पैशांचा पाऊस पाडणाऱ्या भोंदूबाबासह चार अटकेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

पूजेच्या साहित्यासह पाचशेच्या नोटा जप्त

पूजेच्या साहित्यासह पाचशेच्या नोटा जप्त
मुक्ताईनगर/बोदवड - तालुक्‍यातील कोथळी येथील राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कारप्राप्त नीलेश भील व त्याचा भाऊ गणपत हे दोघे चिमुकले गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यांचा तपास करणाऱ्या पोलिस पथकाच्या हाती आज पैशांचा पाऊस पाडण्याचा खेळ मांडलेले चार भोंदूच पूजेच्या साहित्यासह लागले. या भोंदूंमध्ये शिरपूरच्या तिघांसह मुक्ताईनगर परिसरातील वादग्रस्त आदेशबाबाचा समावेश आहे. पोलिसांनी पूजेचे साहित्य, पाचशेच्या नव्या नोटा व काही हत्यारेही या त्यांच्याकडून जप्त केली आहेत. मुक्ताईनगर व बोदवड पोलिसांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कारप्राप्त नीलेश व त्याचा भाऊ गणपत भील यांचे कोथळी येथून अपहरण झाल्याच्या घटनेला आठ दिवस उलटूनही त्यांचा शोध लागला नाही. पोलिस प्रशासन जिवाचे रान करून बालकांचा शोध घेत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बोदवड रस्त्यावर हिंगणे घाटीत पैशांचा पाऊस पाडण्याच्या व नरबळीच्या संशयावरून आदेशबाबा नावाच्या सराईत व्यक्तीला व त्यासोबतच्या तीन जणांना मुक्ताईनगर व बोदवड पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान घटनास्थळावरून पूजेचे साहित्य, तलवार, सुरा, कोयता तसेच लोखंडी सळ्या व 500 रुपयांच्या नवीन नोटा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

अपहृत बालकांचा काही धागा गवसतो का, याकरिता आदेशबाबाला पोलिसी खाक्‍या दाखवून तपास केला जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.