तास-दोन तासांचा कार्यक्रम अन नाट्यगृहाचे भाडे मोजा दहा हजार रुपये!

तास-दोन तासांचा कार्यक्रम अन नाट्यगृहाचे भाडे मोजा दहा हजार रुपये!

येवला : जिल्ह्यात काय नाशिक शहरात नाही असे भव्य दिव्य नाट्यगृह येथे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून उभे राहिले आहेत. भुजबळ होते तेव्हा वारेमाप वापर होणारे हे नाट्यगृह मध्यंतरी अडगळीला पडले होते.मात्र आता अनेक समारंभ,व्याख्याने व कार्यक्रमाच्या निमित्ताने या नाट्यगृहाला मागणी वाढली आहे. परंतु तासा-दोन तासांच्या कार्यक्रमासाठी पालिकेने यासाठी होणाऱ्या भाडे आकारणीत अचानकपणे दुपटीने वाढ केली आहे. नाट्यगृहातील सुविधांच्या अभावाचा विचार करता ही भाडेवाढ परवडणारी नसल्याने सर्वच आयोजकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

येवला नाशिक महामार्गालगत भुजबळांनी पुढाकार घेऊन जागेसह निधीची उपलब्धता करत सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च करून साडेसहाशे आसन व्यवस्थेचे दिमाखदार नाट्यगृह येथे उभे केले आहे.भुजबळ असताना येथे येवला महोत्सवाचे आयोजन होऊन या नाट्यगृहात मुंबईतील नामांकित कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी,नामांकित नाटके येथे होत होती. मात्र पुढे भुजबळ अडचणीत येत गेले आणि येथील कार्यक्रम हळूहळू कमी होत गेले.

मागील चार ते पाच वर्षांत तर मोठया कार्यक्रमांचा वानवाच या नाट्यगृहात आहे.कार्यक्रमांचे खर्चिक असलेले आयोजन आणि रसिकांचा फुकट्या वृत्तीमुळे येथे कार्यक्रम घेणे परवडणारे नसल्याने मध्यंतरी दोन वर्षात हे नाट्यगृह कुलूपबंद अवस्थेत होते.

अद्ययावत देखणे व सुविधायुक्त असलेले हे नाट्यगृह खरेतर सांस्कृतिक व्यासपीठ आहे. मात्र भव्य व्यासपीठ व बसण्याची दिमाखदार आसनव्यवस्था यामुळे आता या ठिकाणी येवलेकरांनी व्याख्यानमाला,विविध व्याख्याने, महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन, पुस्तक प्रकाशन, उत्सव अशा प्रकारचे कार्यक्रम घेणे सुरू केले आहे.

अर्थात हे सर्व कार्यक्रम म्हणजे एक दीड तासांचा खेळ असतो, त्यासाठी पालिकेने पाच हजार रुपये भाडे वर्षभरापासून निश्चित केले होते. एखाद्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आयोजक पाच हजाराचा भुर्दंड सहन करून येथे कार्यक्रम घेत होते. विशेष म्हणजे या वर्षी दहावर महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे कार्यक्रमदेखील नाट्यगृहातच झाले ते परवडणाऱ्या भाडे आकारणीमुळे..!

अचानक वाढले भाडे अन अनामतही..!
येथे नव्याने बदलून आलेल्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांच्या शिस्तबद्ध कामकाजाचे कौतुक होत आहे. पण त्यांनीच हा दरवाढ करण्याचा निर्णय लागू केला असून विशेष म्हणजे पाच हजार रुपये अनामत रक्कमदेखील अनिवार्य केली आहे.

यासाठी पालिकेचा कुठला ठराव झालेला नसताना केलेली दरवाढ मात्र चर्चेचा आणि विरोधाचा विषय ठरली आहे.वास्तविक एवढ्या मोठ्या नाट्यगृहासाठी कर्मचारी,वीजबिल व इतर खर्च मोठा असल्याने पाच हजाराचे भाडे तसे कमीच आहे.केलेल्या दरवाढीला विरोध करणेही चुकीचे आहे.परंतु प्रतिसादाअभावी नाट्यगृह बंद राहण्यापेक्षा त्याचा वापर होतोय याचा देखील पालिकेने विचार करणे गरजेचे आहे.

सुविधांची वानवा..
हे नाट्यगृह सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधून पालिकेकडे आयते हस्तांतरित केले आहे.त्यामुळे वीज बिल व कर्मचारी वगळता इतर कशासाठीही पालिकेने यावर खर्च केलेला नाही.विशेष म्हणजे गेल्या कित्येक दिवसांपासून येथील साऊंड सिस्टिम, पंखे, एसी आदी सुविधा बंद अवस्थेत असून जनरेटरची देखील सुविधा नाही.

तसेच बाहेरील बाजूला एकही पथदीप नसल्याने अंधाराचे साम्राज्य कार्यक्रमाच्या वेळेस असते.या सुविधा पालिकेने पुरवण्याची देखील मागणी होत आहे.

कार्यक्रमानुसार घ्या भाडे...
वास्तविक या ठिकाणी व्यावसायिक कार्यक्रमांचे प्रमाण अत्यल्प आहे.जे काय कार्यक्रम होतात त्यात व्याख्याने व  साहित्यिक कार्यक्रमांचे प्रमाण जास्त आहे,असे कार्यक्रम लोकवर्गणीतून किंवा स्वखर्चातून सामाजिक बांधीलकी बाळगत केले जातात.त्यामुळे सरसकट दहा हजाराचे भाडे ठेवण्यापेक्षा कार्यक्रमाचा दर्जा व स्वरूप पाहून भाड्याची विगतवारी करावी अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.

“येथे कार्यक्रमाचे आयोजन हे सामाजिक बांधिलकीतून केले जाते.अधिक भाडे ठेवले तर नाट्यगृहाच्या वापराकडे दुर्लक्ष होणार आहे.याचा विचार करून केलेली दरवाढ कमी करून तीन हजार रुपये प्रमाणे भाडे आकारावे.”
- अर्जुन कोकाटे,अध्यक्ष,समता प्रतिष्ठान

“नाट्यगृहात सुविधांचा अभाव असून साऊंड सिस्टिम,जनरेटर,पाणी,पंखे आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.तसेच केलेली दरवाढ चुकीची असल्याने ती रद्द करून अनामत रक्कमही आकारणे थांबवावे.”
- नानासाहेब शिंदे,सामाजिक कार्यकर्ते

“पाच लाखांचा अन खर्च दीड लाखांचे उत्पन्न अशी काहीशी विसंगत स्थिती आहे.त्यामुळे नाट्यगृहाच्या खर्च परवडत नसल्याने या आकारणीत वाढ केली आहे.
- श्री. शिंदे,नगरपालिका अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com