भाजपमध्ये उमेदवारीवरून रंगला धुमश्‍चक्रीचा अध्याय 

BJP
BJP

नाशिक : महापालिकेच्या उमेदवारीसंबंधीचा निर्णय करत निष्ठावंतांच्या घेरावाला सामोरे गेलेले पालकमंत्री गिरीश महाजन नाशिकमधून रवाना झाले त्याच वेळी एन. डी. पटेल रोडवरील वसंत-स्मृती कार्यालयात "एबी फॉर्म'साठी इच्छुकांची झुंबड उडाली. निष्ठावंतांना डावलले जात असल्याचे पाहून शाब्दिक धुमश्‍चक्रीचा अध्याय रंगला.

शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांना सिडको, सातपूरसह पंचवटीतील नाराजांनी घेरले. नाराजांच्या कोंडाळ्यातून सुटका करून घेत शहराध्यक्षांनी कार्यालय सोडले. 
केंद्रापाठोपाठ राज्यात झालेल्या सत्तांतरापासून महापालिकेत स्वबळावर सत्ता मिळविण्यासाठी उमेदवारीचे आश्‍वासन देण्यासाठी स्थानिक नेत्यांमध्ये लगीनघाई सुरू होती. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती "ब्रेक-अप' केल्याची घोषणा केल्यावर इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते. पण मुलाखतींची प्रक्रिया आटोपल्यावर विशेषतः निष्ठावंतांच्या रोषाला नेत्यांना सामोरे जावे लागले.

जुन्या-नव्यांची सांगड घालण्याची पालकमंत्र्यांसह स्थानिक नेते ग्वाही देत असले, तरीही "इनकमिंग'वाल्यांना मोठ्या प्रमाणात संधी मिळत असल्याचे पाहून निष्ठावंतांच्या शांततेचा बांध फुटला. काल (ता. 2) पालकमंत्र्यांना घेरण्याचा पहिला अध्याय झाल्यावर आज निष्ठावंतांच्या घेरावाला शहराध्यक्षांना सामोरे जावे लागले. उमेदवारी न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा एका महिला इच्छुकाने देऊनही टाकला. ही सारी परिस्थिती एकीकडे घडत असतानाच बहुतांश निष्ठावंतांनी उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्याने बंडखोरीच्या लागणीने नेते जर्जर झाले. आता माघारीपर्यंत बंडखोरांना शांत करण्यात स्थानिकांना कितपत यश मिळते, यावर भाजपच्या पुढील रणनीतीची दिशा अवलंबून राहणार आहे. 

महाजन-सानपांच्या व्यूहरचनेला काळकरांचे कोंदण 
उमेदवारांची निश्‍चिती करत असताना नेत्यांनी कुटुंबीयांसह आपल्याला हव्या असलेल्या उमेदवारीसाठीचा आग्रह लावून धरला होता. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी कुटुंबीयांऐवजी समर्थकांना उमेदवारी मिळावी म्हणून जबरदस्त मोर्चेबांधणी केली होती.

प्रा. फरांदे आणि माजी आमदार वसंत गिते हे उमेदवारीच्या मुद्द्यावरून आमने-सामने ठाकले होते. पंचवटीमधील उमेदवारांचा आग्रह फलद्रूपच्या दिशेने जात नसल्याने सुनील बागूल समर्थकांमध्ये नाराजीचा सूर पसरला. आमदार सीमा हिरे कन्येसह दिराच्या उमेदवारीसाठी आग्रही असतानाच दिनकर पाटील यांच्या मुलाला आपल्या मतदारसंघातील प्रभागातील उमेदवारीसाठी विरोध करत होत्या. आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी विशेषतः सिडको भागावर लक्ष केंद्रित केले होते.

अशा परिस्थितीत स्थानिक नेते गुंतलेले असताना उमेदवारी निश्‍चितीची व्यूहरचना श्री. महाजन आणि सानप यांनी हातात घेतली. त्यास संघटनमंत्री किशोर काळकर यांनी कोंदण चढविले. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी हेमंत धात्रक इच्छुक होते. त्यांचे पुनर्वसन महापालिकेच्या निवडणुकीची उमेदवारी देऊन करण्यात आले आहे. प्रा. फरांदे यांनी अखेर दोघांच्या उमेदवारीचा निर्णय होऊ शकला नसल्याचे स्पष्ट केले. सुरेश पाटील यांना प्रभाग बाराऐवजी सातचा प्रस्ताव देण्यात आल्याचीही माहिती प्रा. फरांदे यांनी दिली. "वसंत-स्मृती'मध्ये काळकरांच्या जोडीला शहर संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव "एबी फॉर्म' देण्याचा किल्ला लढवत होते. विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील यांच्या मतदानाच्या प्रक्रियेत प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी व्यस्त असल्याने त्यांचा "वसंत-स्मृती'मध्ये वावर नसल्याचे दिसून आले. 

"रिपब्लिकन'ला झुलवत सोडून दिले 
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षातर्फे विधान परिषदेसाठी समर्थन देण्याच्या बदल्यात 16 प्रभागांतून 22 जागांचा दावा करण्यात आला होता. सातपूर विभागातील प्रभागातून रिपब्लिकन पक्षाच्या दावेदारीच्या मुद्द्यासह कधी सात, तर कधी दहा जागा देतो, असे म्हणत भाजपच्या नेत्यांनी झुलवत ठेवले. अखेर भाजपची उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर केंद्रातील सत्तेत भागीदार असलेल्या रिपब्लिकन पक्षाला वाऱ्यावर सोडून देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. 

पांडे समर्थकांनी फुलविले चेहरे 
निष्ठावंतांची नाराजी, बंडखोरीची लागण अशा प्रश्‍नांनी भाजपच्या गोटात चिंतेचा सूर पसरला होता. इतक्‍यात दुपारच्या सुमारास शिवसेनेमध्ये घडलेल्या रामायणानंतर माजी महापौर विनायक पांडे यांच्या समर्थकांच्या "वसंत-स्मृती'मधील हजेरीने भाजप समर्थकांचे चेहरे फुलले होते. श्री. पांडे यांचा मुलगा ऋतुराज आणि भावजय कल्पना पांडे यांचा "एबी फॉर्म' रवाना झाल्याची माहिती वाऱ्यासारखी शहरभर पसरली. मग उमेदवारी न मिळाल्याचे शल्य काहीसे बाजूला ठेवत बऱ्याच निष्ठावंतांनी "वसंत-स्मृती'मध्ये संपर्क साधत समाधानाची झुळूक अनुभवली. पण हे समाधान दुपारी तीनला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर काकू-पुतण्याने पक्षाचे "एबी फॉर्म' जमा न केल्याचे स्पष्ट होताच मावळले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com