पीककर्ज मिळण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांकडे बैठक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

नाशिक - खरीप आढाव्याची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असली, तरी जिल्ह्यातील शेतीसाठी आवश्‍यक पीककर्ज मिळण्यात अडचणी आहेत. 2805 कोटींची पीक कर्जाची मागणी असताना, पीककर्ज वाटपात मोठा वाटा असलेल्या जिल्हा बॅंकेकडे मात्र जेमतेम 50 कोटीइतकीच कर्ज वाटपाची क्षमता आहे. त्यामुळे खरिपात पीककर्ज मिळणार कसे?, या विषयावर आज जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांकडे विचारणा केली. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी याप्रश्‍नी उद्या (ता. 25) मुख्यमंत्र्यांकडे  जिल्हा बॅंकेच्या आर्थिक अडचणीबाबत बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले. 

नियोजन सभागृहात झालेल्या खरीप आढावा बैठकीला खासदार हेमंत गोडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी आधिकारी मिलिंद शंभरकर, कृषी सहसंचालक कैलास मोते आदी व्यासपीठावर होते. आमदार जे. पी. गावित, नरहरी झिरवाळ, अनिल कदम, निर्मला गावित, राजाभाऊ वाजे, दीपिका चव्हाण, बाळासाहेब सानप, योगेश घोलप, आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हा परिषद उपाध्यक्षा नयना गावित आदींसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 

पीककर्जाचा आग्रह 
तत्पूर्वी, लोकप्रतिनिधींनी जिल्हा बॅंकेच्या ढासळत्या आर्थिक स्थितीची माहिती देत शेतकऱ्यांना पीककर्ज देणार कसे?, या विषयाने  बैठकीची सुरवात केली. पन्नास कोटी रुपये पीककर्ज देण्याची क्षमता नसल्याने पर्यायी व्यवस्थेबाबत विचारणा केली. आमदार झिरवाळ, श्री. जाधव, श्रीमती चव्हाण आदींनी या विषयावर विचारणा केल्यावर पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री जिल्हा बॅंकेच्या अडचणीशी अवगत आहेत. त्यांच्याशी उद्या या विषयावर बैठक होऊन सकारात्मक निर्णय होईल, असे स्पष्ट केले. 

यंदाही शंभर टक्के पाऊस 
यंदाच्या 2017-18 आर्थिक वर्षातील खरिपासाठी सहा लाख 86 हजार 80 हेक्‍टरवर खरीप पिकांचे नियोजन केले आहे. गतवर्षी सहा लाख 52 हजार हेक्‍टरवर खरिपाचे नियोजन होते. यंदा पाऊस आणि जलयुक्तमुळे खरीप क्षेत्र वाढले आहे. बी-बियाणे, 
कृषी निविष्ठांचा प्रश्‍न उद्‌भवणार नाही, असा दावा करत कृषी अधिकाऱ्यांनी नियोजनाची माहिती दिली. 

- 25 मेपासून उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहीम 
- गावोगावी प्रत्येक 10 हेक्‍टरवर शेतकरी मेळावे 
- प्रत्येक गावात कृषी सहाय्यक कार्यालयाची सोय 
- "डीबीटी'अंतर्गत थेट लाभार्थ्यांना खताचे वाटप 

लोकप्रतिनिधी काय म्हणाले?... 
पीककर्ज देणार असाल तर खरीप बैठक घ्या - नरहरी झिरवाळ 
जिल्हा बॅंकेच्या अडचणीवर मार्ग काढा - जयवंत जाधव 
128 गावांत 2 ट्रॅक्‍टर, 4 नेट हे तोकडे उद्दिष्ट - राजाभाऊ वाजे 
शेततळ्याचे खड्डे खोदले, पण प्लास्टिक नाही - जे. पी. गावित 
कांदाचाळीच्या योजनेबाबत भ्रमनिरास - दीपिका चव्हाण 
जलयुक्तची कामे झालेल्या गावांत टॅंकरची मागणी - निर्मला गावित