औंदाणे जवळ नंदुरबार-नाशिक बसला अपघात चार प्रवासी गंभीर जखमी

da32f6b7-24c4-4bee-8097-ef1.gif
da32f6b7-24c4-4bee-8097-ef1.gif

सटाणा : शहरापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरील औंदाणे शिवारात आज मंगळवार (ता.२६) रोजी सकाळी ८ वाजता नंदुरबार हून नाशिककडे भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने ओव्हरटेक करण्याच्या नादात मालवाहु ट्रकला पाठीमागून दिलेल्या धडकेने मोठा अपघात झाला. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र बसमधील एकूण १३ प्रवासी जखमी झाले असून चार प्रवासी गंभीर जखमी आहेत.

येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी त्यांना नाशिक व मालेगाव येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान, भरधाव वेगाने बस चालवून अपघातास कारणीभूत ठरलेल्या बसचालकाविरोधात सटाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज सकाळी साडेपाच वाजता बसचालक गोकुळ पुंडलिक बेलदार हे नंदुरबारहून बस (क्र. एम. एच.०७ सी.९१६१) ने प्रवाशांना घेऊन नाशिककडे निघाले होते. अत्यंत भरधाव वेगात असलेली ही बस सकाळी आठ वाजता विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरील औंदाणे (ता.बागलाण) शिवारात एस. आर. पेट्रोलपंपासमोर येताच सटाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रक (क्र. टी. एन. ३४ यु. ६०२३) ला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र बसचालक बेलदार यांचा बसवरील ताबा सुटला आणि बस मालवाहू ट्रकला जाऊन धडकली. अचानक झालेल्या अपघातामुळे बसमधील प्रवाशांची एकच धांदल उडाली. काही प्रवाशांच्या डोके, नाक, हात व पायाला गंभीर दुखापत झाली. अपघाताच्या आवाजामुळे पेट्रोलपंपावरील कर्मचारी व परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढले.

यावेळी एका शेतकऱ्याने १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेस संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. सर्व जखमी प्रवाशांना तात्काळ सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी नगरसेवक दीपक पाकळे, माजी नगरसेवक जे. डी. पवार, कमलाकर चव्हाण व सटाणा आगाराच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. 

जखमींमध्ये नरेश साहेबराव पाटील (२१, रा. नंदुरबार), सतीश सुरेश येवले (३०, रा. विसापूर), विजय अनिल भदाणे (२९, रा. निजामपूर), विशाल वसंत हिवरे (पोलीस कर्मचारी, ३०, रा. तळोदा), ज्ञानेश्वर बबन नांद्रे (३८, रा. तळवाडे), भारती ज्ञानेश्वर ठाकूर (३२, रा. सामोडा), अर्चना मल्हार पाटील (५२, पिंपळनेर), अरुण आनंद ठाकूर (६२, रा. सामोडे), राजमल महारु सोनवणे (३०, रा. पिंपळनेर), सुरेखा तुकाराम ठाकूर (४०, रा. सामोडे), भटू सायबू देसाई (३१, रा. विसापूर), ललिता अरुण ठाकूर (५२, रा. सामोडे) यांचा समावेश आहे.

जखमींवर वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजाराम सैन्द्रे, डॉ. शशिकांत कापडणीस व डॉ. संदीप जाधव यांनी तातडीने उपचार केले. विशाल हिवरे यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव सुरु असल्याने त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात तर ललिता ठाकूर यांच्या गुढघ्याला गंभीर मार लागला असून त्यांचा रक्तदाबही वाढल्याने त्यांना मालेगाव येथे पुढील उपचारांसाठी हलविण्यात आले आहे. राजमल सोनवणे यांच्या नाकातून रक्तस्त्राव सुरु असल्याने त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु होते. 


भरधाव वेग आणि एक्सिलेटरवरील वीटमुळे घडला अपघात
नंदुरबार, साक्री, नवापुर व अक्कलकुवा या आगाराच्या बसेस सटाणा मार्गे नाशिक, पुणे व मुंबई मार्गावर दररोज अनेक फेऱ्या करीत असतात. या आगारांमधील काही बसचालक भरधाव वेगाने वाहन चालवीत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी वारंवार केलेल्या आहेत. यामुळे अनेकदा मोठे अपघात होऊन शेकडो प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. आज झालेल्या अपघातात बसचालक गोकुळ बेलदार याने एक्सिलेटरवर पाय ठेवण्याऐवजी चक्क वीट ठेवलेली होती. त्यामुळे पुढच्या ट्रकने अचानक ब्रेक मारताच बस नियंत्रणात न येता थेट ट्रकवर जावून आदळली. या आगाराच्या बसचालकांकडून वाऱ्याच्या वेगाने वाहने चालवत प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार होत आहेत. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com