दुकान फोडून २२ लाखांचे मोबाईल लंपास

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

जळगाव - शहरातील प्रमुख कोर्ट चौकातील जे. टी. चेंबरमधील मोबाईल दुकानात चोरट्यांनी शटरच्या सेंटर लॉक सहा ठिकाणी कटर मारून तोडून सुमारे २२ लाखांचे मोबाईल लांबविले. गुरुवारी (ता. ६) मध्यरात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटे चोरी करताना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्यावरून पोलिसांचे पथक चोरट्यांच्या शोधार्थ रवाना झाले आहे.

जळगाव - शहरातील प्रमुख कोर्ट चौकातील जे. टी. चेंबरमधील मोबाईल दुकानात चोरट्यांनी शटरच्या सेंटर लॉक सहा ठिकाणी कटर मारून तोडून सुमारे २२ लाखांचे मोबाईल लांबविले. गुरुवारी (ता. ६) मध्यरात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटे चोरी करताना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्यावरून पोलिसांचे पथक चोरट्यांच्या शोधार्थ रवाना झाले आहे.

जुने जळगाव परिसरातील श्रीकृष्ण कॉलनीमधील रहिवासी राजेंद्र अरुण बारी व पुरुषोत्तम अरुण बारी या भावांचे ‘शिवतीर्थ’ मैदानासमोरील जे. टी. चेंबरमधील ‘जी-१’ क्रमांकाच्या गाळ्यात ‘वायरलेस वर्ल्ड’ हे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. दोन्ही भावांनी सुरू केलेल्या या नवीन दुकानाचे गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला उद्‌घाटन झाले होते. दुकानात राजेंद्र, पुरुषोत्तम यांच्याव्यतिरिक्त चार कर्मचारी काम करतात. गुरुवारी (ता. ६) रात्री साडेनऊच्या सुमारास बारी बंधू दुकान बंद करून घरी गेले. आज सकाळी साडेनऊला नीलेश झेरॉक्‍सच्या मालकांना बारी यांच्या दुकानाचे शटर तुटलेले दिसले. त्यांनी  राजेंद्र बारी यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून शटर तुटल्याची माहिती दिली. लगेच बारी बंधू घटनास्थळी पोहोचले. दुकानाचे तुटलेले शटर उघडल्यानंतर मोबाईलची चोरी झाल्याचे निदर्शनास आले.

‘सीसीटीव्ही’त चोरटे कैद
दुकानात लावण्यात आलेल्या ‘सीसीटीव्ही’त चोरी करताना चोरटे कैद झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेजनुसार गुरुवारी (ता. ६) रात्री ११.५७ ला तोंडाला रुमाल बांधलेल्या चोरट्याने दुकानात प्रवेश केला. काही वेळ चोरट्याने दुकानात मोबाईल शोधले. मात्र, मोबाईल सापडत नसल्याने १२.०३ ला त्याने कोणाला तरी दूरध्वनी केल्यानंतर चोरट्याने काउंटरच्या खाली असलेले ड्रॉवर तोडले. त्यातील ओप्पो, विवो, जिओनी असे २२ लाखांचे ११४ मोबाईल बॅगमध्ये भरले. तसेच जाताना चार्जर व मोबाईलची खाली खोकी चोरट्याने दुकानातच फेकली. दुकानात काही कंपन्यांचे महागडे मोबाईल दुरुस्तीसाठी आले होते. मात्र, त्या मोबाईलला हात न लावता मध्यरात्री १.३२ ला दुकानाचे शटर खाली टाकून चोरटा पसार झाल्याचे या फुटेजमध्ये दिसत आहे. फुटेज ताब्यात घेतले.

पोलिस अधिकाऱ्यांकडून पाहणी
दुकानात घडलेल्या चोरीची माहिती बारी यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दिली. तासाभरानंतर पोलिस निरीक्षक एकनाथ पाडळे, उपनिरीक्षक देवरे यांच्यासह पोलिस कर्मचारी नाना तायडे, राजेंद्र मेढे, अल्ताफ पठाण, अजित पाटील, शेखर पाटील हे घटनास्थळी आले. निरीक्षक पाडळे यांनी दुकानाची पाहणी केली. यावेळी ठसेतज्ज्ञांनाही बोलाविण्यात आले. यानंतर भुसावळचे सहाय्यक पोलिस अधीक्षक नीलोत्पल व अप्पर पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनीदेखील घटनास्थळी दुकानाची पाहणी करीत चोरीची माहिती घेतली. यानंतर चोरट्यांच्या शोधार्थ पथक रवाना झाले.

याच प्रकारच्या चोरीची माहिती दुसऱ्या जिल्ह्यामधून घेतली जात आहे. चोरट्यांच्या शोधात पोलिसांचे पथक रवाना केले असून, दुकानात कोण आले, याची चौकशी करून लवकरच चोरट्यांना जेरबंद केले जाईल.

- मोक्षदा पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक

Web Title: mobile theft in jalgav