कर्जमाफीचे आश्‍वासन नको अंमलबजावणी हवी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

नंदुरबार - नंदुरबार ते धुळे रस्त्यावरील रनाळे (ता. नंदुरबार) येथे शिवसेना व शेतकऱ्यांनी चार तास रास्ता रोको आंदोलन करून चक्का जाम केला. शेतकऱ्यांनी पोलिस विभागाला निवेदन देऊन आंदोलन मागे घेतले. यावेळी कर्जमाफीचे आम्हाला आश्वासने नको, प्रत्यक्ष अंमलबजावणी हवी अशा घोषणा दिल्याने परिसर दणाणला. आंदोलनात शेकडो शेतकऱ्यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

नंदुरबार - नंदुरबार ते धुळे रस्त्यावरील रनाळे (ता. नंदुरबार) येथे शिवसेना व शेतकऱ्यांनी चार तास रास्ता रोको आंदोलन करून चक्का जाम केला. शेतकऱ्यांनी पोलिस विभागाला निवेदन देऊन आंदोलन मागे घेतले. यावेळी कर्जमाफीचे आम्हाला आश्वासने नको, प्रत्यक्ष अंमलबजावणी हवी अशा घोषणा दिल्याने परिसर दणाणला. आंदोलनात शेकडो शेतकऱ्यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

महाराष्ट्र बंदच्या घोषणेला प्रतिसाद देत शिवसेनेचे नंदुरबार जिल्हा सहसंपर्क प्रमुख दीपक गवते यांच्या नेतृत्वाखाली आज रनाळे येथे सकाळी साडे आठ ते साडे अकरापर्यंत चार तास रास्ता रोको कऱण्यात आला. परिसरातील शेतकऱ्यांनी बैलगाड्या रस्त्यावर नेऊन सोडल्या. शेतकरी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर झोपून शासनाचा निषेध केला. शेतकऱ्यांचा सातबारा कर्जमुक्त झालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळायलाच हवा, शेतकऱ्यांना आश्‍वासन नको तर अंमलबजावणी करा आदी घोषणांनी सारा परिसर दुमदुमला.

रास्ता रोको दरम्यान रस्त्यावर शेकडो वाहनांची रांग लागली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. शेतकऱ्यांनी निवेदन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी माजी सरपंच महेश सांगडे, उपतालुका प्रमुख संतोष पाटील, योगेश सानप, गणेश शिंदे, नाना पाटील, भय्या पाटील, दिलावर पाटील, आबा आढाव, बबलू नागरे, संदीप गुळे, पांडुरंग गवते यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आम्ही शासन मानत नाही, शिवसेना प्रमुखांचे आदेश मानतो. त्यांचा आदेश हा आमच्यासाठी शिरसंवाद्य आहे. शिवसेना नेहमी शेतकऱ्यांचाच बाजूने उभी आहे. त्यामुळे आम्ही मित्रपक्ष म्हणून सत्तेत असलो तरी शेतकरी जगला पाहिजे, त्यांच्यावर अन्याय होऊ नये. हेच शिवसेना प्रमुखांची इच्छा आहे. त्यामुळे आंदोलन केले. यापुढेही शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर आंदोलन तीव्र करू.
दीपक गवते, सहसंपर्क प्रमुख, शिवसेना, नंदुरबार जिल्हा

बंदला संमिश्र प्रतिसाद रनाळ्यात कडकडीत बंद
रास्ता रोकोबरोबरच आजच्या महाराष्ट्र बंदला रनाळे गावातील सर्वच व्यापाऱ्यांनी साद घातली. आपले सर्व व्यवहार बंद ठेवून शेतकऱ्यांचा संपाला पाठिंबा दिला. तर काही व्यापाऱ्यांनी आंदोलनातही सहभाग घेतला.

नंदुरबार येथे व्यवहार सुरळीत
नंदुरबार शहरात सर्वच व्यापाऱ्यांनी दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू ठेवले होते. दिवसभर शहरात नेहमीप्रमाणे वर्दळ सुरूच होती. महाराष्ट्र बंदला नंदुरबारकरांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तर एकीकडे शिवसेनेने रनाळे येथे चक्का जाम केला. तर नंदुरबार शहरात बंदला प्रतिसाद देण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, असे विरोधाभास चित्र होते.

बाजार समितीचे कामकाज सुरू
तीन दिवसाच्या शेतकरी आंदोलनाचा परिणामामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती व भाजीपाला मार्केटमधील व्यवहार विस्कळित झाले होते. बाजार समितीत तर शुकशुकाट होता. मात्र आज दोन्ही संस्थांमध्ये दैनंदिन व्यवहार सुरू करण्यात आले. बाजार समितीत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.