निवडणुकीपूर्वी गाळ्यांचा प्रश्‍न मार्गी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

जळगाव - महापालिकेचे आर्थिक तसेच सर्व प्रश्‍न गाळे प्रकरणावर अवलंबून आहेत. गाळे प्रकरणावर न्यायालयानेही आदेश दिले असल्याने गाळ्यांचा प्रश्‍न आधी हाती घेऊन तो निवडणुकीपूर्वी मार्गी लावू, अशी माहिती महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.

जळगाव - महापालिकेचे आर्थिक तसेच सर्व प्रश्‍न गाळे प्रकरणावर अवलंबून आहेत. गाळे प्रकरणावर न्यायालयानेही आदेश दिले असल्याने गाळ्यांचा प्रश्‍न आधी हाती घेऊन तो निवडणुकीपूर्वी मार्गी लावू, अशी माहिती महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.

महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार श्री. डांगे यांनी आज स्वीकारला, त्याप्रसंगी ते बोलत होते. महापालिकेत नव्याने कार्यभार स्वीकारलेला असला, तरी शहरातील समस्या माहिती करून घेतल्या आहेत. ‘मनपा’ची आर्थिक स्थिती बिकट असून नागरी सुविधा उपलब्ध करून देणेही कठीण झाले आहे. ही सर्व जाणीव असून गाळे लिलावाचा प्रश्‍न मार्गी लावल्याशिवाय आर्थिक स्थिती सुधारणार नाही.

२५ कोटींतून कामे लवकरच होणार
मुख्यमंत्र्यांनी शहराच्या विकासकामांसाठी दिलेल्या २५ पैकी १८ कोटींची कामे मंजूर झाली आहेत. येत्या महासभेत ठराव करून लवकरच कामांना सुरवात केली जाईल. तसेच काही कामे सुरू करण्यामध्ये निवडणूक आचारसंहितेचा अडथळा येऊ शकतो, असेही ते म्हणाले.

विभागप्रमुखांची बैठक
आयुक्त डांगे यांनी सकाळी पदभार स्वीकारल्यानंतर महापालिकेतील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. बैठकीत आयुक्तांनी विभागप्रमुखांची ओळख करून घेत कामकाजाचा आढावा घेतला. त्या-त्या विभागातील कामांचे नियोजन व त्यासंबंधीच्या अहवालाबाबत सूचनाही दिल्या. 

महापौरांनी केले स्वागत 
महापालिका आयुक्त डांगे यांनी पदभार स्वीकारल्यावर महापौर ललित कोल्हे यांनी त्यांचे दालनात जाऊन स्वागत केले. यावेळी ‘खाविआ’चे गटनेते सुनील महाजन, माजी स्थायी समिती सभापती नितीन बरडे, नगरसेवक श्‍यामकांत सोनवणे, अनंत जोशी आदी उपस्थित होते. 

.. तर ‘हुडको’चा प्रश्‍न सुटेल
‘मनपा’ने घेतलेल्या कर्जापेक्षा अधिक रक्कम ‘हुडको’ला दिलेली आहे. आतापर्यंत ३१२ कोटी रुपये ‘मनपा’ने भरले असले, तरी ‘हुडको’च्या डिक्री नोटीसप्रमाणे पैसे वनटाइम सेटलमेंटने भरावे लागल्यास तेवढा ‘मनपा’कडे पैसा पाहिजे. त्यामुळे गाळ्यांचा प्रश्‍न आधी मार्गी लावू. त्यानंतर ‘हुडको’ कर्जाचा प्रश्‍न सुटेल, असे आयुक्तांनी सांगितले.

आठ दिवसांत गाळ्यांवर कारवाई?
नव्या आयुक्‍तांनी पदभार स्वीकारताच गाळे प्रकरणाची सविस्तर माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. गाळे जप्तीच्या कारवाईस कोणताही अडथळा नसल्याचेही त्यांनी सूचक विधान केले असून, येत्या आठ दिवसांत ‘मनपा’ प्रशासनाकडून गाळे जप्तीची कारवाई केली जाऊ शकते, असे सांगितले.

Web Title: municipal election shop chandrakant dange