दुष्काळी गावांची महिनाभरात घोषणा - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

मुक्ताईनगर - राज्यात दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील सर्वेक्षण पूर्ण झाले असून, येत्या महिनाभरात दुष्काळग्रस्त गावांची घोषणा केली जाईल, तसेच दुष्काळी तालुक्‍यांना तातडीने लाभ देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली. शिवाय येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत शेतकरी कर्जमाफीची रक्‍कम शेतकऱ्यांना अदा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुक्ताई शुगर एनर्जी अँड प्रा. लि.च्या चौथा गाळप हंगाम व 12 मेगावॉटचा सहवीजनिर्मिती प्रकल्पाच्या उद्‌घाटन समारंभात ते बोलत होते. पाटील म्हणाले, की शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योग व आधुनिक शेतीकडे वळावे. शेतकऱ्यांना थकीत वीजबिलांचे हप्ते पाडून देण्यासंदर्भात ऊर्जामंत्र्यांशी चर्चा केली जाईल. मात्र शेतकऱ्यांनीही वीजबिलांचा भरणा वेळेत करणे अपेक्षित आहे. अन्यथा, कर्जमाफी आणि थकबाक्‍यांमुळे राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढतच जाईल.

आमदार एकनाथराव खडसे यांनी सांगितले, की जिल्ह्यातील काही भाग दुष्काळाच्या छायेत आहे. त्यातही मुक्ताईनगर मतदारसंघात दुष्काळाची तीव्रता भयंकर आहे. त्यामुळे मतदारसंघातील उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्या पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला कायमस्वरूपी वीज मिळावी. शेतीपंपाचे वीज कनेक्‍शन कट करण्यापेक्षा वीजबिल भरण्यासाठी हप्ते पाडून देण्याची मागणीही त्यांनी केली.

टाकाऊ पदार्थांचेही उत्पन्न
कमी पाण्यात आधुनिक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी ठिबकचा वापर करावा. जे शेतकरी कारखान्याला ऊसपुरवठा करतील, त्यांना जिल्हा बॅंक ठिबकसाठी कर्जपुरवठा करेल. त्या कर्जाला कारखाना जामीन देईल. याशिवाय शेतकऱ्यांना शेतातील टाकाऊ पदार्थांपासून उत्पन्न देण्याचा प्रयत्न आहे. यात कापसाचे उत्पन्न घेतल्यानंतर शेतातील परकाठी कारखान्यातर्फे मशिनद्वारे उपटून त्याच्या कुट्टीला 1700 रुपये भाव, तसेच सोयाबीनचा कुट्टीला 2100 व मक्‍याचे उत्पन्न घेतल्यानंतर उरलेल्या भुकट्याला 2100 भाव दिला जाईल. याचा वापर इंधनासाठी केला जाणार आहे, असेही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.