अतिरिक्त इंधनाचा दिवसाला चार कोटींहून अधिक भुर्दंड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

एसटीचा महिन्याला नऊ कोटींचा खर्च वाढला; वाहनखर्चात 20 टक्‍क्‍यांनी वृद्धी

एसटीचा महिन्याला नऊ कोटींचा खर्च वाढला; वाहनखर्चात 20 टक्‍क्‍यांनी वृद्धी
नाशिक - दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने पेट्रोल लिटरमागे दोन, तर डिझेल एक रुपयाने स्वस्त करण्याचा निर्णय घेतला; पण दुसरीकडे खड्डेमय महाराष्ट्रातून वाहने चालवण्यासाठी दिवसाला चार कोटी रुपयांहून अधिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या इंधनाच्या खर्चात गेल्या वर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत गेल्या महिन्यात नऊ कोटींनी वाढ झाली आहे आणि त्याचवेळी वाहनांची कामे वाढल्याने गॅरेजवाल्यांच्या धंद्यात वीस टक्‍क्‍यांनी वृद्धी झाली आहे.

राज्यातील रस्त्यांनी 250 किलोमीटर अंतरावरील चारचाकीमधील कुटुंबासमवेतच्या प्रवासासाठी सर्वसाधारणपणे साडेचार ते पाच तासांचा कालावधी लागायचा. हाच कालावधी आता साडेसहा तासांपर्यंत पोचला आहे. हा प्रवास वाढला असताना इंधनावरील खर्च वाढलेला असतानाच पाठ-मान-मणक्‍याची हाडे खिळखिळी होऊ लागली आहेत. प्रवासातून मणक्‍याचा त्रास जाणवणाऱ्यांची संख्या वाढली आहे. खड्ड्यांमधील रस्त्यांवरुन कसरत करत वाहन चालवण्यातून चालकांना खुब्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मानवी त्रासाप्रमाणेच वाहनांच्या शॉकऍबसॉर्बर, टायर आणि इतर कामे वाढल्याने खिशाला बसणारा भुर्दंड आणखी वाढला आहे. शॉकऍबसॉर्बर लिक होताहेत. सस्पेन्शन बिघडत आहे. व्हील अलायमेंट करून चाके सुस्थितीत आणली जात नाहीत तोच खड्ड्यांमधील दगड-गोट्यांमुळे टायर फुटण्याचे प्रमाण वाढले आहे.

किलोमीटरचा खर्च 12 रुपये 28 पैसे
राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांसाठी सप्टेंबर 2016 मध्ये 190 कोटी 90 लाख रुपयांचे इंधन खरेदी करण्यात आले होते. सप्टेंबर 2017 मध्ये हाच खर्च 199 कोटी 76 लाखांपर्यंत पोचला आहे. महामंडळाच्या खर्च विश्‍लेषणावरून किलोमीटरचा इंधन खर्च 11 रुपये 68 पैशांवरून 12 रुपये 28 पैशांपर्यंत पोचला आहे. हे कमी काय, म्हणून सुट्या भागांचा खर्च एक कोटी 56 लाख रुपयांवरून एक कोटी 69 लाख रुपये झाला आहे. शिवाय टायर, ट्यूबसाठीचा 12 कोटींहून अधिक खर्च आणखी वेगळा आहे.

माझ्या पेट्रोलपंपावरून महिन्याला सर्वसाधारणपणे 265 किलोलिटर डिझेल-पेट्रोल विकले जायचे. गेल्या सहा महिन्यांत ही विक्री 15 किलोलिटरने वाढली आहे. त्यात 60 टक्के डिझेलचा समावेश आहे. राज्यात हिंदुस्थान, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑईलप्रमाणेच इतर तीन कंपन्यांच्या पेट्रोलपंपांची संख्या साडेचार हजारांपर्यंत आहे. त्यावरून इंधनाच्या वाढलेल्या खपाचा अंदाज बांधता येईल.
- नितीन धात्रक, पेट्रोलपंप मालक, नाशिक

राज्य परिवहन महामंडळामध्ये साडेसात हजारांच्या आसपास महिला कार्यरत आहेत. त्यातील वाहक महिलांची संख्या चार हजारांहून अधिक आहे. त्यापैकी जवळपास 400 महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यातील 168 महिला गरोदर होत्या. 138 जणींनी हलक्‍या कामांची मागणी केली. पण 78 जणींना काम बदलून दिले गेले नाही. त्यामुळे 48 जणींचा दगदग आणि खड्ड्यांनी गर्भपात झाला. हा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी सहा महिन्यांच्या प्रसूती रजेला जोडून विशेष पगारी रजा देण्याच्या घोषणेचे साधे परिपत्रक काढण्याची तसदी घेण्यात आली नाही.
- शीला नाईकवाडे, राज्य महिला संघटक, एस. टी. कामगार संघटना