मनपाच्या दवाखान्यांना 'औषधरूपी संजीवनी'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

धुळे - तुटपुंज्या औषधसाठ्यावर प्रत्येक दिवस ढकलणाऱ्या येथील महापालिकेच्या दवाखान्यांना अखेर वर्ष-दीड वर्षानंतर पुरेसा औषधसाठा उपलब्ध झाला आहे. ऍलोपॅथी, सर्जिकल, आयुर्वेदिक, मलेरिया आदी विविध विभागांसाठी सुमारे 79 लाखांचा हा औषधसाठा आहे. त्यामुळे येत्या काळात महापालिका दवाखान्यांना औषधसाठा तुटवड्याच्या प्रश्‍नापासून दिलासा मिळाला आहे.

शहरात महापालिकेचे दहा ओपीडी, दोन मॅटर्निटी, एक कुटुंबकल्याण केंद्र व एक आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालय आहे. या सर्व दवाखान्यांत औषधसाठा नसल्याने गेल्या वर्ष-दीड वर्षात वारंवार समस्यांना सामोरे जावे लागले. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना औषधसाठा उपलब्ध करताना मोठी कसरत करावी लागली. मध्यंतरीच्या काळात थोडा फार औषधसाठा उपलब्ध करून दिवस ढकलले.

चौथ्यांदा निघाली निविदा
औषधे पुरवठादारांची बिले थकविल्याने नवीन औषधे पुरविण्यास पुरवठादारांनी नकार दिला होता. याच कारणामुळे महापालिकेला औषध पुरवठ्यासाठी चारदा निविदा काढावी लागली. चौथ्यांदा निविदा काढल्यानंतर त्याला प्रतिसाद मिळाला व हा प्रश्‍न मार्गी लागला.

78 लाखांची औषधे प्राप्त
महापालिकेच्या दवाखान्यांसाठी ऍलोपथीची 45 लाख (55 लाखांपैकी), सर्जिकल- सहा लाख (22 लाखांपैकी), श्‍वानदंश लसी- दोन लाख पाच हजार 545, मलेरिया- 22 लाख 87 हजार 750, आयुर्वेदिक- दोन लाख 62 हजार 242 असा सुमारे 79 लाख रुपयांचा औषधसाठा प्राप्त झाला आहे. आयुर्वेदिक, मलेरिया विभागासाठी यापूर्वीच औषधे प्राप्त आहेत.

दैनंदिन व आवश्‍यक औषधे
महापालिकेच्या दवाखान्यात सर्दी-खोकला, थंडी-ताप अशा आरोग्याच्या नियमित तक्रारी घेऊन रुग्ण येतात. याशिवाय श्‍वानदंश व इतरही आजारांवर उपचारासाठी रुग्ण येतात. यासाठी आवश्‍यक औषधे उपलब्ध झाली आहेत. अँटिबायोटिक, अनार्जेलिक अँटिबायोटिक, अँटिडायरियल, ऍन्टासिड, अँटिऍलेर्जिक, व्हिटॅमिन्स, सिरप, सर्जिकल आयटेम्स आदी प्रकारच्या औषधांचा यात समावेश आहे.

Web Title: medicine in municipal hospital