मुंगसे केंद्रावर कांदा उत्पादकांची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

मालेगाव - येथील बाजार समितीच्या मुंगसे कांदा खरेदी-विक्री केंद्रावर कांद्याचे वजन केल्यानंतर प्रत्यक्ष काटा पावतीत कमी वजन दर्शविले जात असून, व्यापारी व समितीचे मापारी संगनमताने शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप कौळाणे येथील शेतकरी तुषार बच्छाव यांनी निवेदनाद्वारे केला. त्यांनी या संदर्भात बाजार समिती व तालुका पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. 

श्री. बच्छाव यांनी आज मुंगसे केंद्रावर ट्रॅक्‍टरमधून (एमएच 41- एफ 185) कांदा विक्रीसाठी आणला होता. त्यांच्या कांद्याला 567 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. लिलाव झाल्यानंतर त्यांनी ट्रॅक्‍टरसह कांद्याचे वजन केले. एकूण 71 क्विंटल 35 किलो वजनातून ट्रॅक्‍टर ट्रॉलीचे 36 क्विंटल 30 किलो वजन जाता निव्वळ कांद्याचे वजन 35 क्विंटल 5 किलो भरले. यानंतर ते वजनकाटा पावती घेण्यासाठी गेले असता, त्यांना 33 क्विंटल 5 किलोची पावती देण्यात आली. वजनकाटा पावती व बाजार समितीकडून देण्यात आलेली पावती यात तब्बल दोन क्विंटलचा फरक आढळला. श्री. बच्छाव यांनी हा प्रकार निदर्शनास आणून देऊनही संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष करत 33 क्विंटल 5 किलोच वजन असल्याचे सांगितले. बच्छाव यांची मागणी फेटाळून लावत त्यांना अरेरावी केली. तब्बल दोन क्विंटल माल कमी दाखविण्यात आल्यामुळे बच्छाव यांनी बाजार समिती मुख्य कार्यालय, मुंगसे केंद्र व पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. या प्रकाराबाबत त्यांनी संताप व्यक्त केला असून, सखोल चौकशीची मागणी निवेदनात केली. 

मुंगसे केंद्रावर असे प्रकार नेहमी घडतात. मी सुशिक्षित असल्यामुळे फसवणुकीचा प्रकार लक्षात आला. व्यापारी व मापारी यांचे संगनमत आहे. आधीच कांद्याला मातीमोल भाव मिळत असून, वजनकाट्यात शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. बाजार समिती प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. न्याय न मिळाल्यास शेतकऱ्यांसह आंदोलन करू. 
- तुषार बच्छाव, शेतकरी, कौळाणे 

या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. बाजार समिती शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्याची लूट होऊ देणार नाही. चौकशीत दोषी आढळल्यास व्यापारी व मापाऱ्यांवर कारवाई केली जाईल. 
- सुनील देवरे, उपसभापती, बाजार समिती