ताटातूट झालेल्या तीन वर्षांच्या चिमुरडीची आईशी घडविली भेट

satana
satana

सटाणा : सकाळी सहापासून नजरचुकीने घरातून बाहेर पडून ताटातूट झालेल्या एका तीन वर्षांच्या चिमुरडीची व तिच्या आईशी अवघ्या चार तासांत येथील सामाजिक कार्यकर्ते श्याम बगडाणे यांनी सटाणा पोलिसांच्या सहकार्याने भेट घडवून आणली. काल बुधवार (ता.३०) रोजी शहरात ही घटना घडली. आपली मुलगी सुखरूप मिळाल्याचे पाहून मुलीच्या आईने बगडाणे यांचे आभार मानले. 

सटाणा शहरातील चार फाटा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सकाळी सात वाजता अवघ्या तिन वर्षांची चिमुकली उभी असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. काही वेळानंतर ही चिमुकली रडू लागली. यावेळी काही लोकांनी तिला खाण्यासाठी पाववडा बिस्किट दिले आणि तू कोण, तुझे नाव काय, तू कुठे राहते असे प्रश्न उपस्थित नागरिकांनी तिला विचारले. मात्र लहान असल्याने तिला फारसे निट बोलता येत नव्हते. त्यामुळे ती कावरीबावरी होऊन हमसून हमसून रडू लागली.

परिसरातील दीपाली पान स्टॉलचे संचालक राजेंद्र सोनवणे व कमलेश जगताप यांनी तात्काळ सामाजिक कार्यकर्ते शाम बगडाणे यांना मोबाईलवरून ही घटना सांगितली. घटनेची माहिती मिळताच बगडाणे चार फाट्यावर पोहचले. त्यांनी आजुबाजुला चौकशी केल्यानंतर कोणीही त्या मुलीला ओळखत नव्हते व तिलाही तिचे नाव पत्ता सांगता येत नसल्याने अखेर त्यांनी सटाणा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर बगडाणे यांनी संबंधित चिमुकलीला पोलिस स्टेशनला आणले. 

दरम्यान, शहरातील टिळक रोडवरील मुल्लावाड्यातील एका आदीवासी समाजातील मोलमजुरी करणाऱ्या कल्पना विकास ठाकरे यांनी आपली ३ वर्षांची मुलगी राधा सकाळपासून हरवल्याचे शेजारीच राहणाऱ्या माजी नगरसेवक मुन्ना रब्बानी यांना सांगितले. रब्बानी यांनी तात्काळ सटाणा पोलिसांशी संपर्क साधला असता हरवलेली चिमुकली राधा ठाकरे ही सटाणा पोलिस ठाण्यातच असून तिची आई कल्पना ठाकरे यांना पोलिसांनी बोलावून घेतले. पोलीस ठाण्यात चिमुकलीने आपल्या आईला बघताच तिने पळत जाऊन आपल्या आईला बिलगून मिठी मारली व रडू लागली. हरवलेली आपली चिमुकली डोळ्यासमोर पाहून आई कल्पना ठाकरे यांनाही रडू कोसळले. हा प्रसंग पाहून उपस्थित सर्वांनाच गहिवरून आले. यावेळी रवींद्र देसले, कमलेश जगताप, पोलिस नाईक अनुप्रीत पाटील, जयंत साळुंके, प्रकाश जाधव व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

सकाळी सहा वाजेपासुन घरातून हरवलेली चिमुकली दुपारी बारा वाजता आईच्या ताब्यात दिल्यामुळे एक समाधान मिळाले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते, वन स्टॉप सेंटर समिती व महिला बाल विकास विभागाचे नाशिक जिल्हा सदस्य शाम बगडाणे यांनी यावेळी सांगितले. सटाणा पोलिस व मुलीच्या कुटुंबियांनी शाम बगडाणे यांचे आभार मानले. ताटातूट झालेल्या एका चिमुकलीची तिच्या आईशी भेट घडवून दिल्याबद्दल शहर व तालुक्यातून बगडाणे यांचे अभिनंदन होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com