शिवसेना-भाजपमध्येच खरी रस्सीखेच 

BJP Shiv Sena
BJP Shiv Sena

नाशिक रोड : जेल रोड परिसरातील प्रभाग 17 व 18 मध्ये शिवसेना व भारतीय जनता पक्षाने उमेदवारांना एबी फॉर्म देण्यासाठी तिष्ठत ठेवल्याने आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या.

पूर्वीचा प्रभाग 36 च्या भाजपच्या विद्यमान नगरसेविका मंदाबाई ढिकले यांचे तिकीट कापल्याने त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेने प्रभाग 17 मध्ये दोन विद्यमान नगरसेवक शैलेश ढगे व मंगला आढाव यांना पुन्हा संधी दिली. भाजपनेही पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या सुनंदा मोरे यांना प्रमोट करत संधी दिली.

त्यांना रिपब्लिकन पक्षाचे संजय भालेराव, शिवसेनेचे प्रशांत दिवे, मनसेचे प्रमोद साखरे यांचे खडतर आव्हान असेल. कालपर्यंत सर्वसाधारण गटातून भाजपकडून चर्चेत असणाऱ्या विनायक (बाबूराव) आढाव यांचे ऐनवेळी तिकीट कापत माजी नगरसेवक दिनकर आढाव यांना अधिकृत उमेदवारी दिल्याने बाबूराव आढाव बंडखोरी करणार हे निश्‍चित. तसेच नाशिक रोड भाजपचे उपाध्यक्ष राम वाघ यांना डावलत त्यांच्याऐवजी आमदार बाळासाहेब सानप यांचे वाहनचालक गणेश सातभाई यांच्या आई अनिता सातभाई यांना उमेदवारी दिल्याने भाजपचे निष्ठावंत नाराज आहेत. प्रभाग 17 मध्ये खरी लढत शिवसेना व भाजपतच होईल. मात्र, रिपब्लिकन पक्ष त्यांच्या विजयात निश्‍चित अडसर ठरू शकतो. पुरुष सर्वसाधारण गटात विद्यमान नगरसेवक शैलेश ढगे व दिनकर आढाव यांच्यात काट्याची टक्कर होईल. 

प्रभाग 18 मध्ये शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांनी सावधगिरी बाळगत तुल्यबळ उमेदवार दिल्याने सर्वच लढती रंगतदार होतील, शिवाय या दोन्ही पक्षांतील उमेदवारांना मनसेचे उमेदवार अडसर ठरू शकतात. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती प्रवर्गात खरी कसोटी लागणार आहे. शिवसेना व भाजपच्या उमेदवारांना अपक्ष उमेदवार पवन पवार यांचे तगडे आव्हान असेल, तर पुरुष सर्वसाधारण गटात शिवसेनेकडून विद्यमान नगरसेवक अशोक सातभाई व ऍड. सुनील बोराडे या दोघांनी एबी फॉर्म मिळवत अर्ज दाखल केल्याने नेमका शिवसेनेचा अधिकृत उमेदवार कोण, हे निश्‍चित झाले नाही. त्यांना भाजपचे विशाल संगमनेरे यांचे आव्हान असेल. 

प्रकाश बोराडे व रंजना बोराडे यांनी आत्तापर्यंत सलग पाच वेळा नगरसेवकांची टर्म सांभाळली आहे. या वर्षी रंजना बोराडे सहाव्यांदा इतर मागास प्रवर्ग महिला गटातून नशीब आजमावत आहेत. त्यांना भाजपच्या मंदा फड कशी लढत देतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सर्वसाधारण महिला गटात शिवसेनेचे समन्वयक शिवा ताकाटे यांच्या पत्नी शीतल यांना भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेश चिटणीस सचिन हांडगे यांच्या मातोश्री मीरा हांडगे यांचे आव्हान असणार आहे. 

प्रभाग 19 मध्ये सर्वसाधरण गटातून भाजपकडून पंडित आवारे, शिवसेनेकडून माजी नगरसेवक अंबादास ताजनपुरे, महिला राखीवमधून शिवसेनेकडून जयश्री खर्जुल, नंदा भोर, मागासवर्गीयमधून नगरसेवक कन्हय्या साळवे, नगरसेवक हरीश भडांगे, माजी नगरसेवक संतोष साळवे यांच्यात काट्याची लढत होणार आहे. 

मोरुस्कर-मुदलियार यांच्यात सामना 
प्रभाग 20 मध्ये भाजपचे संभाजी मोरुस्कर आणि शिवसेनेचे गिरीश मुदलियार यांच्यामध्ये चुरशीची लढाई होणार आहे. यामध्ये संभाजी मोरुस्कर विद्यमान नगरसेवक असून, त्यांनी प्रभागात विकासकामेही केली आहेत, तर गिरीश मुदलियार यांच्या मागे भाऊ कैलास मुदलियार यांची मनी व मसल पॉवर असणार आहे. या लढतीत केलेला विकास जिंकणार की मनी व मसल पॉवर याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com