नंदुरबार जिल्ह्यात कुपोषणाचा विळखा होतोय सैल

नंदुरबार जिल्ह्यात कुपोषणाचा विळखा होतोय सैल

जनजागृती, उपचार उपलब्धतेमुळे प्रमाण ३० टक्क्यांवर  

नंदुरबार - काही वर्षांपूर्वी कुपोषण आणि नंदुरबार जिल्हा हे जणू समीकरणच झाले होते. मात्र, आता त्यात काहीसा बदल होताना दिसत आहे. जिल्ह्यात जनजागृती व उपचार उपलब्धतेमुळे कुपोषणाचा विळखा सैल होत असून, सद्यःस्थितीत ते प्रमाण ३० टक्क्यांवर आले असल्याचे सकारात्मक चित्र आहे. विशेष म्हणजे खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या खासगी संस्थांचीही यासाठी मदत होत आहे, तर काहींची दुकानदारी पूर्णपणे बंद झाली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूचे प्रमाण वाढले होते. दहा वर्षांपूर्वी जिल्ह्याचा अर्भक मृत्यूदर ५८.६० इतका होता. तो आता कमी झाला आहे. यात सुमारे पंधरा वर्षांपासून केलेल्या कामामुळे हे यश मिळत आहे. याचा अर्थ सर्व यंत्रणेतील कामे व्यवस्थितपणे सुरू आहेत, असेही नाही. त्यात त्रुटी, आक्षेपार्ह स्थिती आहे. 

कुपोषण नियंत्रणासाठीचे उपाय
शासनाने बालकांना पोषण आहार देणे सुरू केले. बालकांचे वजन वाढावे यासाठी अंगणवाडीत आहार दिला जातो. त्याचबरोबर गरोदर मातेची काळजी घेण्यात येत आहे. दहा वर्षापासून संस्थेत होणाऱ्या प्रसुतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. प्रसूती प्रशिक्षित दायीकडून होईल, याकडे लक्ष देण्यात आले आहे. बाल आरोग्य संवर्धन निधी दिला जातो. तसेच बालकांना उपचारास दाखल केले, तर त्या बालकाच्या पालकांना रोजगार निधी दिला जातो. त्यांच्याही निवास आणि खाण्याची व्यवस्था केली जाते. याचबरोबर गावागावात अंगणवाडी सेविका, आरोग्य विभाग, आशा वर्करच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. शासकीय पातळीवर काम करण्यात येत आहे.

जनजागृतीचा परिणाम
जिल्ह्यातील कुपोषण संपलेले नाही, त्याचे प्रमाण कमी झाले आहे. सुमारे पंधरा वर्षापूर्वी कुपोषण विषयात काम करण्यासाठी काही संस्था सरसावल्या होत्या. मात्र ज्या संस्था खऱ्या अर्थाने काम करत आहेत, त्यांचे काम सुरू आहे.

 जिल्ह्यातील बालमृत्यूची स्थिती 
 वय ............. २००३ -०४ ................. २०१६-१७

० ते १ वर्ष ........१५१५ ...................... ७११
१ ते ६ वर्षे ........ ९३०........................ २३५
एकूण ............ २४४५ ...................... ९४६
 

जिल्ह्यात कुपोषणाची समस्या अजूनही आहे. शासन पातळीवरून कुपोषणमुक्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर साक्षरतेच्या प्रमाणात झालेली वाढ, मुलांची घेतली जाणारी काळजी या सर्वांचा परिणाम दिसून येत आहे. दहा वर्षांच्या तुलनेत बालमृत्यूच्या प्रमाणात घट झाली आहे.

- डॉ. आर. बी. पवार (जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार)

शहाद्यात कुलकर्णी रुग्णालयात आदर्श प्रतिष्ठानतर्फे कुपोषित बालकांवर उपचार करण्यात येतात. त्यात मुलांना त्यांच्या गावातून आणणे, पालकांची राहणे, खाण्याची सोय केली जाते. मुलांना काही आजार असतील, तर त्या अनुषंगाने तपासण्या केल्या जातात. त्यावर उपचार केले जातात. दर आठवड्याला दहा बालके दाखल होतात. दोन ते सहा दिवसांत त्यांच्या वजनात वाढ होते. त्यानंतर आवश्‍यक सूचना देऊन घरी पाठविले जाते. आता काही पालक स्वतःच मुलांना घेऊन येतात. हे जागृतीमुळे शक्‍य झाले आहे.

 - डॉ. शशांक कुलकर्णी (आदर्श प्रतिष्ठान, शहादा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com