वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांसमोर आव्हान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

तीन दिवसांतील खून, हल्ल्यांमुळे नागरिकांत दहशत
नाशिक - शहरातील गुन्हेगारी आटोक्‍यात असल्याचे पोलिस सांगत असले तरी काही दिवसांमध्ये गुन्हेगारीत वाढ झाली आहे. पादचाऱ्यांची लूटमार केली जात असताना त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करून गंभीर जखमी करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. गुन्हेगारांना आळा घालण्यात पोलिसांना अपयश आल्यानेच मुजोर गुन्हेगारांची मजल दिवसेंदिवस वाढत असून, त्यांनी पोलिसांनाच खुले आव्हान दिले आहे. यामुळे नागरिकांमध्ये दहशत असून, आगामी सण-उत्सवांच्या तोंडावर वाढलेल्या या गुन्हेगारीला पोलिस अटकाव करतील का, असा प्रश्‍न विचारला जाऊ लागला आहे. 

तीन दिवसांत भररस्त्यावर खुनाच्या घटनेनंतर पादचाऱ्याचा मोबाईल हिसकावून नेताना त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. एकावर पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्रांनी खुनीहल्ला करण्यात आला. एवढेच नव्हे तर दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या महिलेची सोनसाखळी खेचून नेल्याचीही घटना घडली. वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कायदा सुव्यवस्थाच धोक्‍यात आली आहे.

अमृतधाम येथे मोबाईलवर बोलणाऱ्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेताना त्याच्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. गणेश राऊत (रा. साईनगर, अमृतधाम) याच्या फिर्यादीनुसार, ते शुक्रवारी (ता. १८) रात्री साडेनऊ-पावणेदहाच्या सुमारास घरासमोरून पायी फिरत असताना मोबाईलवर बोलत होता. त्या वेळी पल्सरवरून तीन जण आले. दोघांनी दुचाकीवरून उतरून राऊत यांच्याकडील सात हजार ६०० रुपयांचा सॅमसंग मोबाईल हिसकावला, ओरडलास तर मारहाण करण्याची धमकी दिली. त्या वेळी गणेशने चोरट्यांकडे मोबाईलचे सिमकार्ड व मेमरी कार्ड मागितले असता, एकाने त्याच्याकडील कोयत्याने गणेशच्या गुडघ्यावर व हातावर वार करून गंभीर जखमी करून पोबारा केला. घटना घडून तीन दिवस उलटले असून, अजूनही संशयित पोलिसांना सापडलेले नाहीत. काल (ता. १९) दुपारी जुन्या पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तिबेटियन मार्केटमध्ये खुनाच्या गुन्ह्यातील संशयित चेतन पवार याच्यावर टोळक्‍याने धारदार शस्त्राने वार करून हल्ला चढविला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, अद्यापही संशयित मोकाट आहेत.  
 
हल्ले, लुटमारीच्या घटना
गुन्हेगारी आटोक्‍यात असल्याचे सांगणाऱ्या पोलिसांनाच गुन्हेगारांनी आव्हान दिले. गुरुवारी गुन्हेगारी टोळीतून एकाचा खून आणि त्यानंतर सतत खुनीहल्ले व लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून, सध्या सर्वसामान्य नाशिककर मात्र दहशतीखाली वावरत आहेत.
 
आकडे बोलतात
      २०१५    २०१६    २०१७ (१८ ऑगस्टपर्यंत)

खून    ४०    ३९    २६ 
खुनाचा प्रयत्न    ४३    ४६    २६
सोनसाखळी चोरी    १०१    ११८    ७२
दुचाकी चोरी    ६३४    ५२८    ३३८

Web Title: nashi news Challenge against rising crime police