खटल्याला विलंब होत असल्याने सात कैद्यांचा कारागृहात अन्नत्याग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

नाशिक रोड - मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या सात कैद्यांच्या खटल्याबाबत 18 महिने उलटूनसुद्धा न्यायालयात सुनावणी होत नसल्याच्या निषेधार्थ दोन गुन्ह्यांतील कैद्यांनी गुरुवारी (ता. 6) अचानकपणे अन्नत्याग आंदोलन करून कारागृह प्रशासनाला झटका दिला. या प्रकारानंतर कारागृह अधीक्षकांनी संबंधित कैद्यांची समजूत घातल्यानंतर त्यांनी आज (ता.7) सकाळी आंदोलन मागे घेतले.

दीड वर्षापूर्वी शिर्डी येथे एका खूनप्रकरणी व ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत संशयित विशाल कोते, दीपक मांजरे, सुनील जाधव, रामा जाधव, योगेश पारधी, शोएब शेख, रूपेश वाडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर या सर्वांना कोपरगाव येथील न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देऊन त्यांची रवानगी येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. मात्र, अठरा महिन्यांपासून खटल्याची सुनावणी सुरूच झाली नसल्याने संबंधित कैद्यांनी गुरुवारी रात्री अन्नत्याग आंदोलन केले.

ही घटना कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांना समजताच त्यांनी या कैद्यांची समजूत काढली. न्यायालयास एक महिन्याची मुदत द्या, या प्रकरणाची कागदपत्रे शासन न्यायालयात सादर करून सदर खटल्यास तातडीने सुरवात करण्यासाठी प्रयत्न करू, असे साळी यांनी सांगितले. साळी यांच्या आश्‍वासनानंतर या सर्व कैद्यांनी आंदोलन मागे घेऊन जेवण घेतले.