16 बाजार समित्यांचा कारभार ठप्प

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

नाशिक - गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी संपाच्या पार्श्‍वभूमीवर आज बाजार समित्या सुरू ठेवण्याच्या निर्णयाला जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाला. घोटी, नांदगाव, मनमाड वगळता इतर कोठेही शेतमाल बाजारात आला नाही. गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील 16 बाजार समित्यांचा कारभार ठप्प झाला आहे. एकही टन माल येत नसल्याने बाजार समित्यांचे उत्पन्न बुडत आहे. दुसरीकडे ताजा भाजीपाला मिळत नसल्याने वाढीव दराने फळ भाज्या, उसळी, मांस विकत घेऊन नागरिकांना दिवस काढावे लागत आहेत. नागरिकांची गैरसोय दूर व्हावी व संपाची तीव्रता कमी व्हावी या दुहेरी हेतूने आज बाजार समित्या चालू ठेवण्याचा आदेश सहकार पणन विभागाने दिला होता; मात्र 19 पैकी तीनच समित्यांमध्ये शेतकरी पोचू शकले.