फसवणूक करून महिलेला पाजले विष

फसवणूक करून महिलेला पाजले विष

न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांत गुन्हा दाखल

नाशिक: कामटवाड्यातील जागेचा व्यवहार करून पावणेपाच लाख रुपये घेऊनही त्या संदर्भातील व्यवहार पूर्ण न करणाऱ्या दोन संशयितांनी महिलेला देवाचे पाणी म्हणून विष पाजून ठार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पीडित महिलेने न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाच्या आदेशानुसार गंगापूर पोलिसांत दोन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

कांचन प्रकाश बागूल (रा. मधुकरनगर, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, जुलै 2001 मध्ये संशयित चांगदेव घुमरे (वय 58, रा. डिसूझा कॉलनी, गंगापूर रोड), आदिनाथ नागरगोजे (रा. प्रथमेश अपार्टमेंट, मधुकरनगर, गंगापूर रोड) यांनी कामटवाडे शिवारातील दोन हजार चौरसमीटर क्षेत्राची जागा कांचन बागूल यांना विकत देण्याचे ठरले. त्यानुसार संशयितांनी बागूल यांच्याकडून चार लाख 71 हजार रुपये घेतले. प्रत्यक्षात ती मिळकत वादग्रस्त असल्याची पूर्वकल्पना बागूल यांना दिली नव्हती. ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संशयितांकडे हा व्यवहार पूर्ण करा अथवा घेतलेली रक्कम परत करा, असे सांगितले. त्यावर संशयित घुमरे याने जून 2017 पर्यंत महापालिका हद्दीत एक हजार चौरसमीटरची जागा मिळवून देतो, असे सांगितले.

त्याप्रमाणे सामंजस्य करार करण्यात आला. याच कराराची कांचन बागूल यांनी संशयितांना आठवण करून दिली. मात्र संशयितांनी बागूल व त्यांच्या पतीस शिवीगाळ करून दमदाटी केली. 14 ऑक्‍टोबरला बागूल यांच्या घरी दोघे संशयित आले. येताना त्यांनी बाटलीतील पाणी देवाचे असल्याचे सांगून कांचन बागूल यांना पिण्यास दिले. ते पाणी प्यायल्यानंतर बागूल यांना काही मिनिटांनी चक्कर आली आणि उलट्याही झाल्या. त्या वेळी "आम्ही पाण्यातून विष पाजले असून, आता तू कशी जगते,' असे म्हणत संशयितांनी घरातून पळ काढला होता. या प्रकरणी कांचन बागूल यांनी न्यायालयात दाद मागितली असता, न्यायालयाने गंगापूर पोलिसांना या प्रकरणी 156 अन्वये आदेश करीत संशयितांविरोधात फसवणूक व ठार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com