वर्षभरात कांदा शेतीतून दोन हजार कोटींचा तोटा

श्‍याम उगले
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

सरकारने आता शेतमालाच्या भावाचे धोरण ठरवताना उत्पादन खर्चापेक्षा ग्राहकांना खरेदी करण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या किमतीचा विचार करून ती रक्कम मिळाली पाहिजे, याचा विचार केला पाहिजे. पणन विभागाकडील आकडे हे केवळ बाजार समितीत विकलेल्या कांद्याचे आहेत; परंतु कांद्याची मोठ्या प्रमाणावर शिवार खरेदी होते. त्याचा विचार केल्यास शेतकऱ्यांना कांद्यापासून झालेला तोटा तीन हजार कोटींपेक्षा कमी नाही.
- डॉ. गिरधर पाटील, शेतकरी संघटना नेते

नाशिक - केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी योजना जाहीर करीत आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्याचे उत्पन्न वाढणे दूरच, उलट त्याने कांदापिकासाठी केलेला खर्चही वसूल झाला नाही. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा कांदापिकासाठी चार हजार ४३१ कोटी रुपये भांडवली खर्च केल्यानंतर त्यांना वर्षभरात कांदाविक्रीतून केवळ २५०० कोटी रुपये मिळाले आहेत. यामुळे कांदा पिकाच्या नादी लागल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जवळपास दोन हजार कोटी रुपये मातीत गेल्याचे कृषी व पणन विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसते.

नवीन कांद्याचा हंगाम दर वर्षी साधारण नोव्हेंबरपासून सुरू होतो. साधारण ऑक्‍टोबरअखेरपर्यंत चाळीत साठविलेला उन्हाळ कांदा बाजार समित्यांत विक्रीस येतो व नोव्हेंबरपासून नवीन कांदा येतो. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून ते आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील सर्व १५ प्रमुख बाजार समित्यांत विक्री झालेला कांदा व त्यांना मिळालेला सर्वसाधारण दर याचा विचार केला, तर सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतकरी कसा देशोधडीला लागला आहे, याचे चित्र स्पष्ट होते.

खते, बियाणे, औषधे, मशागत व मजुरीच्या खर्चात दर वर्षी वाढ होत असल्यामुळे कांद्याचा उत्पादनखर्च वाढतच आहे. यामुळे जमीन व पाणी वगळूनही क्विंटलभर कांद्यासाठी शेतकऱ्याला १२०० रुपये भांडवली खर्च करावा लागत आहे. कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी केलेला खर्च भरून निघण्यासाठी किमान १२०० रुपये भाव मिळणे आवश्‍यक होते. मागील अकरा महिन्यांपैकी नऊ महिने कांद्याला क्विंटलमागे सरासरी ४४१ ते ६५० रुपये भाव मिळाला आहे. नोव्हेंबर २०१६ ते जुलै २०१७ या काळात क्विंटलमागे साडेचारशे ते साडेसातशे रुपये तोटा सहन केला आहे.

कांद्यासाठी गुंतवलेले भांडवलच निघाले नाही, तेथे कांद्याच्या शेतीतून नफा मिळण्याची गोष्ट दूरच राहिली.

आकडेवारीतील तफावत
कृषी विभागाने या वर्षी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात कांद्याचे ३४ लाख ४२ हजार ४४७ टन उत्पादन झाल्याचे दिसते. प्रत्यक्षात नाशिक जिल्ह्यातील १५ प्रमुख बाजार समित्यांत १५ सप्टेंबरपर्यंत ३६ लाख ९२ हजार ५१८ टन कांद्याची विक्री झाली. अजूनही शेतकऱ्यांकडे चाळींमध्ये कांदा साठविलेला असून, ऑक्‍टोबरअखेरपर्यंत तो विक्रीस येणार आहे. जुलै ते आतापर्यंत विक्रीस आलेल्या कांद्यापैकी २५ टक्के कांदा खराब झाल्यामुळे तो शेतकऱ्यांनी फेकून दिला. याशिवाय कांद्याची मोठ्या प्रमाणावर शिवार खरेदी होत असते. यामुळे कृषी विभागाची आकडेवारी व प्रत्यक्ष विकला गेलेला कांदा यांचा ताळमेळ बसत नाही.

जिल्ह्यातील कांद्याची आवक व दर
महिना          आवक    सरासरी भाव 
                    (टन)        (क्विंटल)

नोव्हेंबर     १५६१०१    ६५०
डिसेंबर     ३८१५४०    ५१०
जानेवारी    ५५८२१४    ६००
फेब्रुवारी    ५०२९५६    ४७१
मार्च    ३३३९४९    ५५५
एप्रिल    २८७७२६    ६००
मे    ४३१२८५    ६००
जून    २५६८०४    ४४१
जुलै    ३४८८९२    ६००
ऑगस्ट    २९४५५२    १८००
सप्टेंबर    १६०४९९    १३४८

Web Title: nashik news 2000 crore loss in onion agriculture