नाशिकमध्ये व्यापाऱ्यांचा 20 कोटींचा कांदा जागेवर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

मुंबई, दिल्ली, बंगळूरसह अहमदाबादमध्ये भाव वधारले

मुंबई, दिल्ली, बंगळूरसह अहमदाबादमध्ये भाव वधारले
नाशिक - शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी निर्यातीसह देशांतर्गत बाजारपेठेत कांदा न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचा 20 कोटींचा 35 हजार टन कांदा जागेवर आहे. त्याचवेळी एका दिवसात मुंबईसह दिल्ली, बंगळूर आणि अहमदाबादमध्ये कांद्याचे भाव वधारले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये दिवसाला दीड ते दोन लाख क्विंटल कांदा शेतकरी विकतात. पण शेतकऱ्यांच्या संपामुळे गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाभरातील बाजार समित्यांमधील व्यवहार ठप्प आहेत. शिवाय दिवसाला अडीच ते साडेतीन हजार टन कांदा व्यापारी बाहेर पाठवतात. तोही थांबल्याने त्यातील पन्नास टक्के कांदा निर्यातीसाठी पोचणे अशक्‍य झाले असून, 350 ट्रकची चाके जागेवर थांबली आहेत. देशातील बाजारपेठेत काल (ता. 1) एक लाख 78 हजार 931 क्विंटल कांद्याची विक्री झाली. त्यास 568 ते 841 आणि सरासरी 717 रुपये क्विंटल असा भाव मिळाला. आज एक लाख 10 हजार 284 क्विंटल कांद्याची विक्री झाली असून, त्यास 631 ते 849 आणि सरासरी 784 रुपये क्विंटल असा भाव राहिला. मुंबईकरांना कांद्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मुंबईमध्ये क्विंटलला 650 रुपये असा भाव काल मिळाला, तर आज हाच भाव 700 रुपयांपर्यंत पोचला होता.

दिल्लीमध्ये 583 रुपये क्विंटल भाव मिळालेला कांदा आज 603 रुपयांना विकला गेला. कांद्याचे आगार असलेल्या कर्नाटकमधील बंगळूरमध्ये काल 795 रुपये क्विंटल असा भाव निघाला होता. आज 954 रुपये क्विंटल या भावाने तेथे कांद्याची विक्री झाली आहे.

मुंबईकरांसाठी आज बैठक
मुंबईकरांना कांद्यासह दुधाची चणचण भासू लागली आहे. त्यावर उपाय म्हणून सरकारतर्फे कांदा आणि दुधाचा पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, नाशिक जिल्हा प्रशासनातर्फे उद्या (ता. 3) सकाळी दहाला नाशिकमधील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होत आहे. कांदा व्यापारी, दूध उत्पादक संस्थांचे पदाधिकारी आणि फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आली आहे. सहकार विभागातर्फे या बैठकीची तयारी दिवसभर सुरू होती.