नवीन चेहऱ्याच्या शक्‍यतेने महापौरपदाची वाढली शर्यत 

नवीन चेहऱ्याच्या शक्‍यतेने महापौरपदाची वाढली शर्यत 

नाशिक - महापालिकेत भाजपला निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर महापौर, उपमहापौर व स्थायी समिती सभापतिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने जुन्या नगरसेवकांचा दावा भक्कम असला, तरी पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी नवीन चेहरासुद्धा आणण्याचे सूचक उद्‌गार पालकमंत्र्यांनी काढल्याने महापौरपदासाठी स्पर्धा वाढली आहे. खुल्या गटातील नगरसेवकांना उपमहापौरासह स्थायी समिती सभापतिपदाचे वेध लागले आहेत. 

महापालिकेत भाजपचे 66 नगरसेवक निवडून आल्याने आघाडी, युतीचे गणित मोडकळीस आले, तसेच घोडेबाजारालाही आळा बसला. महापौरपद यंदा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव झाल्याने स्पर्धेतून अनेक जण बाद झाले. गेली पाच टर्म निवडून आलेल्या रंजना भानसी यांचा दावा भक्कम असला, तरी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नगरसेवक सत्कारावेळी एखादा नवीन चेहरासुद्धा पदावर विराजमान होऊ शकतो, असे विधान केल्याने भाजपमधील अनुसूचित जमाती गटातील नगरसेवकांमध्ये स्पर्धा निर्माण झाली. पंचवटी विभागातूनच हे स्पर्धक असल्याने आमदार बाळासाहेब सानप यांची कसोटी लागणार आहे. भानसी यांच्यासह सुरेश खेताडे, सरिता सोनवणे, पुंडलिक खोडे हे पंचवटीतील नगरसेवक महापौरपदाच्या शर्यतीत आले आहेत. खेताडे पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक होते. त्यामुळे आयातांना थेट महापौरपदी बसविल्यास पक्षात असंतोष निर्माण होण्याची शक्‍यता आहे. सरिता सोनवणे उच्चशिक्षित असल्याने त्यांचे नाव आघाडीवर आहे. पंचवटी विभाग वगळता रूपाली निकुळे यांचे नाव महापौरपदाच्या शर्यतीत आहे. परंतु यशवंत निकुळे यांच्या प्रवेशाला माजी आमदार वसंत गिते यांनी विरोध केला होता. त्यामुळे गिते महापौरपदासाठी रूपाली निकुळे यांच्या नावाला पाठिंबा देतील की नाही, हाही महत्त्वाचा प्रश्‍न आहे. येथे आमदार प्रा. देवयानी फरांदे यांची कसोटी लागणार आहे. 

मोरुस्करांसमोर अडथळे 
महापौरपद राखीव असल्याने साहजिकच उपमहापौरपदासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. खुल्या गटातील नगरसेवकांमधील अनेकांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत. संभाजी मोरुस्कर उपमहापौरपदाचे दावेदार मानले जात असले, तरी त्यांच्यासमोर अनेक अडचणी आहेत. गेल्या पंचवार्षिकमध्ये संभाजी मोरुस्कर भाजपचे गटनेते होते. त्यांची छाप न पडल्याने त्यांना बाजूला हटवत सतीश कुलकर्णी यांच्याकडे गटनेतेपद देण्यात आले होते. निवडणुकीत मोरुस्कर विजयी झाले असले, तरी त्यांच्या विरोधात नाशिक रोड विभागातील नेत्यांची मोठी नाराजी होती. आता पुन्हा मोरुस्करांना उपमहापौर केल्यास पूर्व विधानसभा मतदारसंघात आमदार सानप यांच्यासमोर अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मोरुस्कर यांचे उपमहापौरपदाच्या शर्यतीतून नाव बाद होण्याची दाट शक्‍यता आहे. मोरुस्कर यांच्याऐवजी सतीश कुलकर्णी, सतीश सोनवणे, दिनकर पाटील, अरुण पवार, शशिकांत जाधव, संगीता गायकवाड, उद्धव निमसे किंवा शिवाजी गांगुर्डे या अनुभवी नगरसेवकांची नावे या शर्यतीत पुढे येत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com