नाशिकमधून रोज 12 हजार टन कांद्याची निर्यात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

कांद्याचे भाव (क्विंटलला सरासरी रुपयांत) 

लासलगाव : नवीन 1150, उन्हाळ 550 
पिंपळगाव : नवीन 1151, उन्हाळ 551 
कळवण : नवीन 800, उन्हाळ 575 
नाशिक : उन्हाळ 400 
येवला : नवीन 650, उन्हाळ 500

नाशिक : चलन तुटवड्यातून व्यापाऱ्यांनी मार्ग काढत शेतकऱ्यांना धनादेश, ऑनलाइन बॅंक खात्यात पैसे देण्यास सुरवात केली असताना नाशिकमधून दिवसाला 12 हजार टन कांद्याची निर्यात होऊ लागली आहे. आठवड्यानंतर वाहतुकीसह सर्व परिस्थिती सुरळीत झाल्यावर आठवड्याला देशांतर्गत 40 हजार टन कांदा पाठविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यादृष्टीने व्यापाऱ्यांनी तयार केली आहे. 
शेतकऱ्यांनी पैसे उपलब्ध होतील त्या वेळी रोखीने बिल देण्याची मुभा व्यापाऱ्यांनी दिली आहे. याखेरीज व्यापाऱ्यांनी सहकारी-खासगी बॅंकांच्या खात्यातून आगाऊ स्वरूपाचे धनादेश देण्याचा पर्याय निवडला आहे. त्यास शेतकऱ्यांनी अनुकूलता दर्शवली आहे. दरम्यान, सद्य:स्थितीत बिहारमध्ये आठवड्याला रेल्वेच्या तीन रॅकमधून चार हजार 800, पश्‍चिम बंगालमध्ये दोन रॅकमधून तीन हजार 200 टन कांदा व्यापारी पाठवत आहेत. आसाम व दिल्लीत कांदा पाठविला जात आहे. मलेशिया, कोलंबो आणि दुबईसाठी छोट्या आकारातील दहा हजार टन रोज जात आहे. मलेशिया, कोलंबोसाठी किलोला 14, दुबईसाठी 16 रुपये भाव मिळत आहे. बांगलादेशात रोज दोन हजार टन कांदा पाठविला जात आहे. देशांतर्गत पाठविलेल्या कांद्याला किलोला 12 ते 14 रुपये भाव मिळत आहे. आठवडाभरानंतर बिहारसाठी रेल्वेच्या पाच, पश्‍चिम बंगालसाठी चार, आसामसाठी तीन रॅकमधून आठवड्याला एकदा कांदा पाठविण्यास सुरवात होईल, अशी माहिती कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी दिली. 

येवल्यात दोन दिवस लिलाव बंद 
येवला बाजार समितीतील लिलाव उद्या (ता. 26) आणि सोमवारी (ता. 28) बंद आहेत. व्यापाऱ्यांना धनादेश उपलब्ध होण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. इतर बाजार समित्यांत धनादेशाच्या उपलब्धतेसाठी एखाददुसरा दिवस व्यवहार बंद राहण्याचे संकेत मिळत आहेत. नाशिकमध्ये उद्या लिलाव होणार नाहीत. कांद्यासह नव्याने बाजारात येत असलेल्या मका, सोयाबीनच्या भावात सद्य:स्थितीत विशेष चढ-उतार झालेले नाहीत. मक्‍यासाठी लासलगावमध्ये सरासरी एक हजार 241, कळवण एक हजार 275, येवल्यात एक हजार 150 रुपये क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनची लासलगावमध्ये सरासरी दोन हजार 740, कळवण व येवल्यात प्रत्येकी दोन हजार 750 रुपये क्विंटल, असा भाव राहिला.