनी घरबांधणीसाठी मिळालेले अनुदान आणि घरात शौचालय बांधण्याबाबत चर्चा केली. फडणवीस यांनी अमृत पाडवी यांच्या घराला भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. तीर-कमान आणि शिबली (फुलांची टोपली) देऊन पारंपरिक पद्धतीने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले.