कांदा अनुदानासाठी 13 कोटींचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

सोयाबीनसाठी 39 लाखांचा प्रस्ताव पणन विभागाला सादर

सोयाबीनसाठी 39 लाखांचा प्रस्ताव पणन विभागाला सादर
नाशिक - कांदा उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलला शंभर रुपयांप्रमाणे अनुदान देण्याच्या सरकारच्या धोरणानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठीच्या 12 कोटी 68 लाखांचा प्रस्ताव सहकार विभागाने पणन विभागाला आज सादर केला. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे रुपये क्विंटलप्रमाणे सोयाबीनचे 38 लाख 67 हजारांचे अनुदान मिळणार आहे.

गेल्या वर्षी बाजार समित्यांमध्ये जुलै ते ऑगस्टमध्ये विकलेल्या कांद्याला अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानंतर वर्षभरानंतर 43 कोटी 48 लाख रुपये अनुदानासाठी मंजूर केले आहेत. हे अनुदान 21 जुलैपर्यंत वाटप करण्याची कालमर्यादा पणन संचालकांना घालून देण्यात आली आहे.

एका शेतकऱ्याला 200 क्विंटलपर्यंत विकलेल्या कांद्याला शंभर रुपये क्विंटल याप्रमाणे अनुदान मिळणार आहे. जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांमध्ये दोन महिन्यांमध्ये 12 लाख 69 हजार 472 क्विंटल कांदा 32 हजार 375 शेतकऱ्यांनी विकला आहे. या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार हे सहकार विभागाच्या प्रस्तावावरून स्पष्ट झाले आहे. कांद्याच्या जोडीलाच सोयाबीन अनुदानाचा प्रस्ताव सहकार विभागाने पाठविला आहे. ऑक्‍टोबर ते डिसेंबर 2016 या कालावधीत विकलेल्या सोयाबीनला अनुदान देण्याचे धोरण निश्‍चित केले आहे.