डेंगीच्या अळ्या आढळल्यास घरमालकांना पाचशे रुपये दंड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

नाशिक - डेंगीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम आखण्यात येऊन आजार नियंत्रणात येत नसल्याने आता ज्या घरात डेंगीच्या अळ्या आढळतील, त्या घरमालकांना पाचशे रुपये दंड आकारला जाणार आहे. बांधकामाच्या ठिकाणी डेंगीच्या अळ्या आढळल्यास पाच हजार रुपये दंड आकारणी केली जाणार असल्याचे वैद्यकीय व आरोग्य समितीचे सभापती सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.

गेल्या काही महिन्यांत शहरात डेंगीचा प्रादुर्भाव वाढत आहे. जानेवारीत एकूण २१ डेंगीचे रुग्ण असताना जूनपासून त्यात कमालीची वाढ झाली. जूनमध्ये १९, तर जुलैमध्ये १४ रुग्ण आढळले. ऑगस्टमध्ये डेंगीने शहरात कहर केला. डेंगीच्या रुग्णांची संख्या ९७ वर पोचली. सप्टेंबरमध्ये १०५, तर ऑक्‍टोबरमध्ये २४८ रुग्णांना डेंगी असल्याचे निष्पन्न झाले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात देखील ११४ रुग्ण आढळले आहेत. जेथे रुग्ण आढळतील, त्या जागेवर महापालिकेच्या मलेरिया विभागाचे कर्मचारी पोचून अळी नष्ट करण्याचे काम करत आहेत; परंतु जेवढी महापालिकेची जबाबदारी तेवढीच जबाबदारी नागरिकांचीही असताना महापालिका कर्मचाऱ्यांच्याच भरवशावर नागरिक अवलंबून राहत असल्याने त्यावर उपाय म्हणून आता दंडात्मक आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार घरमालकाकडून पाचशे, तर बांधकाम व्यावसायिकांकडून पाच हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. आरोग्य समितीच्या बैठकीत तसा ठरावदेखील केला जाणार असल्याचे सभापती कुलकर्णी यांनी सांगितले.

स्वच्छता निरीक्षकांच्या बदल्या
सफाई कर्मचाऱ्यांचे प्रभागनिहाय नियोजन करताना कमी-अधिक प्रमाणात सफाई कर्मचारी पुरविले जातात. नियुक्तीच्या ठिकाणी काम करण्याऐवजी अन्य प्रभागांत काम होत असल्याचे निदर्शनास आल्याने सहा विभागांतील स्वच्छता निरीक्षकांच्या बदल्या केल्या जाणार आहेत.