कायद्याच्या पळवाटीतून कोट्यवधींची कमाई

कायद्याच्या पळवाटीतून कोट्यवधींची कमाई

नाशिक - बाटली अन्‌ पिशवीतील बंद पाण्याच्या प्रक्रियेसह गुणवत्तेवर नियंत्रणासाठी यंत्रणा आहे. पण विक्री होणाऱ्या थंड पाण्याच्या जारवर नियंत्रणासाठी कोणतीही यंत्रणा नाही. कायद्यातील नेमक्‍या या पळवाटीचा फायदा उठवत राज्यात कोट्यवधींची कमाई सुरू आहे. शुद्ध पाण्याचा गोरखधंदा तेजीत आहे. उन्हाच्या चटक्‍यात खिशाला परवडणाऱ्या पैशांमध्ये तहान भागवताना आजारांना निमंत्रण मिळते आहे. प्रामुख्याने पोटाशी निगडित आजारांचे प्रमाण अधिक असल्याचे डॉक्‍टरांच्या निदर्शनास आले आहे.

स्थानिक पातळीवर शुद्ध पाण्याच्या नावाखाली उभारलेली अर्थव्यवस्था चिंतेचा विषय बनली आहे. साथीचे उद्रेक झाल्यावर पिण्याच्या पाण्याविषयी सजगता दाखवणारी यंत्रणा त्याकडे काणाडोळा करत आहे. या संबंधाने राज्यभरातील स्थितीचा आढावा ‘सकाळ’ने घेतला. शहर आणि जिल्ह्यात बाटलीबंद पाण्याची समांतर बाजारपेठ आहे. शुद्धतेचे कोणतेही निकष न पाळता विकल्या जाणाऱ्या या पाण्याच्या गुणवत्तेवर कोणतेच नियंत्रण नाही. रेल्वे स्थानके आणि बस स्थानके येथे या बाटल्या सहज मिळतात. उन्हाळ्यात स्वाइन फ्लूपासून दूषित पाण्याचे विकार वाढले असताना शुद्धतेच्या निकषाविना असलेले हे बाटलीबंद पाणी येते कुठून? यावर देखरेखीची व्यवस्था नाही. पाण्याच्या प्रमाणित बाटलीपेक्षा हे पाणी स्वस्त मिळते असल्याने त्यालाच लोक पसंती देतात. 

पेट प्लॅस्टिकचा उपयोग केल्याने जिवाणू सापडत नाहीत. विषाणूचे प्रमाण कमी होते. पाण्याचे गुणधर्म अबाधित राहतात. पण कमी दर्जाच्या प्लॅस्टिकने त्यातील रसायनांच्या परिणामाने पाणी दूषित होण्याची भीती अधिक असते. त्वचेसह रक्ताच्या विकारांचा धोका बळावतो. कमी दर्जाच्या प्लॅस्टिकमध्ये दहा आठवड्यांपेक्षा अधिक काळ पाणी साठवले अथवा वाहनांमध्ये चार तासांपेक्षा अधिक काळ राहिल्यास ते गरम होते. त्यातून कर्करोगासह वंधत्वाला आमंत्रण मिळते. पॅकबंद पाणी प्यायल्याने पोटफुगी, जुलाब, उलटी अशा विकाराचे रुग्ण आढळतात.
- डॉ. विक्रांत जाधव,  नाशिक

लग्नसराईमुळे सुगीचे दिवस
जळगाव : प्रक्रिया करून मिनरल वॉटरनिर्मितीचे जिल्ह्यात प्रमाणित २५ ते २७ प्रकल्प आहेत. उर्वरित २५ प्रकल्प अप्रमाणित (नॉन बीआयएस) आहेत. या प्रकल्पांमध्ये तासाला हजार लिटर पाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध केले जाते. प्रबीआयएस प्रमाणित कारखाने जारसह बाटली आणि पाऊचद्वारे पाणी पुरवतात. लग्नसराईही जोरात असल्याने शुद्ध पाण्याच्या व्यवसायाला सुगीचे दिवस आहेत. 

जारवाल्यांचा सुळसुळाट
सोलापूर ः बीआयएसचे आयएसआय मार्क आणि राज्य सरकारच्या अन्न सुरक्षा मानक कायद्याच्या माध्यमातून बाटली आणि पिशवीतील बंद पाण्याच्या प्रक्रियेप्रमाणे गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा आहे. थंड पाण्याचे जार विकणारे ‘पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर’ त्यामध्ये येत नाही. त्याचा गैरफायदा उठवला जात आहे. जिल्ह्यात तीसवर ‘पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर’ उत्पादक कंपन्या आहेत. 

जारमधील पाणी विनापरवाना
नगर ः जिल्ह्यामध्ये शुद्ध पाणी देण्याच्या नावाखाली जार, बाटल्यातून कोट्यवधींची कमाई होते. जारमधून विकले जाणारे पाणी शुद्ध करण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात पावलोपावली युनिट आहेत. विशेष म्हणजे त्यांना कोणाचीही परवानगी नाही. अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार जारमधून विकले जाणारे पाणी विनापरवाना आहे. 

दूषित पाण्याने ग्रासले
सावंतवाडी ः भरपूर पाऊस आणि स्वच्छ जिल्हा म्हणून नावारूपाला आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला दूषित पाण्याच्या समस्येने ग्रासले आहे. मार्चअखेरीस प्रयोगशाळेतील पाणी तपासणीत १ हजार ८५० पैकी १२० नमुने दूषित आढळले. दुर्गम भागातील स्त्रोतांमधील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले जात नसल्याची धक्कादायक माहिती आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com