चांदोऱ्याच्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची मृत्यूनंतरही अवहेलना

चांदोऱ्याच्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची मृत्यूनंतरही अवहेलना

रुग्णवाहिका नाकारली; मृतदेह तहसीलसमोर

नांदगाव - सततची नापिकी आणि व कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्‍यातील चांदोरा येथील नामदेव पवार यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. शेतकऱ्याचा मृतदेह नेण्यासाठी १०८ क्रमांकाची व पिंपरखेड आरोग्य केंद्राने रुग्णवाहिका देण्यास नकार दिल्याने संतप्त नागरिकांनी मृतदेह ट्रॅक्‍टरमधून नेऊन तडक तहसील कार्यालय गाठून त्याच्यासमोर शेतकऱ्याचा मतदेह ठेवल्याने एकच खळबळ उडाली. 

या सर्व प्रकारामुळे प्रशासकीय यंत्रणेतील बेफिकिरी व मस्तवालपणा यानिमित्ताने समोर आला आहे. मृत्यूनंतरही शेतकऱ्याच्या मृतदेहाची अशी अवहेलना होण्याचा हा बहुधा पहिलाच प्रकार असावा. मृतदेह आणण्यासाठी रुग्णवाहिका नसते, असा तांत्रिक युक्तिवाद करून शेतकऱ्याचा मृतदेह आणण्यासाठी रुग्णवाहिका द्यायला नकार देणाऱ्या आरोग्य विभागाच्या अनास्थेचे धिंडवडे मात्र या घटनाक्रमाने निघाले आहेत. 

चांदोरा येथील नामदेव ओंकार पवार पहाटे घरातून निघून गेले. त्यांचा गावात सर्वत्र शोध घेतल्यानंतर गावठाणातील स्मशानभूमीजवळ असलेल्या विहिरीबाहेर त्यांची गोधडी व चपला दिसल्या. अधिक शोधानंतर पवार यांचा गाळात रुतलेला मृतदेह आढळला. मृतदेह घेऊन जाण्यासाठी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका आणि पिंपरखेड आरोग्य केंद्राला कळविण्यात आले. दुपारी बारापासून पोलिस व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेची नागरिक प्रतीक्षा करीत होते. पोलिस घटनास्थळी उशिरा आल्याचा आरोप नागरिकांनी केला. 

पण खरा कळस केला, तो पिंपरखेड प्राथमिक आरोग्य केंद्राने. रुग्णवाहिका पाठविण्याची वारंवार मागणी करूनही यासाठी रुग्णवाहिका देता येत नसल्याचे कारण देऊन रुग्णवाहिका देण्यास नकार देण्यात आला. या प्रकारामुळे नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी मृतदेह ट्रॅक्‍टरमध्ये टाकून विच्छेदनासाठी नांदगावला आणला. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्याऐवजी थेट तहसील कार्यालयासमोर आणला. या वेळी चांदोरेचे माजी सरपंच हरीश सुर्वे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष नीलेश चव्हाण, ‘आप’चे तालुकाध्यक्ष विशाल वडघुले, शिवाजी जाधव, मदन वाळुंज, मच्छिंद्र राठोड, गजानन देवकर, विश्‍वनाथ चव्हाण यांनी तहसील प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. 

पिंपरखेडला असंख्य तक्रारी
शेतकऱ्याचा मृतदेह तहसील कार्यालयासमोर ठेवल्यामुळे शासकीय यंत्रणेची एकच धांदल उडाली. तहसीलदार चंद्रकांत देवगुणे बाहेरगावी असल्याने निवासी नायब तहसीलदार मीनाक्षी बैरागी यांनी गटविकास अधिकारी जगनराव सूर्यवंशी यांना तातडीने पाचारण केले. पिंपरखेड येथील आरोग्य केंद्र नेहमीच विवादात असते. गेल्या महिन्यात त्याला संतप्त नागरिकांनी टाळे ठोकले होते. या सर्व प्रकारची माहिती असलेले गटविकास अधिकारी सूर्यवंशी यांनी आजचा प्रकार बघून याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मिणा यांना आपण उद्याच अहवाल पाठणार असल्याचे सांगितले. या आश्‍वासनावर विश्‍वास ठेवून ग्रामस्थांनी विच्छेदनासाठी मृतदेह तहसीलसमोरून ग्रामीण रुग्णालयात नेला. सायंकाळी पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सव्वादोन लाखांचे कर्ज
आत्महत्या केलेले शेतकरी नामदेव ओंकार पवार (वय ५८) यांच्यावर मध्यम मुदतीचे २२ हजार, तर चांदोरे सोसायटीचे दोन लाख रुपयांचे असे दोन लाख २२ हजारांचे कर्ज होते. त्यांच्या मागे पत्नी, आई, दोन मुलगे, पाच मुली असा 
परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com