सर्वाधिक बैलगाड्या विक्रीची लोहार यांची ‘हॅट्‌ट्रिक!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

सारंगखेडा यात्रोत्सवात पटकावला मान; बैलगाडी विक्रेता संघटनेतर्फे सत्कार

सोनगीर - आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने परंपरागत लघुउद्योग डबघाईला आले आहेत. हे वास्तव असले तरी लघुउद्योजकांनी नावीन्याचा शोध घेत आधुनिकतेशी जुळवून घेतले, तर अद्यापही परंपरागत व्यवसायाला ‘अच्छे दिन’ येऊ शकतात, असे येथील ताराचंद सुकलाल लोहार यांनी सांगितले.

सारंगखेडा यात्रोत्सवात पटकावला मान; बैलगाडी विक्रेता संघटनेतर्फे सत्कार

सोनगीर - आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने परंपरागत लघुउद्योग डबघाईला आले आहेत. हे वास्तव असले तरी लघुउद्योजकांनी नावीन्याचा शोध घेत आधुनिकतेशी जुळवून घेतले, तर अद्यापही परंपरागत व्यवसायाला ‘अच्छे दिन’ येऊ शकतात, असे येथील ताराचंद सुकलाल लोहार यांनी सांगितले.

सारंगखेडा (ता. शहादा) येथील श्री दत्त यात्रोत्सवात त्यांनी बनविलेल्या बैलगाड्यांना चांगली मागणी झाली. नोटा बंदीचा फटका बसला असूनही त्यांनी बनविलेल्या व विक्रीसाठी ठेवलेल्या सर्व १८ बैलगाड्या अवघ्या दहा दिवसांत प्रत्येकी १५ ते १८ हजार रुपयांत विकल्या गेल्या. यात्रेत सर्व बैलगाड्यांची सर्वप्रथम विक्री करणाऱ्या येथील ताराचंद लोहार यांचा बैलगाडी व्यापारी संघटनेतर्फे नुकताच सत्कार करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते.

सारंगखेडा यात्रा घोडे तसेच बैलगाडी विक्रीसाठी प्रसिद्ध असून, सोनगीर, पारोळा, चाळीसगाव, धुळे आदी भागातून एक हजारांहून अधिक बैलगाड्या विक्रीसाठी उपलब्ध होत्या. नोटबंदीच्या काळातही सगळ्यात आधी संपूर्ण बैलगाड्या विकून ताराचंद लोहार यांनी बाजी मारली. हा मान दोन वर्षांपासून त्यांच्याकडेच होता. यंदा  सगळ्यात आधी बैलगाड्या विकून त्यांनी विक्रमाची हॅट्‌ट्रिक केली. यानिमित्त त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. बैलगाडीचे सर्व व्यापारी, वनरक्षक, वनाधिकारी उपस्थित होते.

तिवस जातीच्या लाकडापासून बैलगाडी बनवली जाते. पूर्वी बैलगाडी बनविण्यात ९५ टक्के लाकडाचा वापर होत असे. आता चाके लोखंडी येत असल्याने ६० टक्के लाकडाचा वापर होतो. गावोगावी ट्रॅक्‍टरची संख्या वाढत असल्याने बैलगाड्यांची मागणी कमी होत आहे. कारागिरांवर बेरोजगारीचे संकट आले आहे. या पार्श्‍वभूमीवर स्वस्त, टिकाऊ व वेगळेपण जपणारे बैलगाडी बनविल्यास ती शंभर टक्के विकली जाते. यामुळे दरवर्षी यात्रेतून ५० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत नफा मिळतो. त्यासाठी मुलगा धर्मेंद्र, हितेश, ललित यांचे सहकार्य लाभते, असे श्री. लोहार यांनी सांगितले.

Web Title: Most of bullock carts selling lohar hatrick