घराणेशाहीमुळे कार्यकर्त्यांमध्ये खदखद

shivsena-congress-ncp
shivsena-congress-ncp

नाशिक - महापालिका निवडणुकीत एकनिष्ठ कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे पक्षांनी जाहीर केले असले तरी घराणेशाहीचा पारंपरिक बाज पक्षांनी सोडलेला नाही. यंदाही पुन्हा राजकारणातील पुढील पिढीला उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न होत असल्याने अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये खदखद व्यक्त होत आहे. एकतर पक्षात राहूनच अप्रत्यक्ष विरोध करायचा किंवा उघड-उघड बंडखोरी करून घराणेशाहीला आव्हान देण्याची तयारी सुरू झाल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. घराणेशाहीची परंपरा चालविणाऱ्या पक्षात भाजप त्यानंतर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे.

केंद्र व राज्यात सत्ता असलेल्या भाजपमध्ये इच्छुकांची संख्या अधिक आहे. एका प्रभागात दहा ते बारा इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारी जाहीर करताना भाजप नेत्यांना कसरत करावी लागणार आहे. अनेकांतून एक उमेदवार निवडताना भाजपच्या नेत्यांनी कुटुंबातील सदस्यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये खदखद व्यक्त होत आहे. भाजपकडून आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र प्रभाग तीनमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. आमदार डॉ. राहुल आहेर यांची चुलत बहीण हिमगौरी आहेर-आडके प्रभाग सातमधून तयारी करीत आहेत. याच प्रभागातून आमदार सीमा हिरे यांचे दीर योगेश रिंगणात उतरणार आहेत, तसेच मुलगी रश्‍मी हिरे-बेंडाळे प्रभाग आठमधून रिंगणात उतरणार आहे. नगरसेवक दिनकर पाटील यांचे पुत्र अमोलही प्रभाग आठमधून, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांचे पुत्र प्रथमेश प्रभाग १५ मधून, शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांच्या कुटुंबातून योगिता हिरे यांचे नाव पवननगर भागातून समोर आले आहे. त्यामुळे भाजपमध्ये घराणेशाही बोकाळणार आहे. घराणेशाही चालविली जाणाऱ्या प्रभागमधील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. भाजपबरोबर युती असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक प्रकाश लोंढे यांची स्नुषा प्रभाग अकरामधून उभी राहणार आहे. त्यामुळे तेथेही कार्यकर्त्यांची संधी हुकली आहे.

शिवसेनेतही परंपरा कायम
शिवसेनेच्या इच्छुकांच्या मुलाखती अजून झालेल्या नाहीत. मात्र, उपनेते बबनराव घोलप यांची कन्या तनुजा, नगरसेवक सूर्यकांत लवटे यांचे बंधू शिरीष, माजी महापौर विनायक पांडे यांचे पुत्र ऋतुराज, माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक, राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी चुंबळे यांचे पुत्र प्रताप व पुतण्या कैलास यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. पक्षाचे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांव्यतिरिक्त घराणेशाहीला थारा दिल्यास शिवसेनेलाही बंडाळीला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे.

राष्ट्रवादीतही खदखद
राष्ट्रवादी काँग्रेसला सर्व प्रभागांतून उमेदवार मिळतील की नाही, याबाबत साशंकता आहे. मात्र, ज्या भागात ताकद आहे. तेथेही  घराणेशाही होत असल्याने कमी प्रमाणात का होईना कार्यकर्त्यांमध्ये खदखद आहे. सिडकोतील शिवाजी चौक, राणाप्रताप चौक भागातून यापूर्वी नानासाहेब महाले यांनी नेतृत्व केले आहे. त्यानंतर पुतणे राजेंद्र महाले या भागाचे नगरसेवक आहेत. आता पुतणे राजेंद्र यांच्याबरोबरच मुलगा अमोल रिंगणात उतरणार आहे. ते कार्यकर्त्यांच्या खदखदीला कारणीभूत ठरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com