आठवड्यात आणखी 15 बालके दगावली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

नाशिक - नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये इन्क्‍युबेटर कमतरतेसह अपुऱ्या व्यवस्थेने नवजात बालके बळी घेतल्याचे उदाहरण ताजे असतानाच गेल्या आठवडाभरात याच कक्षात प्रसूतिपूर्व जन्मलेली व कमी वजनाची आणखी पंधरा बालके दगावल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या आठ दिवसांत 435 नवजात बालकांना भरती करण्यात आले होते.

ऑगस्ट महिन्यात नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागाच्या इन्क्‍युबेटरमध्ये 55 बालके दगावली होती. नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयातीलच नव्हे, तर राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमधील इन्क्‍युबेटरच्या कमतरतेचा प्रश्‍न यानिमित्ताने "सकाळ'ने उजेडात आणला आणि निद्रिस्त आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. जिल्हा शासकीय रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात असलेल्या इन्क्‍युबेटर कक्षात 1 ते 8 सप्टेंबर दरम्यान, 435 नवजात बालकांना भरती करण्यात आले होते. भरती करण्यात आलेली बहुतांश बालके प्रसूतिपूर्व जन्मलेली आणि अत्यंत कमी वजनाची होती. यातील 400 ते 500 ग्रॅम वजनाची असलेली नवजात 15 बालके गेल्या आठ दिवसांत दगावली आहेत.

परिस्थिती "जैसे थे'
जिल्हा रुग्णालयातील एनआयसीयूतील एका इन्क्‍युबेटरमध्ये आजही 3 ते 4 बालकांना भरती करण्यात आलेले आहे. यातील अतिसंसर्गजन्य बालकांना स्वतंत्र भरती करण्यात आले आहे. उपचार सुरू असलेल्या बालकांमध्ये सर्वाधिक बालके ही आदिवासीबहुल क्षेत्रातील आहेत.

गेल्या आठवडाभरातून भरती झालेली आकडेवारी
1 सप्टें. : 56
2 सप्टें. : 57
3 सप्टें. : 58
4 सप्टें. : 47
5 सप्टें. : 52
6 सप्टें. : 54
7 सप्टें. : 56
8 सप्टें. : 55
एकूण : 435
दगावली : 15