नाशिक: स्वतःची चिता रचून शेतकऱ्याची आत्महत्या

संपत देवगिरे
गुरुवार, 22 जून 2017

सध्या जिल्ह्यात गावोगावी कर्जमाफीच्या आदेशाची होळी होत आहे. बुधवारी सुपडू भिका पवार या शेतकऱ्याने स्वतःच चिता रचली. चितेवर चढुन रॉकेल ओतून पेटवुन घेत आत्महत्या केली. काळजाला भिडणाऱ्या या घटनेने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

नाशिक - शेतकरी संपानंतर सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, रोजच त्यातील नवा फोलपणा समोर येऊ लागल्याने ग्रामीण भागात नैराश्‍य अन्‌ गोंधळ वाढला आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात गावोगावी कर्जमाफीच्या आदेशाची होळी होत आहे. बुधवारी सुपडू भिका पवार या शेतकऱ्याने स्वतःच चिता रचली. चितेवर चढुन रॉकेल ओतून पेटवुन घेत आत्महत्या केली. काळजाला भिडणाऱ्या या घटनेने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

वडनेर खाकुर्डी (ता. चांदवड) येथे शेतकऱ्याने स्वतःची चिता रचून आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना मिळाला आहे. त्यांच्यावर सावकाराचे दोन लाखांचे कर्ज होते. तर पत्नी सखुबाई यांच्या नावे 2012 पासून सहकारी सोसायटीचे 80 हजाराचे पीककर्ज होते. या घटनेनंतर सबंध गाव जमा झाले. हे लोण आता पसरले असून असून शेजारच्या नांदगाव तालुक्‍यात आप्पासाहेब खंडेराव जाधव यांनी वीजेची तार हातात धरुन आत्महत्या केली. त्यांच्यावर सहकारी संस्थेचे 50 हजारांचे कर्ज होते. नापीकीमुळे थकबाकी झाली होती.

शिऊर येथील कचरु पुंजा आहेर यांनी मंगळवारी विषप्राशन करुन आत्महत्या केली. त्यांच्यावर सहकारी सोसायटीचे तीन लाखांचे कर्ज होते. ब्राम्हणगाव (ता. बागलाण) येथील हरिश्‍चंद्र वसंत अहिरे यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या चार आत्महत्यांमुळे यंदाच्या वर्षात बागाईती व द्राक्ष, कांदा, भाजीपाला निर्यातदार असलेल्या नाशिक जिल्ह्यात आत्महत्यांची संख्या पन्नासवर पोहोचली.

महाराष्ट्राच्या राजकारणाची बित्तंबातमी वाचण्यासाठी क्लिक करा

गेले चार दिवस जिल्ह्यात गावोगावी कर्जमाफीच्या आदेशाची होळी केली जात आहे. यासंदर्भात नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, पणे, धुळे, जळगाव, बुलडाणा, परभणीसह अनेक जिल्ह्यात कर्जमाफीच्या ओदशाच्या होळीचे लण पसरले आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या धोरणावरच संशय वाटू लागल्याचे चावडीवरच्या गप्प्यात चित्र आहे. विंचूर (ता. निफाड) येथे शेतकऱ्यांच्या गप्पात सामील झाले असता, ''सरकारला कर्जमाफी करायची होती तर शेतकऱ्यांच्या संपाची वाट का पाहिली?. घोषणा केल्यावर अचानक निकष कुठुन आले? जिल्हा बॅंकातील जुन्या नोटा स्विकारणारच नाही असे अर्थमंत्री उध्दटपणे बोलत होते. त्याचे कारण काय?. आता अचानक निर्णय का फिरवला? त्यात गेल्या दोन महिन्यात शेतकऱ्यांची जी परवड झाली त्याची भरपाई कशी होणार?.' असे असंख्य प्रश्न विचारले जातातच.

त्यात भाजपच्या कार्यकर्त्यांचा शोध घेतल्यावर ते सापडतही नाहीत अशी स्थिती आहे. त्यामुळे गोंधळ. अविश्वासाचे चित्र आहे. त्यामुळे शासन स्तरावरील कर्जमाफीच्या गोंधळाने ग्रामीण भागात या घोषणेचे सकारात्मक परिणाम केव्हा पहायला मिळतील व निराशेचे मळभ केव्हा दूर होतील याची चिंता राजकीय कार्यकर्त्यांतही आहे.

काय घडतंय महाराष्ट्राच्या राजकारणात?
पुण्यात 'हज हाऊस' करण्यासाठी प्रयत्न करू : शरद पवार
21 कोटींची कामे मंत्र्यांनी रोखली
शिवसेना - भाजपमध्ये नव्याने मैत्रीचे वारे !
उद्धव ठाकरे यांना मुनगंटीवारांनी भेट दिला आवाज करणारा वाघ