नाशिकमधील वैभवशाली म्हसरूळला हवे पर्यटन विकासाचे कोंदण

महेंद्र महाजन
गुरुवार, 18 मे 2017

जैन धर्मीयांचे गजपंथ, चामरलेणी, अक्षयतृतीयेला भरणारा महालक्ष्मीदेवीचा यात्रोत्सव आणि बारागाड्या ओढण्याचा सोहळा, पौराणिक संदर्भ असलेले सीतासरोवर यामुळे म्हसरूळ ठाशीवपणे समोर येते. दिंडोरी रस्त्याच्या दुतर्फा वसलेल्या भागाची महापालिकेत समावेश होण्याअगोदर पाच हजारांच्या आसपास लोकवस्ती होती. हीच लोकवस्ती आता वीस हजारांपर्यंत पोचलीय. इथून पुढे असलेल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठासह वणीची सप्तशृंगीदेवी, थंड हवेचे ठिकाण सापुतारा ते सुरतपर्यंत असलेल्या मार्गाचा विचार करता, या भागाचे वैभव खुलविण्यासाठी स्थानिकांनी पर्यटन विकासाचे कोंदण मिळायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली. महापालिकेत समाविष्ट होण्याआधी आणि समाविष्ट झाल्यापासून ते आतापर्यंत म्हसरूळच्या वाटचालीचा घेतलेला लेखाजोखा...

म्हसरूळमध्ये (नाशिक ) मोराडे, उखाडे, मोरे, जाधव, वडजे, सातकर आदी कुटुंबीय, अनुसूचित जमाती आणि पूर्वेला मागासवर्गीय बांधवांची वस्ती आहे. महापालिकेत म्हसरूळचा समावेश होण्याअगोदर स्थानिकांना पोलिसपाटलांच्या विहिरीतील पाणी मोटारसायकल, सायकल, डोक्‍यावरून न्यावे लागत होते. महापालिकेत म्हसरूळचा समावेश झाल्यावर स्थानिकांनी तत्कालीन प्रशासक सुधाकर जोशी यांना निमंत्रित केले. त्यांच्या सन्मानासाठी पाचशे ते सातशे रुपयांची लोकवर्गणी जमा करण्यात आली. त्यांच्या कौतुक सोहळ्याप्रसंगी स्थानिकांनी पाण्याच्या टाकीचा प्रस्ताव मांडला. श्री. जोशी यांनी जलकुंभ मंजूर केला. या जलकुंभाचे काम झाले आणि या भागात पाणी आले. त्यानंतर या भागातील इमारतींची संख्या वाढत गेली. कॉलन्या झाल्या. महापालिकेत समावेश होण्याआधी शाळेसाठी दोन खोल्या होत्या. तत्कालीन सरपंच चंद्रभान मोराडे यांच्या सहभागातून लोकवर्गणी काढून तीन खोल्यांचे बांधकाम करण्यात आले. पण तरीही मोराडेंचे घर, गायकवाडांचे घर, मारुती मंदिर, चावडी अशा गल्लोगल्ली भागात शाळेचे चौदा वर्ग भरत होते. पहिले नगरसेवक मुरलीधर उखाडे यांनी शिक्षणाच्या खोल्यांसाठी सहकार्य केले. महापालिकेने पुढे सहा वर्गखोल्या मंजूर केल्या. सकाळ व दुपारच्या सत्रात एकाच ठिकाणी शाळा भरू लागली. महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या रस्त्यांच्या कामांमुळे पूर्वी गावात असलेले चिखलाचे साम्राज्य हद्दपार होण्यास मदत झाली, पण म्हणून या भागातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे स्वच्छतेचा प्रश्‍न काही केल्या सुटलेला नाही. मखमलाबाद शिवारातील शेती बऱ्यापैकी अबाधित आहे; परंतु म्हसरूळच्या दक्षिणेस व पूर्वेस मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढल्याने भव्य इमारतींसह टुमदार बंगले उभे राहिले. त्यामुळे म्हसरूळला आता खऱ्या अर्थाने शेती शिवार फारसे उरलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे.
 
अतिक्रमणाबद्दल न बोलले बरे!
अतिक्रमणाबद्दल न बोलले बरे, अशी काहीशी भावना स्थानिकांत तयार झाली आहे. महापालिकेच्या असलेल्या जागेत दवाखाना, टपाल कार्यालय, भाजीबाजाराचे आरक्षण होते. पुढे त्याचे काय झाले, हे मात्र स्थानिकांना अद्याप उमगलेले नाही. स्थानिकांच्या माहितीनुसार महापालिकेच्या शाळेचा परिसर सात एकराचा होता. हळूहळू हा भाग वस्तीमध्ये समाविष्ट झाला आहे. महापालिकेच्या कार्यालयात ट्रक शिरल्याने घरपट्टी, पाणीपट्टीचे कार्यालय महापालिकेच्या शाळेच्या आवारात बांधलेल्या सर्वशिक्षा अभियानाच्या नव्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आले. नव्या इमारतीत ई-सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे घरपट्टी, पाणीपट्टी विभाग महापालिकेच्या जुन्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आला. भाजीबाजारामध्ये ओटे आहेत, पण ते पुरेसे आहेत काय, याबद्दल प्रश्‍न कायम आहे. सायंकाळच्या सुमारास म्हसरूळ ते गजपंथ या अर्ध्या किलोमीटर परिसरात भाजीविक्रेते बसतात. ग्राहक चारचाकी, दुचाकी रस्त्यालगत उभे करून भाजी खरेदी करतात. त्यातून अपघाताला निमंत्रण मिळण्याची भीती आहे. पण ठसठसत असलेल्या या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, ही खरी व्यथा आहे. भाजीबाजाराच्या विस्तारातून विक्रेत्यांचा प्रश्‍न सुटणे शक्‍य आहे, अशी सूचना पुढे आली आहे.

पर्यटनाला सीतासरोवर चालना देईल
गजपंथ आणि चामरलेणीला भेट देणाऱ्यांत देशभरातील जैन धर्मीयांचा समावेश असतो. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने हे जसे महत्त्वाचे केंद्र आहे, तसेच पौराणिक पर्यटनाला चालना देण्यासाठी सीतासरोवर परिसराचा विकास होणे अपेक्षित आहे. इथे असलेल्या कुंडांची अवस्था नाजूक बनली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरभर लावण्यात आलेले विविध फलक या भागापर्यंत पोचले आहेत. मात्र, फलकांच्या दिशेने पर्यटकांची पावले वळावीत, असा विकास अद्याप काही झालेला नाही. 1982 पासून सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत. या वाचनालयामधील ग्रंथसंपदा 16 हजारांपर्यंत आहे.

शौचालयांचा प्रश्‍न गंभीर
शौचालयांच्या अनुषंगाने मध्यंतरी करण्यात आलेल्या पाहणीत शौचालयांचे काम पूर्णत्वाचे प्रमाण 25 टक्‍क्‍यांपर्यंत पोचल्याची धक्कादायक माहिती म्हसरूळकरांपर्यंत एव्हाना पोचली आहे. त्याअनुषंगाने माहिती घेतली असता, शौचालयांचे काही जणांना निम्मे अनुदान मिळाले आहे, तर अनेकांची अद्याप अनुदानाची प्रतीक्षा संपली नसल्याचे कारण त्यामागे असल्याचे दिसले. रामवाडी, म्हसोबावाडी या भागात सुलभ शौचालयांची व्यवस्था आहे. वडवाडीमध्ये मात्र अद्याप घरगुती वापराची शौचालये झाली नाहीत. त्यामुळे तातडीने या भागातील शौचालयांची कामे मार्गी लागावीत, अशी विशेषतः कष्टकऱ्यांची अपेक्षा आहे.

म्हसरूळकरांच्या अपेक्षा

  • म्हसोबावाडीत तिसरीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. या वस्तीत शाळेचे वर्ग वाढायला हवेत. पाण्याची व्यवस्था होण्यासाठी स्वतंत्र टाकी असावी. रस्ते आणि विजेची व्यवस्था व्हावी.
  • रामनगर व रामवाडी भागातील रहिवाशांना पाण्याची आवश्‍यकता भासते आहे.
  • स्मशानभूमीची व्यवस्था असली, तरीही तिचा विस्तार होणे गरजेचे आहे.
  • वीजतारा भूमिगत करून कॉंक्रिटीकरणाची कामे मार्गी लागावीत.
  • वणी-सापुतारा-सुरत या वर्दळीच्या रस्त्यावर वेगाने धावणाऱ्या वाहनांवर प्रतिबंधासाठी गतिरोधक अथवा झेब्रा क्रॉसिंगची व्यवस्था करावी.
  • मळे भागातील रस्त्यांचे प्रश्‍न सुटावेत.
  • क्रीडांगणाची व्यवस्था व्हावी.
  • मोबाईलचोरी, मंदिरातील दानपेटी फोडणे, चेनस्नॅचिंग, बंद घरे फोडून ऐवज लंपास करणे अशा गुन्हेगारीच्या प्रकारांमुळे परिसर बदनामीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला. त्याला वेळीच आवर घालत भुरट्यांच्या मुसक्‍या आवळायला हव्यात.

म्हसरूळमधील सीतासरोवर परिसराचा पर्यटनाच्या अंगाने विकास होण्यासाठी "पर्यटन'कडून एक कोटीचा निधी मंजूर झाला आहे. आडगाव- वरवंडी रस्त्याचे काम जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झाले आहे. ही दोन्ही कामे लवकर सुरू होतील. त्यामुळे या भागाच्या विकासाला आणखी चालना मिळण्यास मदत होणार आहे. म्हसरूळ भागाच्या विकासाला माझ्यासह स्थानिक सर्वच नगरसेवक प्रयत्नशील आहेत.
- रंजना भानसी (महापौर)

महापालिकेच्या शाळेचे आठवीपर्यंतचे शिक्षण महापालिकेच्या शाळेत मिळते. त्यापुढील माध्यमिक शिक्षणाची व्यवस्था गावात होणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर शहराच्या विस्तारीकरणात सांस्कृतिक भवन उभारले जावे. स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे.
- विठ्ठल धनाईत (निवृत्त मुख्याध्यापक)

म्हसरूळ मध्यवर्ती ठिकाण असल्याने या भागात कायमस्वरूपी आरोग्यसेवा केंद्र व्हायला हवे. एवढेच नव्हे, तर म्हसोबावाडी, रामगनर, रामवाडी भागातील रहिवाशांना शौचालयांच्या अभावामुळे उघड्यावर शौचाला जावे लागते. या समस्यांचे निराकारण युद्धपातळीवर होणे अपेक्षित आहे.
- अशोक बुरुंगे (माजी नगरसेवक)

प्रवाशांची, भाविकांची आणि पर्यटकांची संख्या पाहता, शौचालयासह स्वच्छतागृहाची उभारणी करणे अत्यंत आवश्‍यक आहे. शहराच्या इतर भागात कॅनॉल रोडचे बळकटीकरण करण्यात आले आहे. त्याप्रमाणे म्हसरूळ भागात काम व्हायला हवे.
- विष्णू सातकर (हॉटेलमालक)

मी आणि माझा मुलगा म्हसरूळमध्ये राहतो. कुटुंबाचा उदरनिर्वाह मोलमजुरीवर अवलंबून आहे. शौचालय उभारण्यासाठी अर्ज माझ्याकडून भरून घेण्यात आला, पण अनुदान काही केल्या मिळाले नाही. त्यामुळे शौचालयाची उभारणी करता आली नाही. सुलभ शौचालयावर अवलंबून राहावे लागते.
- ताराबाई गवारे (कष्टकरी)

रस्ते, पाणी, स्मशानभूमी, महापालिका शाळा इमारत, अशी कामे आतापर्यंत झाली. भाजीबाजारचे ओटे बांधून त्यावर पत्रा टाकण्यात आला. शेजारीच व्यावसायिकांसाठी गाळे उभारायला हवेत. महापौरांनी तसे आश्‍वासनही दिले आहे. त्याची पूर्तता झाल्यास व्यावसायिकांना दिलासा मिळेल.
- वसंत आहिरे (व्यावसायिक)

परिसराचा विस्तार आणि अगदी गुजरातपर्यंतची वाहतूक ध्यानात घेता म्हसरूळच्या चौकात दोन्ही बाजूला प्रवाशांसाठी पिक-अप शेड उभारली जावी. या भागात स्वच्छतागृहे उभारली जावीत.
- संजय निकम (व्यावसायिक)

आडगाव- म्हसरूळ या मार्गावर पथदीप उभारले जावेत. वरवंडी रस्त्याच्या भागात पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्या टाकल्या आहेत. मात्र, म्हसरूळ- आडगाव मार्गावरील भागात वाहिन्या टाकून पाण्याची व्यवस्था करायला हवी.
- सुरेश देशमुख (स्थानिक रहिवासी)